शिवसेना (ऊबाठा) शहर प्रमुखाचा वाढदिवस तिनचाकी सायकल वितरीत करून साजरा


सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : शिवसेना (ऊबाठा) वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकर यांचा वाढदिवस तिनचाकी सायकल वितरीत करून स्थानिक शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आज (दि.८) ला साजरा करण्यात आला.  

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे नेहमीच २०% राजकारण व ८०टक्के समाजकारण या पद्धतीने समाजोपयोगी कार्ये केली जात असुन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा ठसा तसेच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन वरोरा-भद्रावती विधानसभेचे विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे हे नेहमीच समाजकारण करीत असतात. समाजातील दुर्बल घटकांवर मदत पोहचवावी तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो व आपण सामाजिक कार्यात आपला वाटा उचलावा, या हेतुने विधानसभा प्रमुखाचे कार्य नेहमीच सुरू असुन ते अविरत चालणारे आहे.

वरोरा शहर येथील अभ्यंकर वार्ड येथे वास्तव्यास असणारा आदित्य प्रफुल अहिरकर हा मुलगा दोन्ही पायांनी अपंग असुन त्याला घरामध्ये ये-जा करणे सुध्दा कठीण असल्याचे व त्याचे नित्यकर्म करण्यासाठी उचलुन न्यावे लागत असल्यामुळे त्यांच्या पालकामार्फत तीनचाकी सायकल मिळण्याकरीता रविंद्र शिंदे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात अर्ज सादर करण्यात आला होता. सदर अर्जाची दखल घेत आणि शिवसेना शहर प्रमुख खेमराज कुरेकार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज शुक्रवारला आदित्य प्रफुल अहिरकर यास तीनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले. 
        
शिवसेना शहर प्रमुख खेमराज कुरेकार यांचा वाढदिवस शिवालय येथे केक कापुन साजरा करण्यात आला व त्यांना पुढील भविष्यातील वाटचालीकरीता सर्वानी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी आदित्य प्रफुल अहिरकर (वय 10 वर्षे) या अपंग मुलाला तिनचाकी सायकलचे वितरण करण्यात आले.
            
सदर कार्यक्रमाला विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, शिवसेना जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, शहर प्रमुख खेमराज कुरेकार, प्रतिभा मांडवकर, जिल्हा युवती अधिकारी, अश्लेषा जिवतोडे, तालुका संघटीका, भद्रावती तालुका, सरला मालेाकर, तालुका संघटीका, संजय नरोले, उपशहर प्रमुख, अनिल सिंग, उपशहर प्रमुख, तेजस्विनी चंदनखेडे, नेहा किन्नाके, अभिजीत कुडे, वर्षाताई कुरेकार, शुभांगी धवने, अपंग मुलाची आई शुभांगी अहिरकर, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. आदित्य अहिरकर यांची आई शुभांगी अहिरकर यांनी विधानसभा प्रमुख रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मुसळधार पावसाच्या तडाख्यात घर कोसळले


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

मारेगाव : तालुक्‍यातील चिंचमंडळ येथील एका शेतमजूराचे  मुसळधार पावसाच्या तडाख्यात घर कोसळण्याची घटना आज 5 वाजता सुमारास घडली आहे. यामध्ये जीवितहानी टळली असली तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे.

मारेगाव तालुक्यात पावसाचा दोन ते तीन दिवसापासून जोर वाढल्‍याने शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी सुरु आहे. तालुक्यातील चिंचमंडळ येथे आज शुक्रवारला सायंकाळी पाचच्या सुमारास शंकर रघुनाथ चौधरी (55) याचे घर झालेल्या मुसळधार पावसाने कोसळले आहे. या दरम्यान म्हातारी आई घरात एकटी होती, शंकर बाहेरून आले होते आणि पिण्यासाठी त्याने पाणी मागितलं, त्या पाणी आणायला गेल्या असता धाडकन घर क्षतिग्रस्त झाले. या दुर्घटनेत चौधरी परिवार थोडक्यात बचावले. वृत्त लिहे पर्यंत घटनास्थळी संबंधित कार्यालयामार्फत कोणीही दाखल व्हायचे होते, मात्र नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तालुका प्रशासनातर्फे तत्काळ नुकसान ग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुका अध्यक्ष अतुल पचारे यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलतांना म्हणाले. ते पुढे सांगतात की, चिंचमंडळ परिसरात कालपासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे या पावसाच्या तडाख्यात चिंचमंडळ गावातील चौधरी यांचे राहते घर कोसळले.

आतापर्यंत मला घरकुल किंवा मला कोणताही शासनाचा लाभ मिळाला नाही, मी मजूर आहे आणि मजुरी करित जीवन जगत असल्यामुळे मला या महागाईच्या काळात मी घर बंधू शकलो नाही. आतातरी मला शासनाची मदत आणि घरकुल मिळावी अशी शासनाकडून अपेक्षा आहे.
 -शंकर रघुनाथ चौधरी
शेतमजूर, रा. चिंचमंडळ 

कवितेच्या घराचे बापुरावजी पेटकर काव्य पुरस्कार जाहीर


अशोक इंगळे, अे.के. शेख, एकनाथ आव्हाड, रजनी राठी, शृंखल खेमराज पुरस्कारांचे मानकरी

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : साहित्यक्षेत्रात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय असलेल्या शेगांव बुद्रुक त. वरोरा, जि. चंद्रपूर येथील कवितेच्या घरातर्फे देण्यात येणारे सन २०२३ चे बापुरावजी पेटकर काव्य पुरस्कार नागपूर येथील नेताजी सांस्कृतिक भवनात आयोजित पुरस्कार घोषणा कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, लेखक शत्रुघ्न लोणारे, लॉयन्स क्लबच्या पदाधिकारी प्राचार्या रंजना दाते, संकल्पनाकार किशोर पेटकर, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे प्रामुख्याने उपस्थित होते. 
     
काव्यप्रांतात अभिनव संकल्पना म्हणून गाजत असलेल्या कवितेच्या घराच्या पुरस्कारासाठी  
 महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील (गोवा, बेळगाव) कवींकडून व प्रकाशकांकडून १०८ कवितासंग्रह प्राप्त झाले होते. 
पुरस्कार निवड समितीचे परीक्षक म्हणून नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख व सुप्रसिद्ध कवी डॉ. पी. विठ्ठल तसेच आर्वी येथील प्रसिद्ध गझलकार विद्यानंद हाडके यांनी खालील पाच कवितासंग्रहांची पुरस्कारांसाठी निवड केली. 
      
डॉ. माधुरी मानवटकर पुरस्कृत बापुरावजी पेटकर उत्कृष्ठ कवितासंग्रह पुरस्कार डॉ. अशोक इंगळे (अकोला) यांच्या 'आयडेंन्टिटिचे बॅन्डेट युद्ध' या कवितासंग्रहाला, श्रीकांत पेटकर पुरस्कृत बापुरावजी पेटकर उत्कृष्ठ गझलसंग्रह पुरस्कार अे के शेख (पनवेल, मुंबई) यांच्या 'दिवान ए अेके' या गझलसंग्रहाला, किशोर पेटकर पुरस्कृत बापुरावजी पेटकर उत्कृष्ठ बालकवितासंग्रह पुरस्कार एकनाथ आव्हाड (मुंबई) यांच्या 'पाऊस पाणी हिरवी गाणी' या बालकवितासंग्रहाला, कौशल्याबाई पेटकर पुरस्कृत उत्कृष्ठ हिंदी कवितासंग्रह पुरस्कार रजनी राठी (अमरावती) यांच्या 'धरोहर' या कवितासंग्रहाला तसेच कौशल्याबाई पेटकर उत्कृष्ठ इंग्रजी कवितासंग्रह पुरस्कार शृंखल खेमराज  (नागपूर) यांच्या 'The steadily change' या संग्रहाला जाहीर करण्यात आला. 
   
बापुरावजी पेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी कवितेच्या घरात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर, कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप भेले व प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत पाटील यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त कवींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन नितीन वैद्य यांनी तर आभार शार्दुल पेटकर यांनी मानले. पुरस्कार घोषणा कार्यक्रमाला संजय गोडघाटे, ह्रदय चक्रधर, मधुकर पेटकर, प्रा. प्रवीण वरघणे, डॉ. मृणाली पेटकर, प्रा. योगिता मेश्राम, प्रा. अंजली वरघणे, भारती लभाने, अरविंद वैद्य, संजय पुनवटकर, उपस्थित होते.

वांजरी खानपट्टा धारकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - शहर-ए-मदिना सोशल फाउंडेशनची मागणी


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : शहराच्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वांजरी येथील खुल्या खानीमुळे तयार झालेल्या खोल खानीत शनिवारी (ता.2) सप्टेंबर रोजी वणी शहरातील तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, खान धारकाने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना न केल्याने तीन निष्पाप जीवांचा बळी गेला, असा आरोप करत खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शासनातर्फे मृतकाच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शहर-ए-मदिना सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबतचे निवेदन वणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.

शनिवारी 2 सप्टेंबर ला आसिम अब्दुल सत्तार शेख (16), नुमान शेख साबिर शेख ( 16 ) दोघेही रा. एकता नगर व प्रतीक संजय मडावी (16) रा. प्रगती नगर हे तिघेही मित्र वांजरी येथे असलेल्या खदानीच्या पाण्यात पोहायला गेले होते, पाण्याचा अंदाज न आल्याने त्या ठिकाणी त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण समाजमन हेलावून गेले होते. मात्र, मृतकाच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा खानधारक कुणीही आले नाही. सदर खाण ही शासनाने उत्खणणासाठी भाडे तत्वावर दिली गेली आहे. पावसाळ्यात खानीत पाणी साचत असल्याने उत्खणनाचे काम बंद असते. सदर खान ही पाणी भरल्याने बंद अवस्थेत आहे. मात्र, या ठिकाणी खान धारकाने सुरक्षेच्या दृष्टीने तारांचे कुंपण केले नाही. शिवाय या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात नाही. त्यामुळे 3 निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
शासनाच्या वतीने या मृतक बालकांच्या परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी तसेच वांजरी येथील खानपट्टा धारकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश देण्यात यावे व वणी व मारेगाव तालुक्यातील सर्व खदानीची मोजमाप करण्यात यावे, जे खदान नियमानुसार चालवीत नसेल त्या खदानीचा खानपट्टा रद्द करण्यात यावा व बंद झालेली खदानी नियमाप्रमाणे विल्हेवाट लावण्यात यावी अशी आग्रही विनंती करण्यात आली आहे.

या वेळी मिर्झा जफर बेग, रज्जाक पठाण, सिद्धीक रंगरेज, जाफर अली, मोहंमद आफताब अब्दुल सत्तार, अब्दुल आसीम अब्दुल आलीम, मोबिन शेख, सोहेल अहेमद आझाद अहेमद, अब्दुल सत्तार साहिल हुसैन शेख, इरशाद शेख शेख, संजय मडावी यांच्यासह असंख्य नागरिकांची उपस्थिती होत.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढला जीआर; जरांगेंचं उपोषण सुटणार का?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी या गावात उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा हा जीआर आहे. 
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी करत मनोज जरांगे यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारकडून याबाबतचा अधिकृत जीआर काढण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल निर्देश दिल्याप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याशिवाय मनोज जरांगे पाटील यांना आपले उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे पत्रही देण्यात आले आहे.
पहा अधिकृत जीआर  https://shorturl.at/BDP59