वणी जवळ खोद्कामात आढळले लावा बेसाल्ट दगडी खांब

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (ता.१ जुलै) : मागील आठवड्यात वणीजवळ शिबला-पार्डी ह्या गावाजवळ खोदकामात दिसलेली दगडी खांब ही कोणत्याही ऐतिहासिक काळातील मानव निर्मित वस्तू नसून ६ कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखी उद्रेक झाला त्यातील लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट (Columnar Basalt) नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक आहेत. लावारास अचानक पाण्याच्या संपर्कात येवून थंड झाल्यास आकुंचित पावून षटकोनी आकाराचे खांब तयार होतात. अशी माहिती येथील भुशास्त्र आणि खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली.
           
यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसर हा जसा ऐतिहासिक दृष्ट्‍या प्राचीन आहे तसा तो भौगोलिक दृष्ट्‍या अतिप्राचीन आहे. ह्याच परिसरात २०० कोटी वर्षाची स्ट्रोमेटोलाईटची आणि पूर्वी पांढरकवडा जवळ आणि मारेगाव तालुक्यात ६ कोटी वर्षाची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे मी शोधली होती. झरी तालुक्यातील आता प्रकाशात आलेल्या ह्या अश्म खांबाची माहिती ५ वर्षापासून मला होती. ७ कोटी वर्षापूर्वी पर्यंत विदर्भात समुद्र होता परंतु ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस ( late cretaceous) काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लावारस यवतमाळ जिल्हा आणि मध्य विदर्भा पर्यत वाहात आला. ह्या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना दक्खनचे पठार (Deccan Trap) नावाने ओळखले जाते. हा ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात आणि पश्चीमेकडे ६६०० फुट जाडीचा आहे.

महाराष्ट्रात ८०% हा बेसाल्ट अग्निज खडक आहे.   
भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अश्याच कॉलमनार बेसाल्ट साठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, नांदेड येथे हे खडक आढळले असून आता त्यात यवतमाळ जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे.
विदर्भ प्रदेशात ह्या खडकाची जाडी कमी आहे त्यामुळे गेल्या हजारो वर्षापासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत असून अनेक नव्या जीवाश्माचे संशोधन होऊ शकेल. वणी परिसरात तेव्हा तप्त लाव्हारस वाहात (Flood Basalt) आला तेव्हा येथील नद्यात तो पडून अचानक थंड झाला त्यामुळे त्याचे आकुंचन पावून षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले,त्यांना कॉलमनार बेसाल्ट असे म्हणतात. इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे ते होऊ शकले नाही. अनेक ठिकाणी षटकोनी खांबां ऐवजी पंच किंवा सप्तकोणी खांब सुधा आढळतात. हे खांब अगदी मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी तयार केले होते तसेच दिसतात त्यामुळे त्याची गल्लत होते त्यामुळेच वृत्तपत्रात ते ऐतिहासिक असावेत असे लिहिले गेले. असे प्रा. चोपणे ह्यांनी सांगितले.
     
यवतमाळ जिल्ह्यात ६ कोटी वर्षापूर्वी डायनोसोर सारखे विशाल जीव आणि प्राणी वास करीत होते. घनदाट जंगले होती, परंतु महाराष्ट्रातील ह्या मोठ्या ज्वालामुखी उद्रेकामुळे सर्व जंगले, जीव जंतू जळून राख झाले.जवळ जवळ ३०,००० वर्षे अधून मधून लाव्हारस वाहत येत असे.पुढे हा प्रलय थांबला आणि नव्याने सजीव सृष्टी निर्माण झाली. त्या काळात मानव नावाचा कुठलाही प्राणी विकसित झाला नव्हता. मानवाचा विकास केवळ ५० लाख वर्षानंतर विकसित झाला असे प्रा.सुरेश चोपने यांनी सांगितले.   
  
हे खडक भोगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असून प्रशासनाने तेथे आढळलेली दगडी खांब आणि परिसर संरक्षित आणि सुशोभित करावा, नागरिकांनी सुद्धा ह्या स्थळाची खडक तिथेच जपून ठेवण्याचे आवाहन प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे.
वणी जवळ खोद्कामात आढळले लावा बेसाल्ट दगडी खांब वणी जवळ खोद्कामात आढळले लावा बेसाल्ट दगडी खांब Reviewed by सह्याद्री चौफेर on July 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.