सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशन वणी येथे बार, रेस्टॉरंट, वाईन शॉप व बिअर शॉप चालकांची विशेष बैठक घेण्यात आली. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत एकूण 17 व्यवसायिक उपस्थित होते.
बैठकीदरम्यान व्यवसायिकांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी अथवा वेळेनंतर व्यवसाय सुरू ठेवू नये, 18 वर्षांखालील व्यक्तींना मद्य विक्री करू नये, तसेच बार, रेस्टॉरंट व परिसरात किमान एक महिन्याचा सीसीटीव्ही बॅकअप उपलब्ध राहील अशा पद्धतीने कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय व्यवसायाच्या ठिकाणी वाहन पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांची माहिती नोंदवून ठेवणे व संबंधित रजिस्टर नियमित अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.