टॉप बातम्या

निलंबित पटवार्‍यांच्या समर्थनार्थ मारेगावात धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : विदर्भ पटवारी संघ नागपूर, जिल्हा शाखा यवतमाळ (उपविभाग शाखा वणी) यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यावरील निलंबनाच्या निषेधार्थ व निलंबित पटवार्‍यांच्या समर्थनार्थ सोमवारी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या पटवार्‍यांनी हाताला काळ्या फिती बांधून प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.

नेर तालुक्यातील चार ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर करण्यात आलेल्या निलंबन कारवाईसह संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. 

संघटनेने जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्यासह चार ग्राम महसूल अधिकाऱ्यांवरील निलंबन तातडीने मागे घेण्याची मागणी केली. तसेच नेर तहसीलदारांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, खंडित झालेले वेतन तातडीने अदा करावे आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांवरील पूर्वीच्या कारवाईबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष निरंजन पाचपाई यांनी भरत पिसे हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे सांगत त्यांच्यावरील निलंबन अन्यायकारक असल्याचा आरोप केला. 

प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास वणी उपविभागासह संपूर्ण जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला व पुरुष ग्राम महसूल अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();