टॉप बातम्या

अवैध धंद्यामुळे महिला त्रस्त; धडक कारवाईची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : यवतमाळ जिल्हा पोलिसांकडून गांजा, हातभट्टी अड्डे, गोवंशाची अवैध वाहतूक, एमडी ड्रग्ज आणि इतर अमली पदार्थांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत असताना मारेगाव तालुक्यातील वरली मटका आणि अवैध दारू विक्री मात्र अद्यापही राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महिला वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून संबंधित यंत्रणांनी तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध दारूची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे दारूच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असून त्याचा थेट परिणाम कुटुंब व्यवस्थेवर होत आहे. घराघरांत वाद-विवाद, भांडणे आणि कौटुंबिक तणाव वाढत असल्याने महिलांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दिवसभर कष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांना घरी परतल्यानंतरही शांततेचे वातावरण अनुभवायला मिळत नसल्याची खंत अनेक महिलांनी व्यक्त केली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींमुळे कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बिघडत असून मुलांच्या शिक्षणासह सामाजिक वातावरणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, संबंधित विभागांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महिला वर्गातून केला जात असून त्यामुळेच अवैध धंदे चालविणाऱ्यांचे मनोबल वाढल्याची चर्चा आहे.

जिल्हा पोलिसांनी ज्या तत्परतेने अमली पदार्थ आणि इतर अवैध कृत्यांविरोधात मोहीम उघडली आहे, त्याच धर्तीवर दारूबंदी विभागानेही अवैध दारू विक्री विरोधात विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

सुरक्षित, सुदृढ आणि व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी संबंधित विभागांनी कटीबद्धता दाखवून ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();