| ImageAI |
सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एका युवकाला एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 67 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन वणी येथे दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 479/2026 अंतर्गत तपास सुरू असताना अटकेत असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवून अक्षय उर्फ गोलू माधव पेचे (वय 27, रा. बरोरा, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेतले.
त्याची कायदेशीर अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 7.54 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत 52 हजार 780 रुपये असून त्यासोबत एक अँड्रॉइड मोबाईल (15 हजार रुपये) असा एकूण 67 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरीक्षक सुयोग महापुरे, पोउपनिरीक्षक साजिद सय्यद, पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, मोनेश्वर खंडरे, नंदकुमार पुष्पलवार, निलेश आत्रे आणि शाम राठोड यांनी सहभाग घेतला.
वणी पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


