सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के
महागाव : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना २१ जुलै २०२६ रोजी जंतरमंतर, नवी दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या अटकेच्या निषेधार्थ महागाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
महागाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील राठोड यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना न्याय्य मागण्यांसाठी राहुल गांधी शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झाले होते. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला आणि लोकप्रतिनिधींना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा व आपले मत व्यक्त करण्याचा घटनात्मक अधिकार आहे.
अशा परिस्थितीत राहुल गांधी यांना करण्यात आलेली अटक ही लोकशाही मूल्यांवर आघात असून, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त करत केंद्र सरकारने लोकशाहीचा सन्मान राखावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी शहराध्यक्ष शैलेश कोरपकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव भगवान पंडागळे, विधानसभा अध्यक्ष इमरान पठाण, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सिमाताई नरवाडे, माजी शहराध्यक्ष अरिफ सुरेय्या, नगरसेवक परवेज सुरेय्या, युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल मोहोकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शे. जावेद पठाण, अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष पुंडलिक भुरके, काँग्रेस कार्यकर्ते सुनील भवानकर तसेच शे. शाहरुख खान, अशोक भांगे, नितीन नरवाडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदनाची प्रत भारताच्या राष्ट्रपतींनाही पाठविण्यात आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.