सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : देवाळा येथील शेतकरी दिलीप देवराव पिंपळशेंडे यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. देवाळा शिवारातील गट क्रमांक 40 मध्ये असलेल्या त्यांच्या चार एकर शेतात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अंदाजे 6.30 वाजताच्या सुमारास शेजारील शेतकऱ्यांनी फोन करून पिंपळशेंडे यांना त्यांच्या शेतातील गोठ्याला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे दिसून आले. या आगीत सुमारे 60 पाईप, 16 स्प्रिंकलर, शेतीची विविध अवजारे, तीन ते चार गोणे कुटार तसेच टिनाचे शेड पूर्णतः जळून खाक झाले. मात्र ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्यापतरी समोर आले नाही.
घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सुदैवाने गोठ्याबाहेर बांधून ठेवलेली बैलजोडी सुरक्षित राहिल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, शेती हंगामाच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.


