सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी
मारेगाव : तालुक्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. वनोजा, लाखापूर, डोलडोंगरगाव आणि मच्छिन्द्रा परिसरातील नागरिकांवर अंधारात रात्र काढण्याची वेळ आली होती. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्षता आणि तत्परतेचे दर्शन घडवत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले.
सायंकाळी सुमारे 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळी पावसामुळे विद्युत यंत्रणेला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रिन्सिपल टेक्निशियन सुधाकर जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली अमोल धूमणे, प्रज्वल कुत्तरमारे, गजानन वैद्य आणि गिरीश पाचभाई, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
संध्याकाळी 5 वाजल्यापासून या कर्मचाऱ्यांनी अंधार, वेळेचे भान न ठेवता आणि प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता अखंड मेहनत घेत तुटलेल्या विद्युत तारा व यंत्रणेतील बिघाड दूर करण्याचे काम सुरू केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे मच्छिन्द्रा गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले.
महावितरणच्या या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तव्यनिष्ठेचे आणि सेवाभावाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत असून, संकटाच्या काळात जनतेला दिलासा देणाऱ्या या वीज योद्ध्यांचे आदिवासी टायगर सेना (ATS) चे यवतमाळ जिल्हा महासचिव अमोल कुमरे यांनी अभिनंदन केले.

