टॉप बातम्या

महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली?

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के

महागाव : तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य घरकुल योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुलांची मंजुरी मिळाली असली, तरी शासनाच्या स्पष्ट आदेशानुसार देण्यात येणारी पाच ब्रास मोफत वाळू अद्यापही लाभार्थ्यांना मिळालेली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी अनेक घरकुलांची बांधकामे अर्धवट अवस्थेत अडकली असून लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

कासाळबेळ परिसरातील नागरिकांनी तक्रार करताना सांगितले की, ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडून वाळू देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. महसूल मंत्री व शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र महागाव तालुक्यात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, वरुडी येथील वाळू घाटावरून घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, यासाठी नागरिकांना आंदोलनाचा इशारा द्यावा लागत आहे. विशेष म्हणजे, फिटनेस व विमा नसलेले टिप्पर खुलेआम वाळू वाहतूक करताना दिसत असताना, शासनाच्या योजनेंतील गरीब व गरजू लाभार्थ्यांना मात्र वाळूपासून वंचित ठेवले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे महसूल मंत्र्यांच्या आदेशालाच महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे काय? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारी याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करतील का, तसेच घरकुल लाभार्थ्यांना तातडीने वाळू उपलब्ध करून दिली जाईल का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();