टॉप बातम्या

विचारांना चालना देणाऱ्या 'WHATS IF EVERYTHING YOU WERE TAUGHT IS SLIGHTLY WRONG?' पुस्तकाचे प्रकाशन

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय तेलतूमडे यांचे चिरंजीव व युवा लेखक सिद्धांत संजय तेलतूमडे लिखित "WHATS IF EVERYTHING YOU WERE TAUGHT IS SLIGHTLY WRONG?" (जर तुम्हाला शिकवले गेलेले सर्व काही थोडेसे चुकीचे असेल तर?) या विचारप्रवर्तक इंग्रजी पुस्तकाचे रविवारी (दि.१९) वणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रकाशन करण्यात आले.

माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला आमदार संजय देरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्राचार्य सुशील बुजाडे, प्राचार्य गजानन राजूरकर, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, आरोग्य अधिकारी डॉ. समीर थेरे, वंदना गाणार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

'आजच्या डिजिटल युगात वाचन संस्कृती झपाट्याने कमी होत असताना पुस्तक हेच विचारांना दिशा देणारे आणि व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रभावी माध्यम आहे,' असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सततचा स्क्रीन टाइम, सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि त्यातून कमी होत चाललेली एकाग्रता या पार्श्वभूमीवर वाचनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा लेखक सिद्धांत तेलतूमडे यांनी आपल्या पहिल्याच पुस्तकातून पारंपरिक विचारांना प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवत वाचकांना चिकित्सक दृष्टीकोन स्वीकारण्याचा संदेश दिला आहे. त्यांच्या लेखनातून समृद्ध ज्ञान, सामाजिक भान आणि वैचारिक परिपक्वतेची झलक दिसून येते. भविष्यात ते लेखन क्षेत्रात निश्चितच भरीव कामगिरी करत 'फिनिक्स'प्रमाणे भरारी घेतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य संजय तेलतूमडे यांनी केले, तर दीपक डोहणे यांनी आभार प्रदर्शन केले. या प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();