सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : दिल्लीतील जंतर-मंतर येथे पेपर लीक प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी मारेगाव येथे सर्वपक्षीय व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, पालक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवत, पेपर लीक प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थी व पालकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक, जबाबदार आणि कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
पेपर लीक प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या तसेच आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आंदोलनानंतर तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संपूर्ण आंदोलन शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. यावेळी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

