सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील बोरी (खुर्द) येथे स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांवर अत्यंत वेदनादायी प्रसंग ओढवला. गावात अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नसल्यामुळे मृत व्यक्तीवर अखेर ग्रामपंचायत आवारातच अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावातील मूलभूत सुविधांच्या अभावाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, या मागणीकडे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज ही दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करावे लागल्याने गावात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असून, त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र बोरी (खुर्द) येथील घटना ही ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण ठरत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे बोरी (खुर्द) येथे तातडीने कायमस्वरूपी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे तत्काळ लक्ष न दिल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही घटना केवळ एका गावाची समस्या नसून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या नियोजनाबाबत प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित करणारी आहे.

