पत्रकार जब्बार चिनींना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : वणी शहरातील सुपरिचित व ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना प्रतिष्ठीत 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिनांक १० एप्रिल रोजी यवतमाळ येथील समता पर्वात डॉ. कन्हैया कुमार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध सामाजिक विषय, दीन-दुबळे, दलित, कष्टकरी, श्रमिक, शेतकरी इत्यादी तळागाळातील लोकांच्या प्रश्नांना त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडली. पत्रकारिता क्षेत्रातील या कार्याबद्दल त्यांचा समतापर्व प्रतिष्ठाण तर्फे 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
समता पर्व प्रतिष्ठान द्वारा दरवर्षी यवतमाळ येथे समता पर्व या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विविध वैचारिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाची इथे मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. याच सोहळ्यात दरवर्षी शोषित, पिडीत घटकांच्या विविध प्रश्नांवर उल्लेखनीय कार्य करणा-या पत्रकारांना 'मूकनायक' हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा 'मूकनायक' पत्रकारिता पुरस्कार हा वणीतील ज्येष्ठ पत्रकार जब्बार चीनी यांना जाहीर झाला आहे.

सदर पुरस्काराचे वितरण रविवारी दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी समता मैदान यवतमाळ येथे होणार असून डॉ. कन्हैयाकुमार, नवी दिल्ली यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न उचलणा-या पत्रकाराला पुरस्कार मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. या पुरस्काराबद्दल यवतमाळ जिल्हा पत्रकार संघातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

जब्बार चीनी यांनी १९९४ साली पत्रकारिता क्षेत्रात पाऊल टाकले. सलग २८ वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. वणी व परिसरातील विविध प्रश्न व समस्यांना त्यांनी आपल्या पत्रकारितेतून वाचा फोडली आहे. कोरोना काळात त्यांनी श्रमिक, शोषित घटकांच्या विविध प्रश्नांवर वृत्तमाला केली होती. या आधीही त्यांना शोध पत्रकारितेसाठी सलग तीन वर्ष पुरस्कार मिळाला आहे.
पत्रकार जब्बार चिनींना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर पत्रकार जब्बार चिनींना मूकनायक पत्रकारिता पुरस्कार जाहीर Reviewed by सह्याद्री चौफेर on April 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.