सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी विशेष रजा देण्यात येते. आता हीच रजा पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांना देखील मिळणार आहे. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी काल (दि. 9) लोकसभेत याबाबतची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्त्रियांपाठोपाठ एकट्या पुरुषाला देखील 730 दिवसांची बाल संगोपन रजा देण्यात येणार, अशी घोषणा केली.
सरकारी कर्मचाऱ्यांपैकी महिला कर्मचारी वर्गाला मुलांच्या संगोपनासाठी रजा देण्याबाबत तरतुद होती. त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी ही रजा घेण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला होता. काल याबाबत एक मोठी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्रिय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी एकट्या पुरुषाला 730 दिवसांची रजा देण्यात येईल असे लोकसभेत सांगितले आहे.
सरकारी नियम काय आहेत?
काल (दि.9) लोकसभेत लेखी उत्तर देत जितेंद्र सिंह म्हणाले की, 18 वर्षांपर्यंतच्या दोन मोठ्या मुलांच्या काळजीसाठी, संपूर्ण सेवेदरम्यान जास्तीत जास्त ७३० दिवसांपर्यंत रजा मंजूर करण्याची तरतूद आहे. ते म्हणाले की, दिव्यांग मुलाच्या बाबतीत वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, केंद्रीय नागरी सेवा (रजा) नियम, 1972 च्या नियम 43-सी अंतर्गत महिला सरकारी नोकरदार आणि केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त केलेल्या एकल पुरुष सरकारी सेवकांना बाल संगोपन रजेसाठी (CCL) पात्र आहेत.