जादुटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती वाढवावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सूचना

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

नागपूर : जादुटोणा विरोधी कायदाबाबत जनसामान्यांना विविध माध्यमातून माहिती देण्यात यावी तसेच अधिक जनजागृती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी विभागीय समितीच्या आढावा बैठकीत आयुक्त बिदरी बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.बी.वटी, पोलिस निरीक्षक सी.एस. कापसे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त बिदरी यांनी याप्रसंगी जादूटोणा विषयक गैरसमजुतीतून नागपूर विभागात कोणाचे शोषण किंवा छळ झाले आहे का याबाबत विचारणा करून माहिती घेतली. तसेच जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीत विभागीय समन्वयक म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्तीचे प्रस्ताव लवकरात लकवर पाठविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला समाज कल्याण, पोलिस, आदिवासी कल्याण, शालेय शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मारेगाव पंचायत समितीकडे विद्यार्थ्यांनी मांडली व्यथा..

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : नुकत्याच ऑनलाईन (online) झालेल्या बदल्यामध्ये मारेगाव तालुक्यातील सिंदी येथील दोन शिक्षकांची बदली झाली. विद्यार्थी प्रिय असलेल्या या शिक्षकांच्या बदली थांबवावी,अशी मागणी करीत सिंदी येथील पालक व विद्यार्थी मारेगाव पंचायत समितीवर धडकले.

यावेळी गटविकासधिकारी किशोर गज्जलवार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील सिंदी (महागाव) येथील जि.प. शाळेत वर्ग १ ते ७ वी पर्यंत ५८ विद्यार्थी अध्ययन करीत आहे आणि या विद्यार्थ्यांच्या अध्यापनाकरिता तीन शिक्षक आहेत.

नुकत्याच ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्याझाल्या यामध्ये येथील दोन शिक्षकांची बदली झाली. या अवस्थेत विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी फक्त एकच शिक्षक उरल्याने आता एक शिक्षक आणि ७ वर्ग. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होणार असून, याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, यासाठी पालकांसोबत विद्यार्थीही पंचायत समिती च्या दालनात पोहचले आणि आमच्या शिक्षकांची बदली थांबवण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे बघता हाल किंबहुना विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त सावर्ला येथे सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यात आली

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : मौजे सावर्ला येथे ५ फेब्रुवारी २०२३ रोजी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथी चे औचित्य साधून सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यात आली. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोतराव चोपणे माजी सरपंच सावर्ला हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी, सौ. कुंदा चोपणे सरपंच सावर्ला, भैय्याजी पिंपळकर, अरूणभाऊ राजुरकर, श्यामराव देठे, कु.स्वाती आवारी, सौ. कविता अवगान आदी उपस्थित होते.

याप्रसंगी संजय खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड वणी यांचा नामदेव घोडमारे व भैय्याजी केळझरकर यांच्याहस्ते 'ग्रामभुषण पुरस्कार' देऊन शाल श्रीफळ, ग्रामगीता व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी संजय खाडे म्हणाले कि, ग्रामिण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेस तयार होण्यासाठी हा उपक्रम भविष्याचा वेध घेणारा आहे. यावेळी संजय खाडे यांच्यातर्फे श्री गुरूदेव वाचनालयास दहा हजार रूपये किंमतीचे पुस्तकं भेट देण्यात आली.
यावेळी अ, गटात कु.सुहानी चोपणे, कु.सुरभी चोपणे, कु.सानिया आवारी, कु.भाग्यश्री आवारी, कु.आस्था झाडे, कु.आचल खामनकर व ब, गटातील कु.उत्कर्षा पिंपळकर, कु.प्रांजली आवारी, कु.मयुरी पिंपळकर, कु.कोमल चिव्हाणे, कु.सोनु चोपने, कु.संकिता चोपने, कु.साक्षी मालेकर या विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

जयंती निमित्ताने रामधुन, किर्तन, भजन व महाप्रसाद असे कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल तुराणकर, संचालन नारायण मांडवकर तर आभार कु.श्वेता पिंपळकर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ, श्री गुरूदेव वाचनालय व समस्त ग्रामस्थ सावर्ला यांच्या वतीने करण्यात आले.

अ‍ॅड. देविदास काळे यांचे सभासद व ठेवीदारांना जाहीर आवाहन




सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

वणी : विदर्भात नावाजलेली पतसंस्था म्हणून रंगनाथ स्वामी ओळखली जाते. दररोज या पतसंस्थेत करोडोची उलाढाल होत असते, गेली अनेक वर्षांपासून पतसंस्थेचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु कामावर कमी कमी केलेल्या कर्मचारी व अभिकर्त्यांनी पत्रपरिषद घेवून संस्थेविरुद्ध आरोप करित ग्राहकात संभ्रम निर्माण करून दिशाभूल केल्याने, ग्राहक पतसंस्थेत येवून नेमकं काय भानगड आहे म्हणून सहजच चौकशी करून जातात. पतसंस्थेवर ग्राहकांचा व ठेवीदारांचा विश्वास कायम आहे. आता मात्र, निव्वळ बदनामीसाठी केल्याने त्यांचेविरुद्ध पतसंस्थेकडून ठोस पाऊल उचलले जात आहे. 

श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था, वणी च्या वतीने सर्व सभासद, ठेवीदार यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, दि.२७/१/२०२३ रोजी वर्तमानपत्राद्वारे संस्थेमध्ये आर्थिक घोटाळा करणारे व संस्थेतून कायम निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी व अभिकर्त्यांनी यवतमाळ येथे पत्रपरिषद घेवून पतसंस्थेविरुद्ध अफवा पसरवली. त्या अफवावर सभासद व ठेवीदारांनी विश्वास ठेवू नये. असे  परिपत्रक माध्यमातून दि.७ फेब्रुवारी ला जारी केले आहे.

परीपत्रकात पुढे असेही नमूद केले आहे की, आमच्या पतसंस्थेत ज्या ठेवी आहेत, त्या सुरक्षित आहेत. पतसंस्थेत जी ग्राहक व ठेवीदारांची गर्दी होती. ती गर्दी अफवाची शहानिशा करण्यासाठी होती. आता ग्राहकांनी व ठेवीदारांनी केलेल्या शहानिशेनंतर ग्राहकाचा व ठेवीदारांचा पतसंस्थेवरील विश्वास कायम झाला आहे. ज्या ठेवीदारांच्या ठेवी ची मुदत संपली आहे, ते ठेवीदार आपल्या ठेवी पूर्ववत संस्थेमध्ये दीर्घ मुदतीसाठी जमा करित आहेत. तसेच ज्यांची मुदत संपली आहे त्यांना त्यांच्या मागणीनुसार आमची पतसंस्था रक्कम परत करित आहे. संस्थेमध्ये आर्थिक घोटाळे केल्यानंतर संस्थेतून कायम निलंबित केलेल्या कर्मचारी व अभिकर्त्यांनी पतसंस्थेची नाहक बदनामी करत ठेवीदारांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात पतसंस्था न्यायालीन कार्यवाही करित आहे.

आमच्या पतसंस्था वर आपण जो आजपर्यंत विश्वास ठेवला, तो विश्वास पुढेही असाच ठेवून पतसंस्थेला सहकार्य करावे असं त्यात म्हटलं आहे. असे जाहीर आवाहन श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे यांनी केले आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना मिळणार हक्काची घरे

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना "सर्वांसाठी घरे" योजनेत घरे, तसेच वैमानिक प्रशिक्षण यासह महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या सूचनांवर आज आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावीत यांनी हे निर्णय घेतले आहेत.

आज दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूर महसूलीविभागाची जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम प्रारुप आराखडा २०२३-२४ संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्या संदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या होत्या. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी या सर्व सूचना तात्काळ स्वीकारल्या.

आजच्या निर्णयांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना "सर्वांसाठी घरे" या योजनेतंर्गत घरकुले उपलब्ध करुन देण्यात येतील. या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष प्रयत्नही करण्याची आवश्यकताही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी विशद केली होती. त्यावरही योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन आदिवासी विकासमंत्र्यांनी दिले आहे.

जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना चंद्रपूर फ्लाईंग क्लब येथे वैमानिक प्रशिक्षण देण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रामधून प्लग अँड प्ले युनिटससाठी आदिवासी विभाग वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्वत:ची घरे नसणाऱ्या आदिवासी बांधवाना ड गटाचा विचार न करता घरे बांधून देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या चारही सूचना महत्त्वपूर्ण आणि योग्य आहेत त्यामुळे त्या सर्व स्वीकारण्यात येत आहेत असे बैठकीचे अध्यक्ष व आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी सांगितले. या चार महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.