विद्यार्थ्यांसाठी 'एक राष्ट्र, एक ओळखपत्र', Apaar Card असे तयार होणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

Apaar Card आता देशातील विद्यार्थ्याची ओळख ठरणार असून देशातील विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम असावा यासाठी चर्चा सुरु आहे. त्यातच आता ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ या योजनेला लवकरच सुरुवात होत आहे, आधार कार्ड सोबतच Apaar कार्ड विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असेल. 

एक देश, एक विद्यार्थी या संकल्पनेवर हे कार्ड असेल. येत्या काळात विद्यार्थ्यांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरेल. हे कार्ड कुठे आणि कसे तयार होणार आहे, त्याचा फायदा काय असे प्रश्न अनेकांना पडले आहेत, जाणून घ्या त्याची माहिती…

विशेष ओळख कार्ड
अपार कार्ड हे एक राष्ट्र , एक विद्यार्थी या संकल्पनेवर आधारीत ओळखपत्र असेल. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातंर्गत (NEP, 2020) हे ओळखपत्र असेल. आधार कार्डच्या धरतीवर हे कार्ड पण विशिष्ट ओळख क्रमांक असेल. 'ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री' असे अपार कार्डचे सविस्तर नाव आहे. हे कार्ड 12 अंकांचे आहे. 'अपार कार्ड' मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्यांचे शैक्षणिक माहितीपत्रच आहे.

काय आहे Apaar Card ID
'अपार कार्ड' मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येणार आहे. या कार्डमध्ये विद्यार्थ्याची सर्व शैक्षणिक, क्रीडा आणि शिष्यवृत्तीबाबतची माहिती जतन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसं मिळाली, प्रमाणपत्र मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याची माहिती यामध्ये असेल. विद्यार्थ्याची शाळा बदलली तरी हा रेकॉर्ड कायम असेल. तो प्रत्येक शाळेत अपडेट करण्यात येईल.

अशी होईल विद्यार्थ्याची नोंदणी
• अपार आयडीसाठी संबंधित संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यात येईल
• या आयडीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचा मोबाईल क्रमांक, आधार कार्डची नोंदणी आवश्यक
• विद्यार्थ्याची नाव, इयत्ता, तुकडी, शाळा, राज्य यांची माहिती नोंदविण्यात येणार
• शाळेत अथवा संबंधित एजन्सीकडे ही सर्व नोंदणी करण्यात येणार आहे.
• या अपार कार्डवर, 12 अंकी कार्ड क्रमांक, क्यूआर कोड असेल


युवा कार्यकर्ते रोहन आदेवार यांचे आमदार रोहित पवारांना साकडे


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील प्रलंबित एम. आय. डी. सी. चा मुद्दा निकाली काढण्यात यावा तसेच कापसाला 12 हजार क्विंटल भाव देण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांनी आमदार रोहित पवार यांना दिलेले आहे.
       
सध्या विधिमंडळ अधिवेशनाला सुरवात झालेली आहे. सर्वांच्या नजरा युवा आमदार रोहित पवार यांच्यावर खिळलेल्या आहे. कारण रोखठोक व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे एकमेव नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येत आहे.
मारेगाव तालुक्यामध्ये मागील अनेक वर्षांपूर्वी एम आय. डी. सी. झालेली आहे.परंतु एम. आय. डी. सी. झाल्यानंतर येथील युवकांना व्यवसायासाठी तसेच बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाही. त्यामुळे हा मुद्दा विधानसभेत मांडण्यासाठी,युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांनी आमदार रोहित पवार यांना निवेदन दिले.

यवतमाळ जिल्ह्यातंर्गत मारेगाव शहरा पासुन दोन किमी अंतरावर घोन्सा रोडवर एम.आय.डी.सीचा फलक गेल्या 30 वर्षापासून लागला आहे. हा फलक येथील युवकांना वाकुल्या दाखवत आहे.मात्र, लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीमुळे अजून पर्यंत तिथे औद्योगिक प्रक्रिया सुरु करण्यात आलेली नाही.त्यामुळे एमआयडीसीच्या जागेच्या क्षेत्राचे नेमके काय झाले? व एमआयडीसी अंतर्गत औद्योगीक समस्या निकाली काढण्यासंबंधाचे कुठे घोडे अडले?हा प्रश्न आजही अधांतरीच आहे.
        
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातंर्गत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत.याचबरोबर मारेगाव तालुक्यात अनेक उद्योग आणून बेरोजगारांना रोजगार देण्याबाबत कुणीही बोलायला तयार नाहीत. खासदार व आमदार सारख्या जबाबदार लोकप्रतिनिधीनीही बेरोजगारांच्या समस्यांबाबत संवेदनशील दिसून येत नाही.मग या एमआयडीसी फलकाचे दर्शन दररोज कशासाठी?हा मुद्दा महत्वपूर्ण आहे.
        
यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याच्या जिल्हा म्हणून ओळखला जातो.मात्र या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होताना दिसत आहेत.दिवसेंदिवस कापूस पिकाचा खर्च वाढत असताना,मात्र दरवर्षी भाव तोच राहतो आहे.कापसाचा प्रति क्विंटल सात हजार रुपये भाव असल्याने शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे.
         
कमीत कमी पर क्विंटल बारा हजार रुपये भाव कापसाला मिळावा ही गंभीर बाब लक्षात घेता,"आमदार रोहीत पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडावा या उद्देशाने,विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे सामाजिक कार्यकर्ते रोहन आदेवार यांनी निवेदन दिले आहे. आणि मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व बेरोजगारांच्या समस्यांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून त्यांना धीर द्यावा अशी विनंती पुर्वक अपेक्षा व्यक्त केली आहे. आमदार रोहीत पवार यांनी निवेदन स्वीकारले असून आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनसुद्धा दिले आहे.

धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या शेंगदाण्याला ठोकल्या बेड्या


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : दिवसेंदिवस वणीत गुन्हेगारीत क्षेत्रात वाढ होत असुन हातात धारदार चाकू घेऊन लोकांना धमकावून दहशत निर्माण करीत असताना कुख्यात शेंगदाण्या उर्फ संजय वाघडकर याला वणी पोलिसांनी अटक केली. 6 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता दरम्यान गोकुळ नगर परिसरात एका बार समोर ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्द शस्त्र अधिनियम व दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात बंदोबस्त सुरु असताना पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हेगार संजय वाघडकर उर्फ शेंगदाण्या रा. गोकुळनगर वणी हा एका बार समोर हातात धारदार शस्त्र घेऊन येणारे जाणारे लोकांना धमकावून धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार पो.नि. अजित जाधव यांना मिळाली. ठाणेदार जाधव यांना आरोपी हा अट्टल गुन्हेगार तसेच सहजासहजी ताब्यात येणार नसल्याची खात्री असल्याने डीबी पथकाचे विकास धडसे यांना पोलीस पथकासह रवाना केले.

पोलीस पथकाने धुमाकूळ घालत असलेल्या शेंगदाण्याला शस्त्र खाली ठेवून सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र, त्याने विरोध दर्शवून व हातात असलेले चाकू पोलिसांच्या दिशेने भिरकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस पथकाने बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून पोलिसांनी 37 से. मी. लांब स्टीलचा धारदार चाकू जप्त केला. आरोपी शेंगदाण्या विरुद्द शस्त्र अधिनियम कलम 4, 25 सह कलम 506 तसेच दारूबंदी कायदा कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात व ठाणेदार पो.नि. अजित जाधव यांचे निर्देशानुसार गुन्हे शोध पथकाचे जमादार विकास धडसे व श्रीनिवास गोनलावार आदींनी केली.

चिंचमंडळ येथे समता सैनिक दलातर्फे महामानवास मानवंदना


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मार्डी : मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य समता सैनिक दल मारेगाव तालुका शाखा तर्फे बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी स.10:30 वा. चिंचमंडळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

या महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रमाकरिता मारेगाव तालुका कार्यकारणीचे मार्शल नत्थु ठमके, मार्शल गंभीर कवाडे, मार्शल रोशन चंदनखेडे यांच्या प्रमुख उपस्थित मार्शल सुरेश कवाडे, मार्शल प्रेमराज पुनवटकर, मार्शल अनिरुद्ध खैरे, मार्शल समता मुन, मार्शल अक्षरा चंदनखेडे, मार्शल पुर्वा पुसाटे, मार्शल आकांशा लिहितकर, मार्शल प्रगती भगत आणि इतर मार्शल तसेच बौध्द स्मारक समितीचे अध्यक्ष आयु. ज्ञानेश्वर देठे, सचिव इंजि. राजेश कांबळे व सर्व कार्यकारी सभासद तसेच बौध्द उपासक-उपासिका उपस्थित राहून महामानवास मानवंदना देण्यात आली.
            
सायं. 7 वा. बौध्द स्मारक समितीच्या वतीने गावातील प्रमुख मार्गाने "भीमज्योत रॅली" काढून प्रबुद्ध विहार परिसर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये बौध्द स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य उपासक-उपासिका उपस्थित होते.

अखेर त्या शेतकऱ्याने हरभरा पिकावर ट्रॅक्टर फिरवला

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागांव : शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावस झाला. जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्यामुळे शेतातील हरभरा, ज्वारी, गहू आदि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे फळबागांचेही नासाडी झाली असून गारपीटमुळे रब्बी पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

तालुक्यातील कासारबेहळ येथील शेतकरी गजानन रामराव करे यांचा शेत सर्वे नंबर 124 मधील अंदाजे दोन एकर मागील झालेल्या अवकाळी पावसामुळे हरभऱ्याची मोठी नुकसान झाले होते, त्या पावसामुळे रोग आल्यामुळे व कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे कुठलीही शेतकऱ्याला माहिती, मदत देत नसल्याने हरभरा पिकावर अखेर त्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर फिरवला आहे.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी म्हणून सांगितलं जातं परंतु प्रत्यक्षात काहीच मदत दिली जात नसल्याचे त्यांनी आरोप करित महसूल व कृषी विभागाने तत्काळ शेतकऱ्याच्या शेतात येऊन पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी गजानन करे (कासारबेहळ) यांनी केली आहे.