मारेगाव : अवैध मुरूम वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर जप्त, महसूल पथकाची कामगिरी..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : शुक्रवार दिनांक 5/5/2023 रोजी ठीक मध्यरात्री 1.00 वा. राज्यमार्ग मार्डी- मच्छिन्द्रा रोड वरील मार्डी पेट्रोल पंप समोर तीन लाल रंगाचे महिंद्रा सरपंच, मेसी फर्गुशन व आणखी एका कंपनीचे ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली यामध्ये मुरूम अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आले. 

पथक प्रमुख अमोल गुघाने, तलाठी शिंगणे, तलाठी कुळमेथे हे होते. सदरचे ट्रॅक्टर मुद्देमालासह तहसील कार्यालय येथे जमा केले. या प्रकरणी ट्रॅक्टर मालक रत्नाकर देवराव जुमळे, अभय जुमळे, सुबोध शर्मा हे तिघेही रा. मार्डी येथील असून यांच्यावर अवैध उत्खनन करून विनापरवाना मुरूमाची वाहतूक केल्याप्रकरणी ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. 

सदरची कारवाई तहसीलदार दिपक पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी अमोल गुघाने, तलाठी शिंगणे, तलाठी कुळमेथे, वाहन चालक विजय कन्नाके, कोतवाल लवू भोंगळे यांनी केली आहे.

जिल्ह्यामध्ये मारेगाव व ग्रामीण भागात अवैधरित्या रेती व मुरूम वाहतुक करुन तस्करी करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाच्या विशेष पथकाने कारवाई मोहीम सुरु केली आहे. त्यामुळे तालुक्यातील विविध भागातील तस्करांना या धाडसी कामगिरीची चांगलीच धडकी बसली आहे.

अवैध दारुविक्री विरोधात नारीशक्तीचा एल्गार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वेळाबाई येथे अवैधरित्या दारूविक्री होत असल्याची तक्रार सरपंच यांच्याकडे वारंवार केली जात होती. अखेर गावाकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन महिला सरपंचा रंजना शंकर बांदुरकर यांच्या नेतृत्वात शिरपूर पोलीस स्टेशनला दारूबंदी संदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी सरपंचा रंजना बांदूरकर, संगीता राजूरकर, मनीषा डाहुले, वृंदा रासेकर, गयाबाई अंकावर, शोभा मुसळे, मंजुषा गेडाम, बेबी पायघन, विमल पारखी, विमल गेडाम, सुनीता हनुमंते, संगीता मेश्राम, वंदना घुगुले, सुनिता बांदूरकर, अनिता गाताडे, शारदा महाकुलकर, विराबाई पेंदाणे, शीतल पेंदाणे, संगीता बोबडे, अर्चना बोबडे, अंजु डाहुले, बेबी सातपुते, बेबी तिखट, मीना डाहुले, मनीषा कोल्हे आदींची उपस्थिती होती.

तालुक्यातील वेळाबाई येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी शिरपूर ठाणेदार करेवाड यांना गावातील असंख्य महिलांनी सरपंचा बांदूरकर यांच्या समवेत अवैध दारूविक्री बंदी करण्याची मागणी केली. या अवैध दारूविक्री ने गावातील वातावरण गडूळ झाले असून महिला व तरुणींना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो. परिणामी देशाचं भविष्य व्यसनाच्या आहारी जात असून गावातील शांतता भंग होण्याच्या मार्गांवर आहे.

परिणामी गावातील अवैधरित्या सुरु असलेली दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी उपस्थित महिलांसह सरपंच यांनी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. तूर्तास शिरपूर पोलीस स्टेशन हे अवैधरित्या होणाऱ्या धंद्या वर लगाम लावण्यासाठी ओळखले जाते, नुकतेच विविध गुन्ह्यातील दारू वर बुलडोजर चढविण्यात आले. त्यामुळे वेळाबाई येथील अवैध दारुविक्री वर कारवाई चे बुलडोजर ठाणेदार साहेब कधी चालवतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कळंब येथे कामगार दिना निमित्त महिला कामगारांचा सत्कार, सन्मान सोहळा सपन्न

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : राष्ट्रीय कामगार संघटना यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने आंतररराष्ट्रीय कामगार दिना निमित्त श्री चिंतामणी देवस्थान कळंब येथे मा सुधाकर पवार जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ यांच्या अध्यक्षते खाली महिला कामगारांचा सत्कार,सन्मान सोहळा सपन्न झाला.

या प्रसंगी मा सुधाकर पवार जिल्हा पुरवठा अधिकारी यवतमाळ व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रसादलयातील महिला कामगारांना साडी व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूस्तम शेख, सौ अनिताताई पवार, कळंब तालुका विकास मंच अध्यक्ष अशोक भाऊ उमरतकर, सारीकाताई ठोंबरे विश्वस्त श्री चिंतामणी देवस्थान, रविन्द्रभाऊ कोल्हे विश्वस्त श्री चिंतामणी देवस्थान, रविभाऊ पडोळे विश्वस्त श्री चिंतामणी देवस्थान, बसवेश्वर माहुलुकर विश्वस्त श्री चिंतामणी देवस्थान, रमनभाऊ बोबडे श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्त, कळंब तहसिलचे सुभाषभाऊ दिघडे इ. मान्यवरांच्या उपस्थित होते.
या वेळी श्री चिंतामती देवस्थानचे विश्वस्त रविन्द्र कोल्हे सर यांनी कार्यक्रम आयोजित करण्या मागील उद्देश व भुमिका या संबधी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला दत्ताभाऊ पचकटे, रौनक केवटे, दिलीपभाऊ वासेकर तसेच देवस्थानचे सर्व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सन्मान सोहळा कार्यक्रमाचे सुत्र संचालन कळंब येथील सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश भवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कळंब तालुका विकास मंच चे अध्यक्ष अशोकभाऊ उमरतकर यांनी केले.

या कार्यक्रमाला श्री चिंतामणी देवस्थानचे सर्व विश्वस्त, सर्व कर्मचारी, तसेच राष्ट्रीय कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अशोक जाधव धनगांवकर, प्रदेश उपाध्यक्ष मा कैलास वरेकर यांचे सहकार्य व बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले त्या बद्दल राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रूस्तम शेख यांनी मनपुर्वक आभार व्यक्त केले.

मारेगाव तालुक्यात होणार 5 एकर जागेत भव्य असे क्रीडा स्टेडियम; नगरसेवक शंकरराव मडावी यांच्या मागणीला यश

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला मारेगाव तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

मारेगाव तालुक्यात 90-95 गावे येतात. इथे विद्यार्थी पोलिस,आर्मी भरती ची तय्यारी मोठ्या प्रमाणात करतात. मात्र तालुक्यात एकही क्रीडांगण उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थ्यांना मोठी अडचण येत होती. वारंवार मागणी करूनही काहीही होत नव्हते. मात्र श्री. शंकरराव मडावी नगरसेवक यांना येथील विद्यार्थी भेटले आणि त्यांनी क्रीडांगण साठी मागणी केली.

त्यानंतर सतत पाठपुरावा करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. आणि त्यानंतर टाकरखेडा शिवारातील 5 एकर जागा क्रीडा संकुलासाठी मंजूर करायचे ठरविण्यात आले. या जागेचा प्रस्ताव क्रीडा विभागामार्फत तय्यार करण्यात आला. मात्र ग्रामविकास विभागाच्या हद्दीतील जागेसाठी जिल्हा परिषदेची NOC आवश्यक होती. त्याकरिता गटविकास अधिकारी मार्फत दिनांक 29 डिसेंबर 2022 ला मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ येथे प्रस्ताव सादर करण्यात आला. आणि दिनांक 9 जानेवारी 2023 ला जिल्हा परिषदेची NOC प्राप्त झाली. त्यानंतर प्रस्ता जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आणि दिनांक 28 एप्रिल रोजी मा.जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबतचा आदेश पारित करून 5 एकर जागा तालुका क्रीडा संकुलासाठी मंजूर केली. आता लवकरच 5 एकर जागेवर भव्य असे क्रीडा संकुल होणार आहे. त्यामध्ये रनिंग ट्रॅक, क्रिकेट, फुटबॉल व्हॉलिबॉल, कब्बडी, खो-खो, स्विमिंग, स्केटिंग, इनडोअर सर्व खेळ (बॅटमिंटन, टेबल टेनिस,बॉक्सिंग) इ. सर्व खेळांचा समावेश असणार आहे.

एक भव्य दिव्य असे,सर्व सोयीसुविधा असलेले स्टेडियम मारेगाव तालुक्यामध्ये होणार आहे . ज्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्याची मोठी सोय होणार आहे. मागील कित्येक वर्षाची मागणी या वेळेस पूर्णत्वाला येत आहे.

यावेळी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून श्री. संजय राठोड पालक मंत्री, श्री. बाळू भाऊ धानोरकर खासदार, श्री. संजिवरेड्डी बोदकुरवार आमदार, श्री वामनराव कासावार माजी आमदार, श्रीमती नंदा खुरपुडे जिल्हा क्रीडा अधिकारी, श्री. मिलमिले तालुका क्रीडा आधिकरी यांनी सर्वतोपरी मदत केली. त्यासाठी त्यांचे श्री. शंकरराव मडावी यांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा ध्वजारोहनाचा वाद पोचला मारेगाव पोलिस ठाण्यात


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव: औद्योगिक प्रशिक्षण संस्था मारेगाव येथील प्रभारी प्राचार्य पळवेकर यांनी १ मे महाराष्ट्र दिनी असंवैधानिक पद्धतीने ध्वजारोहण ज्येष्ठता सिध्द न करता त्यांनी मुलभूत हक्क हिरावून अन्याय करून मानहानी त्रास दिल्याची तक्रार जीवन केराम (शिल्प निदेशक) यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ध्वजारोहण हा फार नाजूक व संवेदनशील प्रश्न असुन या बाबत संपूर्णपणे शाहनिशा चौकशी करून योग्य तो निर्णय देण्याचा असतो मात्र प्रभारी प्राचार्य यांनी शासनाच्या नियमानुसार १मे २०२३ महाराष्ट्रदिनी संस्थेत झालेल्या ध्वजारोहणा करीता ज्येष्ठतेचा विचार न करता एकतर्फी आदेश काढून जे.एन. गुड्डमवार यांना ध्वजारोहण करणाचा आदेश काढला मात्र हा आदेश प्राचार्य यांनी हेतूपुरस्सर (नियम बाह्य) आदेश काढून प्राचार्य हे वरिष्ठ अधिकारी यांना विश्वासात न घेता हा कारनामा केला आहे. संविधानातील अनुच्छेद१३चे उल्लंघन करून प्राचार्य हे गुन्ह्यास पात्र असून साहेब मी हे तक्रार माझी नोकरी धोक्यात घालून सेवानिवृत्तस उरलेले दोन वर्षाची सेवा यावर पाणी सोडुन देत आहे या तक्रारी नंतर प्राचार्य पळवेकर यांचे हाताखाली काम करणे म्हणजे जीव धोक्यात घालून काम करणे होय मानसिक त्रास मला होणारच १मे महाराष्ट्रदिनी संस्थेत असंवैधानिक पद्धतीने ज्येष्ठता सिध्द न करता जे.एन. गुड्डमवार याचा ध्वजारोहणा करीता काढलेला आदेश यामुळे संविधानाचा झालेला अवमान असून संबंधीतावर कायद्यानुसार तपास करुन गुन्हा दाखल करून प्रकरण न्याय प्रविष्ट करावे अशी मागणी शिल्प निदेशक जीवन केराम यांनी मागणी केली आहे