जादुटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती वाढवावी – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या सूचना

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

नागपूर : जादुटोणा विरोधी कायदाबाबत जनसामान्यांना विविध माध्यमातून माहिती देण्यात यावी तसेच अधिक जनजागृती वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात जादुटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी विभागीय समितीच्या आढावा बैठकीत आयुक्त बिदरी बोलत होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, आदिवासी विकास विभागाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस.बी.वटी, पोलिस निरीक्षक सी.एस. कापसे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

आयुक्त बिदरी यांनी याप्रसंगी जादूटोणा विषयक गैरसमजुतीतून नागपूर विभागात कोणाचे शोषण किंवा छळ झाले आहे का याबाबत विचारणा करून माहिती घेतली. तसेच जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रसार करण्यासाठी नेमलेल्या समितीत विभागीय समन्वयक म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्तीचे प्रस्ताव लवकरात लकवर पाठविण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला समाज कल्याण, पोलिस, आदिवासी कल्याण, शालेय शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Previous Post Next Post