सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मार्डी परिसरात शनिवारी (१४ जून) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. मच्छिन्द्रा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले असून काही घरांची छते उडाली, तर काही शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणांचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे नांदेपेरा–मच्छिन्द्रा या राज्य मार्गावर बाभळीचे झाडे मुळासकट उन्मळून पडले. हा मार्ग परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने येथे दिवस-रात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, घटनेला तब्बल पाच दिवस उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी प्रशासनातील संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले की नाही, याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर पडलेली झाडे अद्याप हटविण्यात आलेली नसल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच रस्त्यावरील पडलेली झाडे हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.


