9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी आज वणी मारेगाव झरी तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. 

सन 1994 संयुक्त राष्ट्राच्या संघाच्या आदेशान्वये भारत सरकारने "जागतिक आदिवासी दिवस" उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. त्या प्रमाणे दरवर्षी देशात आदिवासी जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. हा आदिवासींचा संविधान हक्क दिवस आहे. महाराष्ट्रातील आदिवासीं मोठ्या संख्येने एकत्र येऊन भारतीय संविधान पवित्र ग्रंथ मानून, त्या दिवशी संविधानाचे वाचन करतात. तसेच आदिवासी संस्कृती जतनसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व आपल्या हक्क अधिकाराचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेऊन जागतिक आदिवासी दिवस उत्सव साजरा करतात. हा दिवस आदिवासींच्या अस्तित्व, अस्मितेचा, असल्याने, 9 ऑगस्ट आदिवासीं दिनाची शासकीय सुट्टी जाहीर करावी,असे निवेदन वणी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. 

यावेळी प्रा. शैलेश आत्राम, गीत घोष, बंडू सिडाम, रमेश कुळमेथे, मीनाराम तलांडे, बाबाराव पुसाम, अरुण टेकाम, गोपाल तुमराम, मधुकर कोडापे, आदी उपस्थित होते.

शाळेवर शिक्षक द्या, महागांव पालकांची आर्तहाक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शाळा आहे, शिकायला येणारे विद्यार्थीपण आहेत. मात्र, त्यांना शिकवायला शिक्षक नाही. अशी परिस्थिती मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक मिळावेत यासाठी अनेकदा निवेदने दिलेली आहे. तरी देखील शिक्षकांचा हा तिढा कायम तसाच असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा महागांव येथे १ ते ५ वर्ग असून विद्यार्थी संख्या ३५ आहे. सदद्यस्थीत शाळेवर एकच शिक्षक डेप्युटेशन वर आहे. त्यामुळे आणखी एका शिक्षकाची गरज असताना अजून पर्यंत दुसरा शिक्षक नियुक्त केला नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा आशयचे निवेदन (ता. ५) पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांना देण्यात आले आहेत. यासाठी पालक व शाळा व्यवस्थापन समिती चे पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनीही मागणी केली आहेत. दखल न घेतल्याने पालकांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल असा ईशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. 

निवेदनावर अविनाश लांबट उपसरपंच, शा. व्य. स. अध्यक्ष मुरलीधर बलकी, मंगला दूधकोहळे, किरण ढोके, सुनीता येरमे, योगिता वाकडकर, रविना येरमे, हर्षा गाडगे, अंकुश पिंपळकर, दिनेश वाघाडे, दीपक वाकडकर, राजु मरस्कोल्हे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

जंबो इन्कमिंग: तरोडा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाल्यापासून वणी विधानसभा मतदार संघात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र सध्या पहायला मिळत असून नागरिकांचा कल आता काँग्रेस पक्षांकडे वाढला आहे. तरोडा येथील शेकडो लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. शनिवारी दुपारी खा. प्रतिभा धानोरकर यांच्या वणी येथील घरी हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. 

भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. शेतक-यांच्या समस्या सोडवण्याऐवजी उलट वाढत आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी तरोडा येथील पक्ष प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांनी दिली. 
या प्रसंगी खा. प्रतिभा धानोरकर यांनी तरोडा येथील सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. काँग्रेस हाच सर्वांना सोबत घेऊन जाऊ शकतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. हा विश्वास दृढ होत आहे. त्यामुळे लोकांचा काँग्रेसकडे ओढा वाढत आहे, असे मनोगत यावेळी श्रीमती धानोरकर यांनी व्यक्त केले.

यावेळी देविदास काळे, पुरुषोत्तम आवारी, प्रा. शंकर व-हाटे, तेजराज बोढे, अनिल देरकर, प्रमोद वासेकर, टिकाराम कोंगरे, उत्तमराव गेडाम, जयसिंग गोहोकार, संध्या बोबडे, अनिल भोयर, रवि कोटावार यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पक्ष संघटना मजबुतीवर भर 
खा. प्रतिभा धानोरकर यांच्या विजयामुळे पक्षाला नवी उभारी मिळाली आहे. लोक प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करीत आहे. सध्या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर असून पक्ष गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. येत्या काळात आणखी गावातील लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 
- संजय खाडे
जिल्हा सरचिटणीस काँग्रेस

दिव्यांग विद्यार्थिनीला विजय चोरडिया यांच्याकडून संगणक भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आजच्या युगात शिक्षणाशिवाय पर्याय नाही. मात्र, अनेकांना काही ना काही कारणास्तव शिक्षणापासून वंचित राहावे लागते. मात्र, यावरही काही उपाय केले जातात आणि शिक्षण शिकण्याची जिद्द मनात असली की, पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग मिळतात. असाच प्रत्यय वणी शहरात दिसून आला. 

शहरातील रहिवासी कुमारी श्रेया अनिल भोंगळे या विद्यार्थिनी ला कमरेपासून पायाला अपंगत्व आले होते, मात्र मनात शिकण्याची इच्छा असल्याने या अपंग विद्यार्थिनीने भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा समाजसेवी विजय चोरडिया यांच्याशी संपर्क केला. विजय चोरडिया यांनी लगेच वणी अर्बन निधी मार्फत श्रेया भोंगळे हिला शिक्षणासाठी संगणक व इतर साहित्याची भेट दिली. सोबतच भविष्यात शिक्षण संदर्भात कोणतीही मदत लागल्यास आपला मदतीचा हात कायम असल्याचे आश्वासन श्री. चोरडिया यांनी दिले, यादरम्यान भोंगळे कुटुंबीय भारावून गेले होते.

आपण समाजाचे काही तरी देणे लागतो,या भावनेतून समाजहितासाठी आपण सदैव कार्यरत राहणार.
-विजय चोरडिया 
भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन अध्यक्ष 

 
 

महाराष्ट्र ट्राईबल आघाडी लढवणार आगामी विधानसभा निवडणूक


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा मतदार संघात 'महाराष्ट्र ट्राईबल आघाडी' पक्ष हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत,आज (ता. 4) ला वणी येथे पार पडलेल्या बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष भादीकर, राष्ट्रीय संघटक श्री. संतोष चांदेकर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

गेली अनेक वर्ष आदिवासी समाजाचा वापर करून विविध पक्षांनी राजकीय पोळी शेकली. मात्र, त्याचा फायदा आजतागायत आदिवासी समाजाला तिळमात्र झालेला नाही असे, पक्षाचे उपाध्यक्ष संतोष भादीकर यांनी सभेला संबोधित करताना सांगितले. जो पर्यंत स्वतः चं राजकीय अस्तित्व निर्माण करत नाही तो पर्यंत कोणी आपल्याला विचारात घेत नाही असे, रोखठोक मत संघटक श्री.संतोष चांदेकर यांनी यावेळी व्यक्त केले. 

बैठकीला पांडुरंग पोयाम यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष, महेश आत्राम यवतमाळ जिल्हा प्रचारक, प्रदिप जुमनाके वणी तालुकाध्यक्ष, सुदाम गावंडे वणी तालुका प्रचारक, सुनिता सालुरकर वणी तालुका महिला अध्यक्ष, रमेश मडावी वणी शहर अध्यक्ष, ज्योती मेश्राम वणी शहर महिला अध्यक्ष, अमोल कुमरे मारेगाव तालुका अध्यक्ष, गेडाम झरी-जामणी तालुका उपाध्यक्ष, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
दरम्यान, अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली, त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये एक वेगळाच संचार दिसून आला आहे. पक्षाचे मुख्य टार्गेट वणी विधानसभा मतदार संघ असल्यामुळे यावेळी पक्षातील पदाधिकारी यांना कार्यान्वित करून आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची सुचनाही देण्यात आल्या. वणी विधानसभाच नसून राज्यात पक्षाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे, अनेकजन पक्षात येण्यास ईच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठीने आगामी विधानसभा निवडणूक पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष भादीकर यांच्या खांद्यावर देणार असून, अ‍ॅड. संतोष भादीकर विधानसभा निवडणूक, लढणार असल्याचे संकेत दिले जात आहे, संतोष भादीकर यांची एका "पोल" नुसार वणी उपविभागात ट्राईबल मधून सर्वात अधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे, पक्षातील पदाधिकारीही संतोष भादीकर हे मतदार संघांचे नेतृत्व करावे अशी, आशा व्यक्त करत आहे. त्यामुळे संतोष भादीकर हे आगामी वणी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वकील साहेबांनी आपल्या राजकीय प्रवासात नवे पर्व सुरू करण्याचे निश्चित केले आहे.
प्रस्थापित सामाजिक व राजकिय व्यवस्थेद्वारे आदिवासींवर लादलेल्या मानसिक गुलामगिरीला नेस्तनाबूत करून आदिवासी सामाजिक व राजकिय अस्तित्व निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आदिवासी हेच खरे या देशाचे मुळनिवासी आहेत.हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आदिवासींचा सर्वांगीण विकास (राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक इत्यादी) करायचा असेल तर आदिवासींना राजकिय उलगुलान शिवाय तरणोपाय नाही. याकरीताच महाराष्ट्र ट्राईबल आघाडी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या राजकिय आखाड्यात उतरण्यास सज्ज आहे.              
अॅॅड. संतोष भादिकर
राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र ट्राईबल आघाडी