धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : धनगर समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर समाज संघर्ष समिती आणि मेंढपाळ विकास मंचच्या शिष्टमंडळाने मंत्री श्री. विखे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन मंत्री श्री. विखे पाटील यांना दिले. दरम्यान, शिष्टमंडळाशी सविस्तर प्राथमिक चर्चा करून मंत्री श्री. विखे पाटील यांनी विषय समजून घेतले. तसेच लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, मेंढपाळ विकास मंचचे प्रदेश अध्यक्ष संतोष महात्मे, मेंढपाळ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक पल्लवी लांडे, संचालक प्रवीण भुजाडे यांच्यासह पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

नवी दिल्ली : राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व आठ आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली.

या शिष्टमंडळामध्ये विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ, मंत्री श्री. आत्राम यांच्यासह सर्वश्री सुनील भुसारा, दौलत दरोडा, हिरामण खोसकर, शांताराम मोरे, शिरीषकुमार नाईक, काशिराम पावरा, डॉ.देवराम होळी, राजेश पाडवी व आमश्या पाडवी यांनी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांना राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केले.

या बैठकीनंतर, श्री. झिरवाळ यांनी माध्यम प्रतिनिधींसमवेत संवाद साधला. आदिवासी समाजातील समस्या मांडाव्यात यासाठी दिल्लीत शिष्टमंडळासह दाखल झाल्याचे सांगितले व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

मारेगाव तहसीलवर धडकला आदिवासिंचा आक्रोश मोर्चा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : आदिवासी जमातीमध्ये गैर आदिवासीना समाविष्ट करू नये, असे केल्यास हा आदिवासी समाजावर वर अन्याय आहे, हा अन्याय कदापि खपवून घेतला जाणार नाही, यासाठी आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने भव्य मोर्चा (ता.3) रोजी मारेगाव तहसील वर धडकला, या विराट मोर्चाने अख्या तालुक्यासह स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले.         
3 ऑक्टोबर मंगळवार ला स्थानिक नगर पंचायत, कार्यालय मारेगाव येथून दुपारी 2 वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला.  शहरातील मुख्यमार्गांवरून हा मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला. या आक्रोश मोर्चातून धनगर समाज गैरआदिवासी असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीच्या यादी मध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळ पुरवठा करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, आदिवासीची विविध क्षेत्रातील रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावे, पेसा कायदा अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावा, इत्यादी मागण्याचे निवेदन तहसीदार उत्तम निलावाड यांना देण्यात आले. या मोर्चात बहुतेक सर्वच राजकीय पक्षातील आदिवासी बांधवानी सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला होता.
शामदादा कोलाम संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष लेतूजी जुनगरी, संविधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश अध्यक्ष बळवंत मडावी, बिरसा ब्रिगेडचे डॉ. अरविंद कुळमेथे, यांनी या आक्रोश मोर्चाला मार्गदर्शन केले. आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या योजना लागू करणार अशी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली, सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम विद्यमान सरकार करित असल्याने आदिवासी विरोधी शिंदे सरकारचा निषेध आणि धनगर समाजाला आदिवासीत समाविष्ट करू नये, असे दिलेल्या निवेदनातून मागणी करण्यात आली आहे. 
या वेळी वणी झरी मारेगाव सर्व विविध राजकीय क्षेत्रातील नेते व मारेगाव तालुक्यातील महिला पुरुष, युवक युवतती शेतकरी, कष्टकरी, जेष्ठ नागरिक मंडळीनी उत्स्फूर्तपणे मोर्चात मोठया संख्येनी सहभागी झाले होते. या प्रसंगी उपस्थित सामाजिक राजकीय मान्यवरांनी मध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ही तर फक्त सुरुवात आहे. आता यापेक्षाही मोठी लढाई आदिवासीच्या विरोधात असणाऱ्या सरकारच्या विरोधात एकजुटीने लढायची आहे... 

बावनकुळे यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीची ठिणगी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पडलेली असून जालना येथे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात शामिल करावे, अशी मागणी केलेली आहे. जरांगे यांनी केलेल्या सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्याच्या मागणीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा तीव्र विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठा जात लिहिलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करण्यात येवू नये. असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाचे आशिष देशमुख यांच्या मार्फत सरपंच परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले, त्या वेळी वणी मारेगाव दौऱ्यावर आले होते. 

निवेदनात बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यात ओबीसीची जातनिहाय सर्वे करण्यात यावी, कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये, ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण देण्यात यावे, मा. सर्वोच्च न्यायालयाने लादलेले ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी, महाराष्ट्र राज्यात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मंजुर केलेली ७२ वसतीगृहे त्वरीत भाड्याच्या इमारतीत सुरु करावी, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी त्वरीत शिष्यवृत्ती व फ्रीशीप योजना त्वरीत लागु करण्याबाबत अभ्यासक्रम विद्याशाखा (1) Bachelor of Computer Science (B.C.A.) Science & Tech- nology. 2) M.C.M. (Master of Computer Managernent) Com- merce & Management 3) Post Graduate Diploma in Computer Commercial Application (PGDCCA) करा, 
मुख्यमंत्री रोजगार निर्माती कार्यक्रम (CMEGP) योजनेत इतर मागासवर्गीय प्रवर्गाचा OBC चा समावेश करा, अ) ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना फ्रीशीप मिळण्यासाठी. ब) विदेशातील उच्च शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती योजने अंतर्गत ओबीसी विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्याबाबत. क) ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेस पात्र ठरविण्याकरीता.

नॉन क्रीमिलीयर प्रमाणपत्र व ८ लाख रु. उत्पन्नाची अट अशा दोन अटीपैकी ८ लाख रु. उत्पन्नाची अट रद्द करून फक्त नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना वरील योजनेचा लाभ देण्याचा शासन निर्णय निर्गमीत करण्यात यावा, म्हाडा व सिडको योजने अंतर्गत ओबीसी समाजास आरक्षण लागु करण्यात यावे, अनुसूचित क्षेत्रात महामहिम राज्यपालांच्या अधिसुचनेनुसार वर्ग ३ व ४ ची १७ संदर्गीय पदे भरताना १०० टक्के अनुसूचित जमाती मधूनच भरली जातात. त्यामुळे ओबीसी सहित इतर मागासवर्गीय समाजाचे जिल्हातील सदर पदभरतीचे आरक्षण शुन्य झाले आहे. हे असंविधानिक असून ओबीसी व इतर मागासवर्ग समाजावर हा फार मोठा अन्याय आहे तो तात्काळ दूर करण्यात यावा, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरती चा शासन निर्णय तात्काळ रद करण्यात यावा, ज्याप्रमाणे सारथीला निधी व इतर सुविधा सरकारकडे दिल्या जाते त्याच धरतीवर महाज्योतीला सुद्धा निधी व सुविधा देण्यात याव्यात, ओबीसी आंदोलनात सहभागी ओबीसी कार्यकत्यांवर दाखल केलेल्या गुन्हे बिन शर्ते मागे घेण्यात यावेत, चंद्रपूर येथील अन्नत्याग आंदोलन कर्त्यांचे आंदोलन मा. मुख्यमंत्री मा.उपमुख्यमंत्री व इतर नेत्यांच्या उपस्थितीत सोडवावे, जालना येथील आंदोलनात निलंबित करण्यात आलेल्या ओबीसी अधिकाऱ्यावरील निलंबन तत्काळ मागे घेण्यात यावे, विदेशी उच्च शिक्षणाकरीता देण्यात येणारी शिष्यवृत्ती ५० टक्क्या वरून १०० टक्के विद्यार्थ्यांना करण्यात यावी, उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेले नागपूर येथील स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमीत्य बांधण्यात आलेले २०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्य बांधण्यात आलेले २०० विद्यार्थी क्षमतेचे वसतीगृह ओबीसी कल्याण विभागास हस्तांतरीत करून नागपूर या ठिकाणी मुलांचे व मुलींचे वसतीगृह सुरु करण्यात यावे. अशा विविध मागणीचे निवेदन भाजपचे आशिष देशमुख यांना देण्यात आले, दरम्यान ओबीसी समाजाच्या मागण्यापूर्ण करण्यासाठी आंदोलन करण्याचा सुचनाही देण्यात आले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सचिव सुरेश लांडे, चंदू जवादे, प्रशांत भंडारी, प्रवीण नान्हे, दिलीप आत्राम, प्रवीण बोथले, प्रशांत चौधरी, गणेश खुसपुरे, यासह अखिल भारतीय सरपंच परिषदेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

राज्यातील १२ जिल्ह्यांना मिळाले नवे पालकमंत्री

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा - सुधीर मुनगंटीवार