"त्या" घटनेचा मारेगावात निषेध; कारवाईसाठी वंचीत बहुजन आघाडीचे निवेदन

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावात कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ मारेगावात वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात येऊन हत्यारास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना देण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावात अक्षय भालेराव या वंचीत बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा भीम जयंती साजरी केल्याच्या द्वेषा पोटी निर्घृण खून झाला. या घटनेच्या निषेर्धात मारेगाव येथे वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला असून, हत्यारावर जलद गती न्यायालयात प्रकरण चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, आरोपीची जगम मालमत्ता जप्त करावी, पीडित कुटुंबास एक कोटी रुपये सात्वनपर निधी देण्यात यावा, पीडित कुटुंबातील व्यक्तीला तात्काळ शासकीय नोकरी देण्यात यावी, तसेच कुटुंबियांना पोलीस सरक्षण देण्यात यावे या सह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.

निवेदनावर वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम दारुडे, उपाध्यक्ष संजय जिवणे, युवा तालुका अध्यक्ष विजय कांबळे,गोरखंनाथ पाटील, पंकज झोटिंग, गंगाधर लोणसावळे, रवी वनकर,रमेश चिकाटे, मोरेश्वर खैरे, सुगत जिवणे, अनता खाडे, महेंद्र पाटील, प्रफुल भगत इत्यादीच्या सह्या आहेत.

अवैध दारूबंदीसाठी लाखापूर येथील तरुण पोलीस ठाण्यावर धडकले

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

मारेगाव :  लाखापूर गावात अवैध दारुविक्रीचा सुळसुळाट झाला असून, ही दारूविक्री बंद करण्यात यावी यासाठी, लाखापूर येथील संतप्त तरुणांनी मारेगाव पोलिस ठाण्यावर धडक दिली. ही दारू तातडीने बंद करा, आमचे गांव बिघडत आहे त्याला वाचवा, असे साकडे त्यांनी पोलिसांना घातले. तातडीने दारू बंद केली नाही तर याबाबत वरिष्ठाकडे तक्रार करू, असा इशाराही तरुणांनी पोलिसांना दिला आहे.

मारेगाव तालुक्यातील लाखापूर येथे अवैध दारुविक्रीला उधाण आले असून, दारूमुळे तरुणवर्ग व्यसनाधीन बनला आहे. तसेच, अनेक महिलांचे संसार या दारूने उद्ध्वस्त केले आहेत. लाखापूर याठिकाणी आकापूर, 'डोलडोंगरगांव, चिंचाळा येथील व्यक्ति रात्री बेरात्री दारू पिण्यासाठी येतात. ही दारुविक्री अगदी शाळे च्या जवळ असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम शाळकरी विद्यार्थ्यावर होत आहे. अतिमद्य पिऊन कुठेही लघुशंका करणे, येता-जाता महिलांना पाहून अश्लील अवार्च्या भाषेत बोलणे, दारू ढोसून मंदिराजवळ झोपणे, असा प्रकार सुरु असून यावर आवर घालणे आवश्यक झाले आहे. दारू विक्रेत्यांना तंटामुक्ती समिती व प्रतिष्टीत नागरिकांकडून सुद्धा दारू विक्री बंद करण्यास सांगितले, मात्र यांचा काही परिणाम झाला नाही. पोलिस व बीट जमादार या दारुविक्रीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहेत अशी गावातील नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी आज मारेगाव पोलिस ठाण्यावर धडक दिली व गावातील दारू तातडीने बंद करण्याची मागणी केली.

लाखापूर या गावातील अवैध दारूविक्री ताबडतोब बंद करा, ही दारू ताबडतोब बंद झाली नाही तर वरिष्ठाकडे तक्रार करू, असा इशाराही दिला आहे. निवेदनकर्ते मधुकर परचाके, पवन वैद्य, नितेश परचाके, प्रेम राज ढवळे, जगदीश कुळसंगे, दीपक छापेकर, गणेश कुळसंगे, शिवम मेश्राम, अंकित चांदेकर, स्वप्नील बल्की हे असून यांच्या निवेदनावर सह्या आहेत. 

'आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही ' या WHO च्या थीमवर मूर्ती येथे तंबाखू विरोधी जनजागृती !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जि.प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती , पंचायत समिती राजुरा तर्फे मूर्ती येथे 'We need food, not Tobacco - आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही ' या जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी दिलेल्या थीमवर आधारित तंबाखू विरोधी जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यात चित्र, पोस्टर्स, कथा, घोषवाक्ये व बॅनरच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि उपस्थित जनतेला तंबाखूच्या भयावह दुष्परिणामाविषयी रंजकपणे माहिती देण्यात आली. मूर्ती येथील उपक्रम प्रमुख विषय शिक्षक मनिष अशोकराव मंगरूळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.    
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मूर्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिथुन मंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्वर डाखरे, ममता शालिक लांडे, सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, कल्पना गंगाधर कोडापे , सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, संजय बोबाटे सर, आनंदराव डाखरे , लताबाई देवगडे , गंगाधर कोडापे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
     
तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि तंबाखू विषयक भयावह सद्यस्थिती व विद्यमान कायदे, तंबाखू सोडण्याचे उपाय व निरोगी जीवनाचे फायदे प्रमुख मार्गदर्शक तथा उपक्रम प्रमुख शिक्षक मनिष अशोकराव मंगरूळकर यांनी पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
      
तंबाखूचे सेवन केल्याने शरीरातील विविध भागात जसे- तोंड , घसा, स्वरयंत्र, फुफ्फुस, आतडे, मूत्राशय, गर्भाशय इत्यादी भागात कर्करोग होत आहेत. संपूर्ण जगात तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रूग्ण आपल्या भारतात आढळून येत आहेत आणि तंबाखू ही या सर्व रोगांची जननी आहे. भारतात दरवर्षी जवळपास १० लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या रोगाने होत आहे. तरीही आज संपूर्ण भारतात २८.६ टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखूचे सेवन करत आहेत, तर  महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६.६ टक्के आहे. मुलांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ५.१ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेटच्या धूम्रपानामुळे हवा दूषित होते आणि तंबाखू सेवन केल्याने वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे आपले जवळचे नातेवाईक सुद्धा बाधित होतात. 'तंबाखू सोडा आणि नाती जोडा ' तसेच 'आरोग्याचा पहिला धडा, तंबाखूला 'नाही' म्हणा ' हा मोलाचा सल्ला उपक्रम प्रमुख शिक्षक मनिष मंगरूळकर यांनी उपस्थितांना पटवून दिला.

रोजगार सेवकांच्या आंदोलनाला आले यश; बिडीओंनी अखेर घेतली दखल


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : ऑपरेटर च्या विरोधात मागील दिवसात दिलेल्या अल्टीमेटम नंतर ही कारवाई थंडबस्त्यात असल्यामुळे महाराष्ट्र रोजगार सेवक संघटनेच्या वतीने ५ जून रोजी भर कडक उन्हात काम बंद अंदोलनासह धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत नव्याने पदभार स्वीकारलेले गटविकास अधिकारी पी एम मडावी यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे या आंदोलनाचा तूर्तास समारोप करण्यात आला आहे. मात्र, १५ दिवसात वागणुकीत सुधारणा न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक संघटना मारेगावच्या वतीने देण्यात आला आहे.

बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच गावात विकास कामे झपाट्याने व्हावी यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मागेल त्याला गावातच कामे उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. रोजगार हमीची ऑनलाईन कामे करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर ऑपरेट करण्यासाठी ऑपरेटर देण्यात आले असताना गेल्या काही दिवसापासून या योजनेला कंत्राटी पद्धतीचे ग्रहण लागले असून,रोजगार सेवकांच्या अमंलाबजावणीला या टेबलवर केराची टोपली दाखविल्या जात होती. तसेच येथील ऑपरेटर कंत्रांटदाराच्या दावणीला बांधला गेला असल्यामुळे स्थानिक विकास कामात मोठा पेच निर्माण झाल्याची ओरड होत होती. रोजगार सेवकांकडून स्थानिक कामे प्रलंबीत ठेवली जात असून चिरीमिरी देणाऱ्या ठेकेदाराची कामे तातडीने केली जाते असा आरोप तक्रारीतुन आंदोलकांकडून वारंवार केला जात होता. त्यामुळे याबाबत रोजगार सेवकांनी वारंवार तक्रारी केलेल्या असतांना देखील वरिष्ठ पातळी वरून वेळ काढू धोरण अवलंबिले जात असल्यामुळे अखेर रोजगार सेवकांनी धरणे आंदोलनाचे हत्यार उपसताच प्रशासन खळबळून जागे झाले. रोजगार सेवकांच्या केलेल्या तक्रारी कडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी सोमवार दि.५ जून २०२३ रोजी पासून ऑपरेटरच्या विरोधात काम बंद आंदोलन तथा धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची दखल घेत मारेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पी.एम.मडावी यांनी रोजगार सेवका सोबत चर्चा करत त्यांचे समाधान केले. पंधरा दिवसात ऑपरेटर च्या कामात सुधारणा करण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलनाचा यावेळी समारोप करण्यात आला आहे.

या एकदिवशीय आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष खुशाल येरगुडे, सचिव भगवान धाबेकर, यांनी केले. आंदोलन यशस्वीतेसाठी प्रशांत सपाट, गणपत मडावी, संतोष कोंडेकर, अनिल कुमरे, रमेश सिडाम, महादेव गुरुनुले, शैलेंद्र पेंदोर, नारायण सुसराम, विवेक नरवाडे, स्वप्नील ठावरी, गणेश कालेकर, आशिष किनाके, नितेश काटकर, मनोज दडांजे, संदीप जिवने, वामन डोंगे, आशिष भोयर, गणेश कुळमेथे, सिद्धार्थ खैरे, शेषराव देवाळकर, अमित खिरटकर, गजानन बोधे, प्रमोद जुमनाके, संतोष बल्की, इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.
आभार खैरगांव गट ग्रामपंचातीचे सरपंच चंदू जवादे यांनी मानले.


रोजगार सेवक हा प्रशासनाचा कान आणि डोळा आहे.त्यांच्यावरील अन्याय मुळीच खपवून घेतल्या जाणार नाही. त्यांना विश्वासात न घेता रोजगार हमीची कामे होणार नाही. ऑपरेटर च्या विरोधातील आंदोलनाची दखल घेऊन त्यांना ताकीद देण्यात येत आहे. कामकाजात सुधारणा दिसून आली नाही, तर त्याला तात्काळ कामावरून कमी करण्यात येईल.
-पी.एम.मडावी
गटविकास अधिकारी, पंचायत समिती मारेगाव


बदली हा पर्याय नाही,सुधारणा घडवून आणणे हाच एकमेव पर्याय आहे. सुधारण्याची संधी देऊन ऑपरेटरच्या वागणुकीत फरक पडला नाही तर प्रशासन हस्तक्षेप करून अशा ऑपरेटरला थेट कामावरून कमी करण्याची कारवाई करेल.

-संजय वानखेडे 
माजी गटविकास अधिकारी प. स मारेगाव 


येत्या १५ दिवसात ऑपरेटर बादल खंडरे यांच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही,तर अखिल भारतीय सरपंच संघटना रोजगार सेवकांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहून आंदोलन तीव्र छेडलं जाईल.

-अविनाश लांबट
अध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद, मारेगा


रोजगार सेवकांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. रोजगार सेवक हा ग्रामीण भागातील रोजगार बांधवांचा दुवा आहे. त्याच्यावरील अन्याय आम्ही कदापी सहन करणार नाही.

-गौतम दारुंडे
अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी,मारेगाव


लक्ष्मीनारायण पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिनी वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केले आव्हान


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : शहरातील लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्था वणी चा प्रथम "वर्धापन दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

याप्रसंगी सर्व अभिकर्त्यांना व कर्मचाऱ्यांना व उपस्थित सभासदांना प्रत्येकी एक झाड वाटप करून झाड लावण्याचा व त्यांना जगवून मोठे करण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संतुलन साधण्यासाठी सामाजिक उपक्रम म्हणून सर्वांना झाडांचे वाटप करण्यात आले.

लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या एक वर्षात मोठ्या प्रमाणात आर्थिक क्षेत्रात गगन भरारी घेतली असून, या संस्थेने सर्वांचा विश्वास कायम करून कमी वेळात नावलौकिक केले. विविध सामाजिक उपक्रम राबवून पारदर्शक व्यवहार व सर्वसामान्य जनतेला शेतकरी व महिला बचत गटांना सुद्धा आर्थिक प्रगतीचा हातभार लावण्यासाठी ही संस्था गेल्या एक वर्षापासून सतत काम करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व्यापारी उद्योजक व गरजू लोकांना पत पुरवठा करून त्यांचा व्यवसायाला मोठा हातभार लावत आहे. त्यामुळे या पतसंस्थेचा कारभार पाहता सर्वसामान्यांमध्ये कमी वेळात मोठी प्रगती करणारी एकमेव पतसंस्था म्हणून नावलौकिक आले आहे.

या प्रथम वर्धापन दिनाच्या अनुषंगाने संस्थेच्या अध्यक्षा संगीता संजय खाडे, संस्थेचे संचालक संजय रामचंद्र खाडे व ईश्वर खाडे व इतर पदाधिकारी अभीकर्ता, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.