टॉप बातम्या

वणी पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारू वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात वणी पोलिसांनी सोमवारी धडक कारवाई करत तीन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत फॉर्च्युनर कार, दुचाकी आणि विविध कंपन्यांचा दारूचा साठा असा एकूण 20 लाख 13 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास दीपक चौपाटी परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. एका काळ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमधून आणि दुचाकीवरून अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. घुग्घुस रोडवर संशयित फॉर्च्युनर (MH 42 BE 9395) अडवून तपासणी केली असता वाहनात 27 हजार 730 रुपयांचा दारूचा साठा आढळून आला. याप्रकरणी शिंदोला येथील भारत प्रमोद टोंगे याला ताब्यात घेण्यात आले.

यानंतर काही वेळातच पटवारी कॉलनीकडे जाणाऱ्या दुचाकी (MH 29 BB 0308) वर संशयित हालचाल दिसून आल्याने पोलिसांनी तपासणी केली. दुचाकीवरील मोठ्या पिशवीत 6 हजार 240 रुपयांचा अवैध दारूचा साठा मिळून आला. याप्रकरणी सुमित उद्धव झुंगे (वय 19) व शुभम अनंता वाघमारे, दोघेही रा. लालगुडा, ता. वणी, यांना अटक करण्यात आली.

या कारवाईत फॉर्च्युनर कार (किंमत 19 लाख रुपये), दुचाकी (किंमत 80 हजार रुपये) आणि दारूचा साठा असा एकूण 20,13,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिटुरकर यांच्या नेतृत्वात पोउनि साजिद सय्यद, पोहेकॉ. गजानन सावसाकडे, मारोती पाटील, पुरुषोत्तम इडमल, रितेश भोयर, मनोहर खंडे, नंदकुमार पुप्पलवार, माधव दहिकांबळे व गजानन कुम्भमे यांनी पार पाडली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();