टॉप बातम्या

"आदिवासी महिला नगराध्यक्षांचा अपमान सहन करणार नाही; कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा"

यवतमाळ | ऑनलाईन 

यवतमाळ : नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शिनी  उईके यांच्या कथित अपमानप्रकरणी आदिवासी समाज आक्रमक झाला असून, दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. आदिवासी सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग घेत रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला. मोर्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यवतमाळ नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच एका आदिवासी महिलेला नगराध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. मात्र हा सन्मान काही जणांना सहन होत नसल्याने त्यांना सातत्याने सोशल मीडिया व इतर माध्यमांतून लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, ११ जून २०२६ रोजी नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शिनी उईके यांच्या कार्यालयात काही व्यक्तींनी बळजबरीने प्रवेश करून एकेरी भाषेत बोलत त्यांचा अपमान केला. यामध्ये बबूल देशमुख, वैशाली प्रविण सवई, कृष्णा पुसनाके यांच्यासह इतर काही जणांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सध्या यवतमाळ शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असून ती प्रशासनाची नियमित व कायदेशीर प्रक्रिया असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत अतिक्रमण कारवाईविरोधात दबाव निर्माण करणे आणि नगर परिषदेच्या कामकाजात अडथळे आणणे हे गैरकायदेशीर असल्याचा आरोप आदिवासी समाजाने केला आहे.
मोर्चादरम्यान "आदिवासी महिला नगराध्यक्षांचा अपमान सहन केला जाणार नाही", "दोषींवर तात्काळ कारवाई करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.
निवेदनात संबंधित व्यक्तींवर शासकीय कामात अडथळा आणणे, नगराध्यक्षांचा अपमान करणे आणि कार्यालयात घुसून दादागिरी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात त्वरित कारवाई न झाल्यास आदिवासी समाज आणखी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या मोर्चामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();