सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
राळेगाव : दहावी व बारावीच्या शालांत परीक्षेत 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या राळेगाव शहर व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा आज, रविवार (दि. 2 ऑगस्ट) रोजी सकाळी 11 वाजता राळेगाव येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
हा उपक्रम राहुल मेश्राम यांच्या पुढाकाराने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येत असून, यावेळी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांचीही उपस्थिती लाभणार आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी प्रेरणा देणे हा आहे. सोहळ्यात विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, शैक्षणिक भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालकांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम, दिलेले प्रोत्साहन आणि जपलेले संस्कार यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजक राहुल मेश्राम यांनी सांगितले.
राळेगाव शहर व तालुक्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह उपस्थित राहून या गौरव सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक राहुल मेश्राम यांनी केले आहे.