सरोज भंडारी उत्कृष्ट अध्यापक पुरस्काराने सन्मानित

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील जैताई देवस्थान शिक्षण समिती वणी द्वारा दरवर्षी मामा क्षीरसागर स्मृतिदिनी दिला जाणारा प्राचार्य राम शेवाळकर स्मृति उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार यावर्षी रामदेवबाबा मूकबधीर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज जिनेंद्र भंडारी यांना 2500 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल व श्रीफळ देऊन माजी कुलगुरू भालचंद्र चोपणे यांच्या हस्ते दि. 6 एप्रिलला प्रदान करण्यात आला.
येथील श्री रामदेवबाबा मंदिर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.भालचंद्र चोपणे हे होते. व्यासपीठावर या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक जैताई देवस्थान समितीचे सचिव माधवराव सरपटवार, दलित मित्र मेघराज भंडारी, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य गजानन कासावार, सत्कार मूर्ती सरोज भंडारी, जिनेद्र भंडारी, नामदेव पारखी उपस्थित होते. 
     
कार्यक्रमाची सुरुवात 'कुंभारा सारखा गुरू नाही रे जगात' या अपर्णा देशपांडे, कल्पना देशपांडे यांनी गायिलेल्या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव सरपटवार यांनी करून मामा क्षीरसागर यांनी अतिशय निष्ठेने चालवलेल्या आचार्य कुलाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनतर उपस्थित अतिथीनी बोलतांना सरोज भंडारी यांची ज्ञाननिष्ठा, विद्यार्थीनिष्ठा व समाजनिष्ठा आणि त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याच्या गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांच्या कार्यामुळे रामदेवबाबा मूक बधिर विद्यालय पूर्ण जिल्ह्यात अग्रणी आहे. अशा उत्कृष्ट अध्यापकांची शिक्षण क्षेत्राला गरज असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या सत्काराला उत्तर देतांना सरोज भंडारी यांनी आपल्या यशाचे श्रेय मेघराजजी भंडारी यांच्या मार्गदर्शनाला आणि डॉ.जिनेंद्र भंडारी व सहकारी शिक्षकांच्या सहकार्याला दिले. या प्रसंगी जैताई देवस्थान समिती तर्फे अमरावती विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून राज्यपालांनी नेमणूक केल्याबद्दल गजानन कासावार यांचा शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.   
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जैताई देवस्थानचे विश्वस्त प्रा. चंद्रकांत अणे यांनी केले. आभार प्रदर्शन ज्योती मोहितकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकुश भंडारी यांनी परिश्रम घेतले.

पालकांसाठी महत्त्वाची बातमी; राज्यातील 800 शाळा बोगस; 100 बोगस शाळांना टाळं तर 700 शाळा रडारवर..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

शिक्षण विभागाच्या पडताळणीत राज्यातील तब्बल 800 शाळा बोगस असल्याचं समोर आलं असून त्यापैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत तर इतर शाळांबाबत काय कारवाई करायची? याचा निर्णय शिक्षण विभाग लवकरच घेणार आहे. बोगस असलेल्या या शाळांमधे सीबीएसई, आयसीएसई, आयबी आणि राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांचा यामध्ये समावेश आहे.

राज्यात अनधिकृतपणे सुरु असणाऱ्या तब्बल 1300 शाळांची तपासणी शिक्षण विभागाने केली. त्यापैकी 800 शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. यातील सुमारे 43 शाळा पुण्यातील आहेत. कागदपत्रांची तपासणी केली असता त्यात गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामुळे शाळांची सखोल चौकशी करण्यात आली होती. त्यात शाळेकडे असणारे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC त्यासोबतच शाळांसाठी लागणारं संबंधित मंडळाचं मान्यता प्रमाणपत्र आणि सरकारकडून देण्यात येणारे संलग्न प्रमाणपत्र या तीन कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. या सगळ्या कागदपत्रांपैकी कोणताही कागद नसल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचं शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितलं आहे. आतापर्यंत तिन्ही कागदपत्र नसणाऱ्या शाळांना बोगस शाळा म्हणू शकतो. अशा एकूण 77 शाळा निदर्शनास आल्या आहेत. 300 शाळांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. 
▪️कारवाईमुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही!
या कारवाईमुळे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी शिक्षण विभाग घेत आहे. मागील काही वर्षातच या शाळा सुरु झाल्या आहे. त्यामुळे त्या त्या परिसरात पर्यायी शाळादेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या कारवाईमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नसल्याचं मांढरे यांनी सांगितलं आहे. बंद केलेल्या शाळांमधील विद्यार्थांनी जवळच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याचं सांगितलं आहे.

पालकांनी पाल्याचा प्रवेश घेताना काळजी घ्यावी: मांढरे

प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत शिक्षण द्यायचं असतं. त्यामुळे अनेक पालक खासगी शाळेत पाल्याचा प्रवेश घेतात. मोठ्या रकमेची फी भरतात. कोणत्याही वस्तूंची खरेदी करताना पालक त्या गोष्टीची बारीकसारीक चौकशी करत असतात. मात्र पाल्यांना ज्या शाळेत शिक्षण देतो त्या शाळेसंदर्भात चौकशी करत नाहीत. त्यामुळे पालकांनी यूआयडी पोर्टलवर जाऊन शाळेचा नोंदणी क्रमांक तपासावा, असं आवाहन मांढरे यांनी केलं आहे.


कात्री येथे श्री महाविर जयंती निमित्त बालरोग निदान शिबिर सपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

कळंब : राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघ व मुस्लीम सेवा संघ यांच्या सयुक्त विदयमानाने भगवान श्री महाविर जयंती निमित्त कात्री येथे दि ४ एप्रिल रोजी बालरोग निदान शिबिर सपन्न झाले.

या शिबिरात यवतमाळ येथील बालरोगतज्ञ डॉ हरिश तांबेकर यांनी बालकांची तपासणी करून मोफत औषध दिली.
या प्रसंगी राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक (दै लोकदुत कळंब तालुका प्रतिनिधी) रूस्तम शेख ,प्रियंका वाल्दे, अंगणवाडी सेविका चंदाताई आत्राम, गजानन निकोडे, सागर शुक्ला, कामिलं शेख जिल्हा सचिव ऑल इंडिया राहुल गांधी कॉग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा इ. उपस्थित होते.

शिबिर यशस्वी होण्याकरीता दै कळंब नगरीचे जिल्हा प्रतिनिधी जावेद खान, मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जावेद अली, इश्वरभाऊ कोठारी, अमोल चावरे, अविनाश राठोड,धिरज मडावी, चंदाताई आत्राम अंगणवाडी सेविका, दै सिंहझेपचे जिल्हा प्रतिनिधी विजयभाऊ बुंदेला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ट्रक-ऑटोच्या भिषण अपघातात मायलेकी ठार, तर सात जण जखमी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आपल्या गावाकडे ऑटोने परत जात असतांना काळाने मायलेकी वर घाला घातला. चक्क प्रवाशी घेऊन जात असलेल्या ऑटोला भरधाव येणाऱ्या हायवा ट्रक ने धडक दिली. या अपघातात आई आणि मुलगी ठार झाल्याची घटना आज 6 एप्रिलला दुपारी साडे चार वाजता दरम्यान, वणी शिंदोला मार्गांवरील आबई फाटा ते शिंदोला कडे जाणाऱ्या मार्गांवर घडली. अपघात इतका भीषण होता की ऑटोचा दर्शनी भाग चकनाचूर झाला आहे.
संजीवनी अनंता नागतुरे (33) व अवनी अनंता नागतुरे (4) असे या भीषण अपघातात ठार झालेल्या माय- लेकीचे नाव आहे. ते कुर्ली येथील रहिवाशी असून, आपल्या गावाकडे ऑटोने परत जात असताना हा भीषण अपघात झाला. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली, जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवले.
लालगुडा येथे मुलीसह आपल्या बहिणीकडे आलेली संजना मुलीला घेऊन कुर्ली या आपल्या गावाकडे ऑटो क्र. एम एच 29 एएम 0013 ने परत जात असतांना हा अपघात घडला. संजना हिचे वडील अत्यवस्थ असल्याने दोघीही बहिणी त्यांना भेटण्याकरिता सिंधीवाढोणा येथे गेल्या होत्या. वडिलांची भेट घेतल्यानंतर संजना ही आपल्या बहिणी सोबत लालगुडा येथे आली होती. आज ती कुर्ली या आपल्या गावाकडे परत जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. समोरून येणाऱ्या ट्रक क्र. एच आर 58 सी 0482 ने चक्क प्रवाशी ऑटो ला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत आई व तिची मुलगी हिचा जागीच मृत्यू झाला. तर ऑटोतील तीन महिला, एक लहान मुलगी, एक मुलगा  यासह ऑटोचालक व दोन पुरुष असे सात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ वणी ग्रामीण रुग्णालयात हलविले. जमलेल्या नागरिकांनी चालकास चांगला चोप देत शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.
या अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून, अधिक तपास शिरपूर पोलिस करीत आहे.

तातापुर श्री.हागोडबुआ देवस्थानच्या सचिव पदी प्रदीप नागोराव भनारकर यांची निवड

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : विदर्भातील एकमेव भोई समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री.हागोडबुआ देवस्थान, तातापुर सचिव म्हणून भोई समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व भोई समाजाचे युवा नेते श्री.प्रदीप नागोराव भनारकर यांची निवड झाल्या बद्दल त्यांचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदनसह शुभेच्छा देण्यात येत आहे.
तालुक्यातील भोई समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्री.हागोडबुआ देवस्थान असलेल्या देवस्थानाचे आज गुरुवार दि.06/04/2023 ला भोई समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व भोई समाजाचे युवा नेते श्री.प्रदीप नागोराव भनारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असेच समाजा प्रती ममताभाव असावा, अशी यावेळी अनेकांनी भावना व्यक्त केल्या असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.

दरम्यान, हागोडबुआ देवस्थानचे अध्यक्ष कैलास नान्ने, उपाध्यक्ष लिंबा शिवरकर, कोषाध्यक्ष अमोल कार्लेकर, विश्वस्त प्रकाश पारशिवे, बापू पारशिवे, रमेश शिवरकर, काशीनाथ पारशिवे, बंडु नान्ने, लक्ष्मण करलुके, लक्ष्मण शिवरकर, शेखर नान्ने, रमेश शिवरकर, अर्जून करलुके, संजय नान्ने, सुरेश करलुके, चंदू कामतवार, संतोष मांढरे, गजानन शिवरकर यांचे सहमतीसह समाजबांधवांची उपस्थिती होती.