विविध ग्रामपंचायतीतील सदस्य, सरपंचाच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे रोजी मतदान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मुंबई : राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती, राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.
निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. नामनिर्देशनपत्र २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
१८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होईल.

वणीत स्वा.सावरकर एक गौरव यात्रा संपन्न


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 
        
 वणी :  या देशातील स्वातंत्र्य लढ्यात सर्वस्वाचा त्याग करणारे स्वा. सावरकर व अपरिपक्व राजकारणी असलेले राहुल गांधी यांची तुलना होऊच शकत नाही. धर्म की राष्ट्र याची निवड करायची वेळ आली तर आधी राष्ट्राची निवड करा असा स्पष्ट संदेश देणारे सैन्य शक्ती हिच राष्ट्र शक्ती असते हे ठासून सांगणारे स्वा. सावरकर हे या जगातील एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्व होते. असे प्रतिपादन करून मातृभूमीच्या विमोचनार्थ सर्वस्वाची आहुती देणाऱ्या वीर सावरकरांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी जमलेल्या सावरकर भक्तांना विनम्र अभिवादन सावरकर भक्त नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले. ते वणी येथे आयोजित स्वा. सावरकर गौरव यात्रेनंतर झालेल्या जाहीर सभेत मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. 
 
राहुल गांधी व इतर नेत्यांकडून स्वा. सावरकरांचा वारंवार होणाऱ्या अपमानाचा निषेध करण्यासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील स्वा. सावरकर गौरव यात्रा समिती तर्फे रॅलीचे आयोजन करून जाहीर सभेत रूपांतरित झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागास आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे होते. व्यासपीठावर या गौरव यात्रेचे आयोजक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगर संघचालक किरण बुजोणे, माधव सरपटवार, मुन्नालाल तुगणायत, संजय पिंपळशेंडे, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, दिनकर पावडे, विजय पिदूरकर, शिवसेनेचे विनोद मोहितकर, मंगलाताई पावडे, लिशाताई विधाते, संध्या अवताडे, स्मिता नांदेकर, आरती वांढरे, गजानन विधाते, श्रीकांत पोटदुखे प्रामुख्याने उपस्थित होते. 
    
येथील पाण्याच्या टाकीजवळून स्वा. सावरकर भक्तांनी 'होय मी सावरकर' अंकित असलेल्या टोप्या व दुपट्टे घालून सावरकरांच्या प्रतिमेसह शहरातील प्रमुख रस्त्यावरून सावरकरांचा वारंवार होणाऱ्या अपमानाच्या विरोधात व मातृभूमीच्या सन्मानार्थ घोषणा देत पाण्याच्या टाकीजवळून निघालेली गौरव यात्रा टिळक चौकात येऊन जाहीर सभेत रूपांतरित झाली. 
    
जाहीर सभेत या गौरव यात्रेच्या आयोजनामागील भूमिका आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मांडली. त्यानंतर अपर्णा देशपांडे, अनुराधा वैद्य, सुप्रिया मेहता, डॉ. अमृता अलोणे, डॉ. ऐश्वर्या अलोणे, सागर मुने यांनी भारती सरपटवार यांच्या मार्गदर्शनात स्वा. सावरकर रचित जयोस्तुते, जयोस्तुते हे गीत सादर केले.
       
या जाहीर सभेचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, 14 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे स्वा. सावरकर यांच्या सारख्या अनेक महान क्रांतिकारकामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशभक्तांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना हा देश कधीच माफ करणार नाही. अशी जनभावना या प्रसंगी व्यक्त केली. 
      
या प्रसंगी मुख्य वक्त्यांचा परिचय माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे यांनी केले. उपस्थित सावरकर भक्तांना शपथ माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिली. सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले. आभार भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर यांनी मानले.

रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर, केंद्र सरकारची नवी सुविधा, 2024 पर्यंत मिळणार लाभ..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही सरकारच्या मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील 269 जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) फोर्टिफाइड तांदूळ (पोषक घटकांनी समृद्ध) वितरित केला जात आहे. देशातील उर्वरित जिल्हे मार्च 2024 च्या अंतिम मुदतीपूर्वी कव्हर केले जाणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली आहे.

पुढे बोलतांना चोप्रा म्हणाले की, "केंद्र सरकारचा हा एक अनोखा आणि अतिशय यशस्वी उपक्रम असून, गेल्या दोन वर्षांत त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही खूप उत्साहित आहोत." तसेच, यापूर्वी काही गैरसमज झाले होते, मात्र ते दूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, या उपक्रमामुळे स्वस्थ भारताचा पाया रचला जाईल, असे संजीव चोप्रा म्हणाले.

याचबरोबर, आम्ही आतापर्यंत 269 जिल्ह्यांमध्ये पीडीएसद्वारे (रेशन दुकान) मजबूत तांदूळ वितरण सुरू केले आहे. ज्या गतीने आपण प्रगती करत आहोत, ते पाहता उर्वरित जिल्हे मुदतीपूर्वी योजनेच्या कक्षेत आणले जातील, असे संजीव चोप्रा यांनी सांगितले. तसेच, देशात सुमारे 735 जिल्हे आहेत, त्यापैकी 80 टक्क्यांहून अधिक लोक भात खातात. देशात पुरेसा मजबूत तांदूळ आहे, कारण सध्या या तांदळाची उत्पादन क्षमता सुमारे 17 लाख टन आहे, असेही संजीव चोप्रा म्हणाले.


श्री संकट मोचन हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी संकट मोचन हनुमान मंदिर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता विधीवत पूजा करुन हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले व तद्नंतर आरती करण्यात आली. त्यानंतर हवन सुध्दा करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य नागरिकानी  सपत्नीक सहभाग नोंदवला. तसेच सायंकाळी 7 वाजता पुनश्च एकदा हनुमान चालीसाचे पठण करून आरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. बहुसंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाच्या दिनप्रक्रियेमध्ये श्री संकट मोचन हनुमान मंदिर डी आर सी रोड छत्रपती नगर येथे चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोरभाऊ जोरगेवार, यांनी भेट देऊन दर्शन घेतले व मंदिराच्या विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल मंदिर समितीने त्यांचे आभारही मानले. तसेच शिवसेनेचे श्री सुरेशभाऊ पचारे माजी नगरसेवक व शिवसेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री स्वप्निल भाऊ काशीकर यांनीसुद्धा मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री अमित करपे, सचिन पोडे, राकेश नाकाडे, सचिन चलकलवार, सुरेशजी चटारे, पुरुषोत्तम ठेंगणे, प्रमोद एडलावार, विनोद एडलावार, रोहित पुरमशेट्टीवार, सुमित करपे, पवन कन्नमवार, विपीन येलमूले, पुरुषोत्तम राव, महेंद्र तिवारी, राजेश कवाडघरे, अतुल रुईकर, सुमित भोजेकर, गौरीशंकर धामणकर, वैभव मिटकर, अनुप गेघाटे, संदीप मत्ते , नितीन मत्ते, बादल गोरलावार, पवन चामलवार, विकास तायडे, आशिष हेडाऊ, कृपाल नाकाडे,  सचिन मत्ते, सचिन सपाट, विजय हिवरे, महेश भुत्तेवार आदींनी परिश्रम घेतले.

कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर करताना केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने दिनांक १७ मार्च, २०२३ रोजीच्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व १२ हजार ७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले आहे. १५ हजार रुपये इतके मानधन दि. ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे.