सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वणी–नांदेपेरा राज्य मार्ग क्रमांक 317 वरील देवी फाट्यापासून नांदेपेरा दिशेने जाताना रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो लहान-मोठी वाहने प्रवास करत असतानाही संबंधित विभागाने अद्याप दुरुस्तीची कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वनोजा देवी फाट्यापासून काही अंतरावर रस्त्याच्या अगदी मध्यभागी हा मोठा खड्डा पडला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना हा खड्डा चुकवताना मोठी कसरत करावी लागत असून, समोरून येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात हा खड्डा पाण्याखाली झाकला जात असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा या समस्येकडे लक्ष वेधले असतानाही संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप दखल घेतलेली नाही. एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नौकरी,विद्यार्थ्यांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या धोकादायक खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून संबंधित विभागाकडे जोर धरत आहे.