सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर पालकांनी आणि ग्रामस्थांनी मारेगाव पंचायत समितीच्या आवारात विद्यार्थ्यांसह शाळा भरवत लक्ष वेधण्यात आले.
यावेळी पालकांनी प्रशासनाकडे शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी ठाम मागणी केली. "प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशाराही पालकवर्गाने दिला.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत शाळा व्यवस्थापन समितीने स्वतःच्या पुढाकाराने मानधन तत्त्वावर स्थानिक शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले असून, प्रशासनानेही शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात सरपंच ज्योस्ना कुमरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज वाढई, भास्कर सिडाम, वैशाली मोघे, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची बिकट अवस्था पुन्हा एकदा समोर आली असून, आता शिक्षण विभाग यावर कोणती ठोस कारवाई करतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


