महागाव (सिंधी) येथील सोसायटी पुन्हा खापणे गटाच्या ताब्यात


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : सहकार क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या व चुराशीमध्ये झालेल्या निवडणुकीत महागाव (सिंधी) येथील सोसायटी पुन्हा खापणे व ढवस गटाच्या ताब्यात आली. या सोसायटी वर स्पष्ट बहुमत मिळवीत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.
  
मारेगाव पंचायत समिती चे माजी उप सभापती गजानान खापणे यांचे गटाची महागाव (सिंधी) येथील सोसायटी वर सत्ता होती. या गटाची सत्ता पालट करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली होती. मात्र, राजकारणात दांडगा जनसंपर्क व मुरब्बी अशी ओळख असलेले गजानन खापणे यांनी आपले राजकीय पैतरा वापरीत विरोधकांना धूळ चाखत स्पष्ट बहुमत मिळवून एकहाती सत्ता राखून येथील सोसायटी वर विजय मिळवला.

यात अध्यक्षपदी बंडुजी डाहूले तर, उपाध्यक्षपदी बाळू  गाडगे, सदस्य म्हणून गजानन खापने, गणपत ढवस, विनोद ठावरी, विलास नेहारे, सुधाकर बल्की यांची निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीकडे तालुक्यातील राजकीय पुढऱ्यांचे लक्ष वेधले होते हे विशेष...

पत्रकार जब्बार चिनींना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : वणी शहरातील सुपरिचित व ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना प्रतिष्ठीत 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिनांक १० एप्रिल रोजी यवतमाळ येथील समता पर्वात डॉ. कन्हैया कुमार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध सामाजिक विषय, दीन-दुबळे, दलित, कष्टकरी, श्रमिक, शेतकरी इत्यादी तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली. पत्रकारिता क्षेत्रातील या कार्याबद्दल त्यांचा समतापर्व प्रतिष्ठाण तर्फे 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
समता पर्व प्रतिष्ठान द्वारा दरवर्षी यवतमाळ येथे समता पर्व या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध वैचारिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची इथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. याच सोहळ्यात दरवर्षी शोषित, पिडीत घटकांच्या विविध प्रश्नांवर उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकारांना 'मूकनायक' हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार हा वणीतील ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना जाहीर झाला आहे.

सदर पुरस्काराचे वितरण रविवारी दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी समता मैदान यवतमाळ येथे होणार असून डॉ. कन्हैयाकुमार, नवी दिल्ली यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न उचलणा-या पत्रकाराला पुरस्कार मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. या पुरस्काराबद्दल यवतमाळ जिल्हा पत्रकार संघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

जब्बार चीनी यांनी १९९४ साली पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकले. सलग २८ वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. वणी व परिसरातील विविध प्रश्न व समस्यांना त्यांनी आपल्या पत्रकारितेतून वाचा फोडली आहे. कोरोना काळात त्यांनी श्रमिक, शोषित घटकांच्या विविध प्रश्नांवर वृत्तमाला केली होती. या आधीही त्यांना शोध पत्रकारितेसाठी सलग तीन वर्ष पुरस्कार मिळाला आहे.

सर्व जिल्ह्यांत व तालुक्यांत ७ मे रोजी राष्ट्रीय लोक अदालत

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, यांनी संपूर्ण राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत ७ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

मुंबई येथील सर्व न्यायालयात ७ मे रोजी लोक अदालतीचे आयोजन

न्यायालयीन प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्याबाबत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण हे वेळोवेळी लोक अदालतीचे आयोजन करीत असते.त्या अनुषंगाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ७ मे २०२२ रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे.

लोकअदालतीत ठेवण्यात येणारी प्रकरणे

धनादेश अनादराची प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोड प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद, संपादन प्रकरणे व दिवाणी दावे तसेच उपरोक्त नमूद स्वरूपातील दाखल पूर्व प्रकरणे सुनावणी करिता ठेवण्यात येणार आहेत.

तरी ज्या पक्षकारांना वर नमूद प्रकारची प्रकरणे दि. ७ मे २०२२ रोजी लोकअदालतीत ठेवावयाची आहेत, त्या पक्षकारांनी संबंधित न्यायालयात आपल्या प्रकरणाचा विनंती अर्ज लवकर सादर करावा व प्रकरण सामंजस्याने तत्काळ मिळवावे असे आवाहन मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे तथा नगर दिवाणी व सत्र न्यायालय, बृहन्मुंबईच्या प्रधान न्यायाधीश उर्मिला जोशी-फलके व सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीचे फायदे

प्रकरणात जमा केलेली संपूर्ण कोर्ट फी परत मिळते
लोकअदालतीतील निवाड्यास कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.
सामंजस्याने वाद मिटल्यामुळे वेळ व पैसे दोन्हींची बचत होते.
● लोक अदालतीमध्ये पक्षकारांना आपली बाजू स्वत: मांडण्याची संधी मिळते.
अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी कळविली आहे.

भालेवाडी येथील नागरिकांना पाणी टंचाईची ऐन रखरखत्या उन्हात झळ


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आदिवासी बहुल पेसा गावातील नागरिक मूलभूत गरज असलेल्या पाण्यापासून गेल्या चार दिवसांपासून वंचित आहे. कर्मचाऱ्यांच्या बेताल पणाने नागरिकांना पाणी टंचाईची ऐन रखरखत्या उन्हात झळ सोसावी लागत असल्याचे आरोप होत आहे. परिणामी ग्रामस्थ थेट पंचायत समितीच्या दरबारातच ठिय्या आंदोलन करण्याचा तयारीत आहे.

भालेवाडी येथील जलकुंभातून येथील नागरिकांना पाणी पुरवठा करीत तृष्णा भागवित असल्याचा नित्यक्रम आहे. मात्र, मागील चार दिवसांपासून पाणी पुरवठाच कायम बंद आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास येथील नागरिक वारंवार विचारणा केली असता टोलवाटोलवी उत्तर देत घुमजाव करीत असल्याचा येथील नागरिकांनी आरोप केला आहे. विशेष म्हणजे गावपातळीवर सामाजिक, धार्मिक अथवा कौटुंबिक कार्यक्रम असला की ग्रामपंचायत चपराशी व रोजंदार हमखास वेळकाढू धोरण अवलंबून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही बोलल्या जात आहे.
    
मागील काही दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली आहे. अशातच भालेवाडी येथील नागरिकांना मागील चार दिवसांपासून पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे. यास पूर्णतः कारणीभूत ठरत असलेल्या कर्मचाऱ्याबाबत नागरिकांत असंतोष खदखदत आहे. नागरिकांना मूलभूत गरजेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करून रोजंदार यास हटविण्यात यावे व नागरिकांना पाण्याची उपलब्धता करून देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती च्या दरबारातच ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी मा. श्रीकृष्ण पांचाळ साहेब यांची जि. प.कात्री शाळेला भेट

रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : मा.मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प.यवतमाळ यांनी नुकताच जि. प.उच्च प्राथमिक शाळा कात्री प. स.कळंब येथे भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले.विद्यार्थांच्या प्रगतीचा त्यांना प्रश्न विचारून आढावा घेतला. याप्रसंगी बहुचर्चित असलेली महादीप ही जणू लहान मुलांची Mpsc,Upsc परीक्षा! महादीप 2022 या जिल्हा परिषद यवतमाळ कडून घेतल्या गेलेल्या परीक्षेत कात्री शाळेचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. त्यामध्ये इयत्ता 7 वी तील ओंकार आनंद बंसोड, कु.वैष्णवी अशोक वालदे, कु.सायली मारोती डंभारे व वर्ग 6वी तील निशांत डूबे या चार विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले व त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या. महादीप या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद यवतमाळ कडून खूप मोठी भेट मिळणार आहे. ती म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांना विमानात बसून दिल्ली किंवा बंगलोर दर्शन करायला मिळेल. तेथील प्रेक्षणिय स्थळे पाहायला मिळेल. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी मा.मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब व मा.शिक्षणाधिकारी श्री.प्रमोद सुर्यवंशी साहेब यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचन करायला लावले व विद्यार्थ्यांनी अचूक वाचन केल्यामुळे समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शालेय परिसर पाहण्यात आला. साहेबांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी उपमुख्यकार्यकारी अधिकारी मा.अरविंद गुडदे साहेब, मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री.प्रमोद सूर्यवंशी साहेब, मा.गटविकास अधिकारी श्री.सुभाष मानकर 
साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री.राजू मडावी साहेब, गटशिक्षणाधिकारी कळंब मा.गणेश मैघणे साहेब, विस्तार अधिकारी शिक्षण मा.श्री.अमोल वरसे साहेब, केंद्रप्रमुख मा.जयवंत दुबे सर, केंद्रप्रमुख कात्री मा.कल्पना हजारे मॅडम, उपसरपंच कात्री मा.शेख जमील शेख गुलाब, कात्री शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अंजली पजगाडे,शिक्षकवृंद श्री.अतुल खासरे, कु.आकांक्षा सिडाम, श्रीमती रत्नमाला ढुमणे, ग्रामसेवक सीमा इंगळे उपस्थित होते.