सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : "रक्तदान हेच श्रेष्ठ दान आणि मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा" या उदात्त विचाराला कृतीत उतरवत मारेगावातील साई मित्र परिवार यांच्यावतीने गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त यंदाही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या सलग १७ वर्षांपासून अपघातग्रस्त व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या एकमेव उद्देशाने रक्तदान शिबिराचे सातत्याने आयोजन करून साई मित्र परिवाराने समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे.
या महोत्सवानिमित्त मंगळवार, दि. २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून जगन्नाथ महाराज मंदिर, मारेगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी, यवतमाळ यांच्या सहकार्याने पार पडणार असून, प्रत्येक रक्तदात्याच्या एका रक्तपिशवीमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळू शकते, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.
त्यानंतर बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ५ वाजता जगन्नाथ महाराज मंदिरापासून भव्य शोभायात्रा उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात येणार आहे. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळणार आहे.
या सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमात मारेगाव व परिसरातील युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून जीवन वाचविण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, तसेच गुरुपौर्णिमा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन साई मित्र परिवार, मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.