सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वणी येथील एस. बी. लॉन येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तसेच मारेगाव भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाशभाऊ लांबट यांनी मारेगाव तालुक्यातील विविध विकासात्मक व लोकहिताच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी मारेगाव व वणी तालुक्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील त्रुटी, मारेगाव तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, प्रलंबित विकासकामांना गती देणे, तसेच नागरिकांच्या विविध लोकहिताच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. नागरिकांच्या समस्या थेट शासनापर्यंत पोहोचवून त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही सकारात्मक विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी मारेगाव येथे जनता दरबार आयोजित करण्याबाबतही चर्चा झाली. जनता दरबाराची तारीख लवकरच निश्चित करून जाहीर करण्यात येईल, अशी माहिती माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तसेच आदिवासी विकास मंत्र्यांनी दिली.
या बैठकीमुळे मारेगाव तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल, तसेच तालुक्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

