पात्र विद्यार्थ्यांचा मारेगावात गौरव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या सण 2023-24 या सत्रातील महादिप उपक्रमांतर्गत जिल्हास्तरावर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण मानकर होते,तर प्रमुख अतिथी म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार आत्राम, नागोराव कोम्पलवार,प्रदीप रामटेके स्वप्नील फुलमाळी, सहदेव चहांदे, घनश्याम पाटील धर्मराज सातपुते दिलीप भगत प्रामुख्याने उपस्थित होते.काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात कु.वंशिका कोवे,कु.विध्यवासिनी पचारे,कु.तन्मय राजूरकर,कु.अक्षरा रुयारकार,आयुष देवतळे,कु.लावण्या मस्की,कु.सोनाक्षी उईके,हिमांशू मिलमीले,रितिका वनकर,आरुची खडसे,ओम बहिरे,रोहन ढवळे,आर्या वसाके,वृषभ भगत,संस्कार गाडगे,तनुष्का बाभळे,विवेक नेहारे,ईश्वरी वाढई, तृप्ती बहिरे,वैधवी राजगडकर कु.वैष्णवी मांढरे,भूषण बदे,अतुल पवार,गुंजन गावंडे,मनीषा कुत्तारमारे,ऋतुजा जवादे,आचल खंडरे,सानिया कुत्तारमारे,परिधी पाटणकर इत्यादी विध्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज सातपुते यांनी केले संचालन गौरव चिकाटे यांनी तर आभार संगिता खंडारे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय चचाने, दिगांबर दैने, मनोज लांजेवार, प्रमोद कोवे, प्रवीण पाटील, निकेश डोहणे, सुशील गजभिये प्रियदर्शन बन्सोड शैलेश बडोले, नैतिक गोंडाने, प्रमोद पाटणकर इत्यादींनी प्रयत्न केले.

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ अंतिम निकाल जाहीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक 20 ते 23 फेब्रुवारी,2024 आणि 26 ते 28 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा- 2022 करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 101 उमेदवारांची शासनाकडे शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेमध्ये नाशिक जिल्हयातील ओंकार संजय निकुंभ हे खुला व मागास वर्गवारीतून प्रथम आले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील श्रीमती स्वप्नाली संजय तांदुळजे या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

प्रस्तुत अंतिम निकालात अर्हताप्राप्त , शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने (Online) विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी- लोकसभा निवडणूक तिरंगी लढत होण्याचे संकेत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : थेट आरोपांची खैरात एकमेकांवर डागणे हे नित्यचेच झाले. "ह्याची त्याने जिरवली, त्याची ह्यो जिरवतील"...ह्याच राजकारण त्याच्याही अलंगट येणार. पक्षाचे काही देणे घेणे नाही, पण काही असो तो माणूस खूप चांगला, ह्या भाबड्या पोलखोल गोष्टी निवडणूकीदरम्यान चर्चेचा विषय काही नवीन नाही. आता मात्र होऊ घातलेल्या लोकसभेत कोण बाजी मारेल? अशी पुन्हा चर्चा चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघात मनोरंजनात्मक रंगत आहे. सध्या सोशल मिडियावर काही पदाधिकारी मंडळी व कार्यकर्ते आपल्या उमेदवारांबाबत केलेल्या कामांचा विकासाचा प्रचार शेअर करताना दिसत आहे. मात्र, आजपासून ख-या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल. 

चंद्रपूर,वणी,आर्णी या लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. प्रचारात कोण आघाडी घेईल हे आज जरी सांगता येत नसले तरी सध्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या मतदार संघातील गावोगांवी मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे. परंतु आज तीन तारखेपासून प्रचाराला वेग येईल. चंद्रपूर-वणी-आर्णी या मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस च्या प्रतिभा धानोरकर व वंचितचे राजेश बेले निवडणूक रिंगणात उतरले असून या शिवाय काही अन्य उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब अजमावू पाहत आहे,तेही प्रचारात ताकदणीशी उतरले. 

प्रत्येक उमेदवारांना आपल्या विजयाची आशा लागली जरी असली तरी महायुती, महाविकास आघाडी व वंचित च्या उमेदवारात अतितटीची लढत होईल असे काही राजकीय मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळे चंद्रपूर लोकसभा तिरंगी लढत किंबहुना चांगलीच चूरशीची होणार आहे. आ.प्रतिभा धानोरकर यांना भावनिकतेचा फायदा होईल, असे काही राजकीय वर्तुळातून वर्तविले जात आहे. तर दुसरीकडे मंत्र्याचा विकास प्रचारात काही कमी नाहीत. तेही विजय मिळवूच अशी मोट बांधत आहे. 

परंतु भाऊ की ताई? किंवा आणखी कोणी तिसरा नवीन चेहरा उदयास येइल? याचा संभ्रम आहे. कारण मागील लोकसभा पाहता कोण कोणाला 'धक्का दिला' ही धाकधूक उमेदवारीवरून सुरुवातीला चर्चेत होती. परंतु याबाबत कोणीच रोखठोक मन की बात करित नसले तरी "आमचं ठरलं" म्हणून आभासी दुनियेचा आधार घेत प्रचार कार्य तूर्तास जोमात सुरु असल्याचे दिसून येत आहे. आपआपल्या उमेदवारासाठी मतदारांना साकडे घातले जात असून त्यांच्या विजयाजी माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातील मतदारांनी कंबर कसली आहे. 

शहरात प्रचार गरम आहे, तर ग्रामीण भागात प्रचार थंडा दिसून येतो. मात्र,सध्या सोशल मीडियातून तुफान फटकेबाजी कहर करत आहे. परिणामी जस जसे दिवस जवळ येत आहे, तस तसे होऊ घातलेल्या तिरंगी लढतीची धडकी राजकीय नेत्यात वाढत असून मतदारात ही निवडणुक उत्सवासारखी आहे, एवढे मात्र निश्चित.

खाजगीकरण,उदारीकरण जागतिकीकरण या धोरणाचा फटका नागरिकांना बसला आहे. निवडून आलेला लोक प्रतिनिधी देश हितापेक्षा बेहिशोबी मालमत्ता गोळा करण्यात धन्यता मानत असून ईडीच्या धाकाने आपली निष्ठा धुळीत मिसळत असल्याचे उदाहरण ताजे आहेत. बेहिशोबी पैसा कामाविणे संविधानाच्या चौकटीत बसत नसतानाही संविधानालाच केराची टोपली दाखविली जात असल्याचा प्रकार मतदार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. सध्यातरी निवडणुका कडे मालमत्ता गोळा करण्याचे साधन म्हणून पाहिले जात आहे "माल लगाव माल लो" असा प्रकार सुरु झाल्यामुळे लोकशाही मध्ये सामाजिक कार्यकर्त्याना निवडणुकी मध्ये विजयाची संधी मिळत नाही.त्यामुळे निवडणुका कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदल्यासाठी यंदा मतदार कोणती भूमिका घेईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चंद्रपूरमध्ये २०६४ मतदार करणार गृहमतदान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये पहिल्यांदाच, 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील एकूण 1239 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली असून यात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 1076 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 163 आहे. ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 224 आणि 63 दिव्यांग मतदार तर चिमूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 437 आणि 101 दिव्यांग मतदार गृहमतदान करणार आहेत. या मतदारांनी गृहमतदाना करीता आवश्यक असलेला फॉर्म 12 – डी प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. भारत निवडणूक आयोगाने सुद्धा पहिल्यांदाच 85 वर्षांवरील नागरीक आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग बांधवांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांना नमुना 12 – डी देण्यात आला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 1076 तर 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या मतदारांची संख्या 163 आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय गृह मतदान करणारे मतदार : राजूरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 325 आणि दिव्यांग 21 मतदार, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 175 आणि दिव्यांग 16, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 197 आणि दिव्यांग 56, वरोरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 213 आणि दिव्यांग 39 मतदार गृहमतदानाद्वारे मतदान करणार आहेत. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील 224 आणि 63 दिव्यांग मतदार तर चिमूर मतदारसंघातील 85 वर्षांवरील 437 आणि 101 दिव्यांग मतदार गृहमतदानाद्वारे मतदान करणार आहेत.

मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सुचना : गृहमतदानासंदर्भात अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण नुकतेच नियोजन भवन येथे घेण्यात आले. यात फॉर्म 13 - ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 - बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 - सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 - डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांना माहिती देण्यात आली. अतिशय अचूक पध्दतीने गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडायची असून त्याची गोपनीयता सुद्धा पाळणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आले. प्रशिक्षणाला अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, रविंद्र माने आदी उपस्थित होते.

अशी राहील प्रक्रिया : गृहमतदानासाठी घरी जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी डिक्लेरेशन म्हणजे फॉर्म 13 – ए अचूक भरून घ्यावयाचे आहे. मतदान केलेल्या पत्रिकेची उभी घडी करून सदर पत्रिका छोटा लिफाफा म्हणजे फॉर्म 13 – बी मध्ये टाकावा. डिक्लरेशन आणि छोटा लिफाफा दोन्ही कव्हर बी लिफाफा म्हणजेच फॉर्म 13 – सी मध्ये टाकावा. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गृह मतदानाची व्हीडीयोग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी / कर्मचारी, मायक्रो निरीक्षक आणि व्हीडीओग्राफर सोबत राहणार आहे.

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.