सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : यंदा विधानसभेत काट्याच्या लढतीचे चित्र दिसून आले. त्यांचे भवितव्य 'इव्हीएम'मध्ये बंद झाल्यानंतर आता दावे-प्रतिदाव्यांना ऊत आला आहे. निवडणुकीत बदलाचे वातावरण होते. त्यात बाजी मारू, असा दावा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करीत आहे. तर अशी हवा सुरुवातीपासूनच निर्माण झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊन आम्हीच जिंकू, असा विश्वास महायुतीकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन की, हवा गुल होणार? याचा फैसला अवघ्या काही तासांत कळणार आहे.
या निवडणुकीत चौरंगी लढत झाल्याची चर्चा होती, मात्र शिवसेना उबाठाचे संजय देरकर विरुद्ध भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यात थेट लढत झाली. आघाडी वर्सेस महायुती एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने बिग फाइट म्हणून या लढतीकडे पाहिले जाते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष येथील निकालाकडे लागले आहे.
देरकर यांनीही चार टर्म निवडणूक लढवली, तर बोदकुरवार दोन वेळा आमदार राहिले. पक्ष, सामाजिकपातळीवरही नेतृत्व सिद्ध केले आहे. कसलेले नेते आणि एवढ्या वर्षांच्या राजकीय अनुभवातून दोन्ही बाजूंकडून ताकदीने निवडणूक लढविण्यात आली. डोअर टू डोअर भेटी, छोट्या-मोठ्या सभा, वेगवेगळे प्रचार साहित्य, पक्षाची यंत्रणा राबविली, डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व आयुधांचा वापर करण्यात आला.
या सर्व रणधुमाळीनंतर आता निकालाच्या चर्चा रंगल्या आहेत. या ठिकाणी कुणबी, आदिवासी समाजाच्या मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या आधारावर सरळसरळ सामाजिक, धार्मिक विभागणी करून विविध समीकरणांचे आडाखे बांधले जात आहेत. आघाडी चे उमेदवार सर्वच समाजांत वाटेकरी ठरतील, असा दावा केला जातो. प्रचारात ते दिसूनही आले; परंतु याचे रूपांतर मतदानात किती होईल, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. तर राज्यकर्त्यांवर विशिष्ट समुदायांची असलेली नाराजी, शेतमालाचे भाव; तसेच बदलाचे वातावरण, याचा लाभ महाविकास आघाडीला होईल, असे सांगितले जाते. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बुथनिहाय आकडेवारी घेत गुलाल आम्हीच उधळणार असा दावा केला जात आहे.
वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर?
वणी मतदारसंघात ७४.८७ टक्के मतदान झाले. काही गावांत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. त्यामुळे टक्केवारी वाढली असून, वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मनसे, वंचित, भाकपा यासह काही अपक्ष निवडणूक रिंगणात होते. हे उमेदवार किती मते घेतात, कुणाचे गणित बिघडवतात का, याचा परिणाम निकालावर होऊ शकतो.
आता उत्सुकता निकालाची, अपक्ष-पक्षाकडून आपलाचा उमेदवार निवडून येण्याचे गणित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 22, 2024
Rating: