महसूलची कारवाई, अवैध वाहतूक ; एक ट्रॅक्टर जप्त

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : अवैध रेतीची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर वाहतूक करत असल्याचे माहिती महसूल विभागाला मिळताच भरारी पथकाने आज गुरुवारला दुपारी 12 वाजता धाड टाकली असून घटनास्थळावरून एक ट्रॅक्टर जप्त केले.

काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या नियोजनबद्ध व नायब तहसीलदार यांचे पथकाच्या व्युव्हरचनेने वाळू चोरट्याचे पुरते धाबे दणाणले आहे.

तालुक्यातील वेगांव ते मारेगाव रोड वर वाहन क्रं. एम एच 29 ए के 2388 तर ट्रॉली नं. एस ई एन एन पी 1038 डी एस एल डी हे ट्रॅक्टर एक ब्रास रेती घेऊन वाहतूक करतांना आज दि.6 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आढळले.

दरम्यान,महसूल पथकांच्या चमूने स्पॉट चौकशी केली असता विना परवाना ट्रॅक्टर असलेले निदर्शनास आले. मंडळ अधिकारी गुघाणे यांनी कारवाई करित सदर ट्रॅक्टर जप्त तहसील कार्यालयात जमा केले असून ट्रॅक्टर मालक सुरज प्रकाश टोंगे रा. वेगांव यांच्या मालकीचे आहे.




हातात धारदार शस्त्र बाळगून धुमाकूळ घालणाऱ्या तरुणास केली अटक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरात पेट्रोलिंग करीत असताना वणी पोलिसांना  माहीती मिळाली की, एक इसम हातात धारधार शस्त्र घेऊन दिपक टॉकीज परीसरात दहशत निर्माण करीत आहे. ही घटना 5 जुलै रोजी घडली.

माहितीच्या आधारे पोलीस दिपक चौपाटी जवळील दिपक बार येथे पोहचले असता, तिथे अरविंद केशव तांबे (41) रा. सेवानगर (वणी) हा इसम धारदार तलवार घेऊन धुमाकूळ घालत असल्याचे निदर्शनास आले. सदर आरोपी विरुद्ध 4,5 शस्त्र अधिनियम सहकलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली.

सदरची कारवाई डॉ. पवन बनसोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, ना. गणेश किंद्रे उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात पो.नि. अजित जाधव, ठाणेदार पोलीस स्टेशन पोउपनि माधव शिंदे, आशिष झिमटे, सुहास मंदावार, डगमल, शंकर चौधरी, विशाल गेडाम, यांनी केली.

आजचे राशीभविष्य : ६ जुलै गुरुवार..!

             आजचे राशीभविष्य : ६ जुलै गुरुवार..!

मेष :-
मेष राशीच्या लोकांना इतरांच्या मदतीमुळे आराम मिळेल, त्यामुळे दिवस परोपकारात जाईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुम्ही तुमच्या चांगल्या वागण्याने वातावरण सामान्य करू शकाल. तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे तुम्हाला संध्याकाळी धावपळ करावी लागू शकते.

वृषभ :-
वृषभ राशीच्या लोकांचा कुटुंबियांसोबत आनंदाचा काळ जाईल. सुदैवाने दुपारपर्यंत करिअर आणि व्यवसायाबाबत चांगली बातमी मिळेल. कामासोबतच आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. संध्याकाळी दीर्घ-प्रतीक्षित अतिथीच्या आगमनाचा आनंद असू शकतो. मित्रांसोबत काही शुभ कार्यात सहभागी झाल्याने तुमचा आदर वाढेल.

मिथुन :-
देवतेच्या आशीर्वादाने मिथुन राशीच्या लोकांची कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. कार्यक्षेत्रात व्यस्तता राहील आणि अनावश्यक खर्च टाळा. संध्याकाळी वाहने वापरताना काळजी घ्या. प्रिय आणि महापुरुषांच्या दर्शनाने मनोबल वाढेल. जोडीदारासोबत नवीन कामाचे नियोजन करू शकाल.

कर्क :-
तुम्हाला अचानक मोठी रक्कम मिळू शकेल, ज्यामुळे निधीची स्थिती मजबूत होईल. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. सामाजिक कार्यामुळे मान-प्रतिष्ठा वाढेल. घाईगडबडीत आणि भावनेने घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकतो. सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत देव दर्शनाचा लाभ घेणार आहेत.

सिंह :-
सिंह राशीच्या लोकांना राजकीय क्षेत्रात आश्वासक यश मिळेल. समाजाप्रती जबाबदारी पार पडेल. नोकरीच्या ठिकाणी स्पर्धेच्या क्षेत्रात पुढे जाईल आणि रखडलेली कामेही पूर्ण होतील. मंद पचन आणि डोळ्यांचे विकार संभवतात. संध्याकाळचा वेळ प्रियजनांसोबत हास्यविनोदात व्यतीत होईल. अन्न नियंत्रणाची विशेष काळजी घ्या.

कन्या :-
राशीचा स्वामी बुध कर्क राशीतील अकराव्या शुक्राशी संयोग साधत आहे. वृद्धांच्या सेवेसाठी व सत्कर्मावर पैसा खर्च केल्यास मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी बनून राहाल. वैवाहिक जीवनात सुखद परिस्थिती निर्माण होईल. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि मित्रांसोबत भागीदारीच्या कोणत्याही कामात काम करू शकता.

तूळ :-
तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि स्पर्धेच्या कार्य क्षेत्रात चांगले यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. वक्तृत्वामुळे तुम्हाला विशेष सन्मान मिळेल. जास्त धावल्यामुळे हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, काळजी घ्या. जोडीदाराची साथ आणि पुरेशा प्रमाणात मिळेल. प्रवासाची व देशाची स्थिती आनंददायी व लाभदायक राहील.

वृश्चिक :-
वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत असेल. यासोबतच धन, मान-सन्मान, कीर्ती, कीर्ती वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेले व्यावसायिक काम यशस्वी होईल, तसेच प्रियजनांशी भेट होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवला नाही तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. संध्याकाळी, प्रियजनांना भेटण्याची आणि मजा करण्याची संधी मिळेल.

धनु :-
धनु राशीच्या लोकांना घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करावे लागतील. सांसारिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. अधीनस्थ कर्मचारी किंवा नातेवाईकामुळे तणाव वाढू शकतो. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, अन्यथा पैसे अडकू शकतात. तुम्हाला कोर्टात फेऱ्या माराव्या लागतील, ज्यामध्ये तुमचा विजय होईल. तुमच्याविरुद्धचे षडयंत्र अयशस्वी होतील.

मकर :-
मकर राशीच्या लोकांना व्यापार क्षेत्रात अनुकूल नफा मिळाल्याने आनंद होईल. करिअर आणि आर्थिक बाबतीत परिस्थिती मजबूत असेल. व्यवसायात बदल करण्याचे नियोजन केले जात आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. धार्मिक स्थळांच्या प्रवासाचे संदर्भ संध्याकाळी प्रचलित होतील आणि पुढे ढकलले जातील. वाहन वापरताना काळजी घ्या.

कुंभ :-
राशीचा स्वामी शनीच्या क्षणिक स्थितीमुळे आईच्या अचानक शारीरिक त्रासामुळे धावपळ आणि जास्त खर्चाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मालमत्तेची खरेदी-विक्री करताना त्यापूर्वी त्या मालमत्तेच्या सर्व कायदेशीर बाबींचा गांभीर्याने विचार करा. संध्याकाळी आईची तब्येत सुधारेल आणि पूर्णपणे बरे होण्यास वेळ लागेल.

मीन :-
मीन राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सुखकर राहील. जवळचा आणि दूरचा सकारात्मक प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक व्यवसायात वाढत्या प्रगतीमुळे खूप आनंद मिळेल. विद्यार्थ्यांची मानसिक बौद्धिक भार दूर होईल. संध्याकाळी मित्रांसोबत हँग आउट करताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. तुमचे मनही रिलॅक्स होईल. पालकांचा सल्ला आणि आशीर्वाद उपयुक्त ठरतील.


प्रति ब्रास ६०० रुपये दराने मिळणाऱ्या शासनाच्या रेतीची घरकुल धारकांना प्रतीक्षा

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील घरकुलांची अपूर्ण कामे १५ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज (ता.५ जुलै) येथे दिले. मात्र ऑनलाईन नोंद असणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांच्या नावांना अजूनही रेती मिळाली नसल्याने लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम अर्धवट पडले, तर काही घरकुला सह इतर कामे  ठप्प आहेत. तालुक्यातील अद्यापपर्यंत घरकुल धारकांना रेती मिळाली नसल्याने त्यांचे जीर्ण घरात वास्तव्य आहे. यामुळे अशा वातावरणात भीतभीत वास्तव्य करावे लागत असून लोकप्रतिनिधी,प्रशासनाने तत्काळ घरकुल धारकांना रेती मिळावी अशी एकीकडे आग्रही मागणी जोर धरत तर दुसरीकडे तीव्र रोष'ही आहे.

नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे. मारेगाव तालुक्यातील कोसारा रेती घाटाला परवानगी मिळाल्यावर डेपो सुरु झाला, परंतु तालुक्यातील घरकुल व इतर बांधकामांना रेती अद्यापपर्यंत मिळाली नसल्याने यासाठी निवेदन, आंदोलन करण्यात आले. प्रथम तालुक्यातील घरकुल धारकांना प्राध्यान द्या! अशी मागणी असतांना देखील कणभर रेती मिळाली नसून घरकुलांचे बांधकाम ठप्प आहे. परंतु ऑनलाईन नोंद असलेल्या लाभार्थ्यांना नावांना अद्याप पुरवठा झाला नाही. पाणी मुरते कुठे? त्यामुळे आपसूकच शंकेचे घर निर्माण होत आहे. शिवाय तालुक्याला डावलून जिल्ह्यात रेती रवाना होत असल्याचे हल्लाबोल आंदोलनादरम्यान, नागरिकांनी विविध तक्रार केल्या. पावसाळा सुरु झाला त्यांना घरकुल बांधकाम पुर्ण करण्यासाठी रेती अभावी प्रतीक्षा करावी लागत आहे. वरून राजा कधी धो धो बरसेल याचा नेम नाही. परिणामी गावातील नागरिकांसह इतर बांधकाम रखडले आहेत. यामुळे प्रशासनावर संताप व्यक्त होत असून रेती मिळणार कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तालुका स्तरावर लाभार्थी रेती साठी वणवण भटकत असून आज मिळेल, उद्या मिळेल रेती मिळेल या आशेने सामान्य नागरिक वाट पाहत असून, प्रशासनाच्या ढिम्म धोरणाने लाभार्थी चक्रावले आहेत. शासनाच्या डेपोतून गरिबांना प्रति ब्रास 600 रुपये दराणं देणारे धोरण संशयाच्या भोवऱ्यात असून "स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती! ही शासनाची घोषणा फेल ठरत असल्याचे आरोप तालुक्यातील लाभार्थी करीत आहेत.

मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता का; उच्च शिक्षणासाठी आधार देणारी ‘स्वाधार’ योजना


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने  शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. उच्च शिक्षणासाठी  प्रवेश मिळालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मर्यादित जागांमुळे शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना शहरातील खर्च परवडत नसल्यामुळे ते उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमुळे अनुसूचित जाती व नवबौद्व प्रवर्गातील अनेक होतकरु विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत आहे.

इयत्ता 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असतात. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर मर्यादित जागांमुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळेलच याची शाश्वती नसते. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळून देखील उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे स्वप्न भंग होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्यात येते.

मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर याठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 32 हजार रुपये भोजन भत्ता, 20 हजार रुपये निवास भत्ता आणि 8 हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण 60 हजार रुपये दरवर्षी दिले जातात. इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 28 हजार रुपये भोजन भत्ता, 15 हजार रुपये निवास भत्ता आणि 8 हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण 51 हजार रुपये दरवर्षी आणि उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 25 हजार रुपये भोजन भत्ता, 12 हजार रुपये निवास भत्ता, 6 हजार रुपये निर्वाह भत्ता असे एकूण 43 हजार रुपये रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. या व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी  दरवर्षी 5 हजार रुपये आणि इतर शाखेतील विद्यार्थ्यांना 2 हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात दिले जातात.


योजनेसाठी पात्रता

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. विद्यार्थ्यास इयत्ता दहावी, अकरावी, बारावी, पदविका, पदवीमध्ये किमान 50 टक्केपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असून गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के आहे. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, तेथील तो स्थानिक रहिवाशी नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच महानगरपालिका हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेली यामध्ये शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला अभ्यासक्रम दोन वर्षापेक्षा कमी कालाधीचा नसावा. तसेच विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्केपेक्षा जास्त असणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येते. या योजनेसाठी खास बाब सवलत लागू नाही.


अर्जासाठी संपर्क

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थी ज्या जिल्ह्यामध्ये शिक्षण घेत आहे, त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज सादर करावेत.


अनुदान वितरणाची पध्दत

सहायक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छाननी करतील व त्यांची गुणवत्ता यादी जिल्हानिहाय तयार करुन पात्र लाभार्थ्यांना त्याने घेतलेल्या प्रवेशाचे जिल्ह्यातील जवळचे मागासवर्गीय मुलां/मुलींचे वसतिगृहाशी संलग्न करतील. शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी सबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अनुज्ञेय रक्कमेपैकी पहिल्या सहामाहीची रक्कम आधार संलग्न खात्यावर आगावू जमा करण्यात येते. पात्र विद्यार्थ्यास भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होत असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करुन उर्वरित निर्वाह भत्ता, भोजन भत्ता, निवास भत्ता याची रक्कम दिली जाते. विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के असल्याचे सबंधित संस्थेचे प्रत्येक सहामाही उपस्थिती प्रमाणपत्र ऑनलाईन पोर्टलद्वारे सादर करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयातील 75 टक्केपेक्षा अधिक उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न खात्यावर जमा करण्यात येते.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली