सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जि.प. उच्च प्राथमिक शाळा मूर्ती , पंचायत समिती राजुरा तर्फे मूर्ती येथे 'We need food, not Tobacco - आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही ' या जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी दिलेल्या थीमवर आधारित तंबाखू विरोधी जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला. त्यात चित्र, पोस्टर्स, कथा, घोषवाक्ये व बॅनरच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी आणि उपस्थित जनतेला तंबाखूच्या भयावह दुष्परिणामाविषयी रंजकपणे माहिती देण्यात आली. मूर्ती येथील उपक्रम प्रमुख विषय शिक्षक मनिष अशोकराव मंगरूळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मूर्ती येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिथुन मंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ज्ञानेश्वर डाखरे, ममता शालिक लांडे, सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, कल्पना गंगाधर कोडापे , सदस्या, शाळा व्यवस्थापन समिती मूर्ती, संजय बोबाटे सर, आनंदराव डाखरे , लताबाई देवगडे , गंगाधर कोडापे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तंबाखूयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम आणि तंबाखू विषयक भयावह सद्यस्थिती व विद्यमान कायदे, तंबाखू सोडण्याचे उपाय व निरोगी जीवनाचे फायदे प्रमुख मार्गदर्शक तथा उपक्रम प्रमुख शिक्षक मनिष अशोकराव मंगरूळकर यांनी पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
तंबाखूचे सेवन केल्याने शरीरातील विविध भागात जसे- तोंड , घसा, स्वरयंत्र, फुफ्फुस, आतडे, मूत्राशय, गर्भाशय इत्यादी भागात कर्करोग होत आहेत. संपूर्ण जगात तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रूग्ण आपल्या भारतात आढळून येत आहेत आणि तंबाखू ही या सर्व रोगांची जननी आहे. भारतात दरवर्षी जवळपास १० लक्ष लोकांचा मृत्यू तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या रोगाने होत आहे. तरीही आज संपूर्ण भारतात २८.६ टक्के प्रौढ व्यक्ती तंबाखूचे सेवन करत आहेत, तर महाराष्ट्र राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६.६ टक्के आहे. मुलांचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ५.१ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत. सिगारेटच्या धूम्रपानामुळे हवा दूषित होते आणि तंबाखू सेवन केल्याने वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे आपले जवळचे नातेवाईक सुद्धा बाधित होतात. 'तंबाखू सोडा आणि नाती जोडा ' तसेच 'आरोग्याचा पहिला धडा, तंबाखूला 'नाही' म्हणा ' हा मोलाचा सल्ला उपक्रम प्रमुख शिक्षक मनिष मंगरूळकर यांनी उपस्थितांना पटवून दिला.
'आम्हाला अन्न हवे, तंबाखू नाही ' या WHO च्या थीमवर मूर्ती येथे तंबाखू विरोधी जनजागृती !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 06, 2023
Rating:
