टॉप बातम्या

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; रोहिणी कोरडी, मृग नक्षत्रही ठरले निराशाजनक


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. रोहिणी नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यानंतर मृग नक्षत्रातही समाधानकारक पाऊस न पडल्याने पिकांच्या उगवणीवर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पेरणी केलेले बियाणे जमिनीतच अडकून पडले आहे.

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस आदी पिकांची पेरणी केली होती. सुरुवातीला झालेल्या तुरळक पावसामुळे पेरणीला वेग आला; मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळाला नाही. परिणामी अनेक शेतांमध्ये उगवण कमी झाली असून काही ठिकाणी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत.

महागडे बियाणे, खतांचा वाढता खर्च आणि मशागतीवरील खर्च करूनही पावसाअभावी शेतकऱ्यांची गुंतवणूक धोक्यात आली आहे. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून पावसाची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी प्रत्यक्षात पाऊस न पडल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. शासनाने परिस्थितीची दखल घेऊन पिकांची पाहणी करावी तसेच दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();