सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी शहरात अमली पदार्थांच्या विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत वणी पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाला ३७० ग्रॅम गांजासह अटक केली. या कारवाईत गांजा, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण २८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक भानुदास पिडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील एकतानगर परिसरातील नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळ सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी संशयित सुजल मंगेश गोहोकर (वय २०, रा. एकतानगर, वणी) हा गांजा बाळगून विक्रीसाठी फिरत असल्याचे आढळून आले.
त्याच्या झडतीदरम्यान त्याच्याकडून ३७० ग्रॅम गांजा, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाईल असा एकूण २८,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल (पांढरकवडा विभाग, प्रभारी वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्या नेतृत्वात डी.बी. पथक प्रमुख पोउपनि सय्यद साजिद तसेच पोलीस कर्मचारी गजानन सावसाकडे, श्याम राठोड, गणेश मेश्राम, नंदकुमार पुप्पलवार, मोनेश्वर खंडरे, रितेश भोयर आणि चालक शुभम किन्नाके यांनी पार पाडली.

