सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : मोबाईल फोनवर येणाऱ्या अनोळखी कॉलद्वारे फसवणूक करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या डिजिटल व्यवहारांच्या काळात सायबर गुन्हेगार विविध क्लुप्त्या वापरून नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याने खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनेकदा अनोळखी क्रमांकावरून कॉल येऊन ‘हॅलो’ म्हणताच कॉल कट केला जातो. तसेच काही जण ग्राहक सेवा प्रतिनिधी, बँक अधिकारी किंवा अन्य संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांकडून वैयक्तिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारांमुळे बँक खात्यांची माहिती, वैयक्तिक डेटा आणि आर्थिक व्यवहार धोक्यात येण्याची शक्यता असते.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा इतर गोपनीय तपशील शेअर करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यवतमाळ पोलिसांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक राहण्याचे आणि फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळेच अशा सायबर गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

