टॉप बातम्या

वणी पोलिसांची मोठी कारवाई; 19.27 ग्रॅम एम.डी. अमली पदार्थासह 1.49 लाखांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : दि. 20 जून : वणी शहरात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान पोस्टे वणी पोलिसांनी मोठी कारवाई करत 19.27 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत अमली पदार्थासह मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 49 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली वणी शहरातील गोपनीय माहितीच्या आधारे 19 जून रोजी रात्री 9.45 वाजता गणेशपूर रोड परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी कौतुक उर्फ गोंदू दिलीप मेश्राम (वय 28, रा. तेलीफैल, वणी) याच्या ताब्यातील प्लास्टिक पाऊचमध्ये 19.27 ग्रॅम एम.डी. अमली पदार्थ आढळून आला. त्याची किंमत 1 लाख 34 हजार 890 असून त्याच्याकडील 15 हजार किमतीचा मोबाईलही जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान हा अमली पदार्थ प्रज्यात उर्फ कोंकरोज महेश उपरे (वय 27, रा. तेलीफैल, वणी) याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोस्टे वणी येथे गुन्हा क्रमांक 514/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, वणी पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल असलेल्या एम.डी. पदार्थ विक्री प्रकरणातील गुन्हा क्रमांक 479/2026 मध्ये सहभागी असलेल्या प्रज्यात महेश उपरे, अविनाश विजय पाटील (रा. छोरिया ले-आऊट, वणी) व रविंद्र धनराज गुप्ता (रा. रंगनाथ नगर, वणी) या आरोपींनाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक रॉबिन बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिठुकर यांच्या नेतृत्वात वणी पोलिसांच्या पथकाने पार पाडली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();