शेतकरी पुत्राची विष प्राशन करून आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : भालर रस्त्यावरील एमआयडीसी (MIDC) लगत असलेल्या नगर पालिकेच्या डंपींग ग्राऊंड जवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज 20 मार्चला सकाळी उघडकीस आली. सदर युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मंगेश प्रभाकर डोंगे (31) रा. नांदेपेरा असे या मृतावस्थेत आढळलेल्या युवकाचे नाव आहे. तालुक्यातील नांदेपेरा येथील शेतकरी कुटुंबातील सदस्य असलेला हा विवाहित युवक वणी-भालर रस्त्यावरील मृतावस्थेत आढळून आला. एक वर्षांपूर्वीच मंगेश चा विवाह झाला असल्याचे सांगण्यात येते. सहकुटुंब वास्तव्यास असलेला मंगेश हा 19 मार्चला रात्री दुचाकीने वणीला जातो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीयाकडून त्याचा शोध घेतला जात असताना आज बुधवारला सकाळी भालर (वणी) रस्त्यावरील नगर पालिकेच्या कचरा डंपींग ग्राउंड जवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

सकाळी या मार्गाने येरजाऱ्या करणाऱ्या नागरिकांना अज्ञात युवक मृतावस्थेत आढळून आल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस तत्काळ दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मात्र सदर युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.