स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..दोन वर्षांपासून फरार असलेल्या बंदयास अटक!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी जिल्ह्यातील फरार असलेले आरोपी व संचित अभिवचन रजेवरुन फरार असलेले बंदी यांचा शोध घेवून त्यांना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्या सूचनेवरुन स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके अशा फरार आरोपी व बंदयाची माहिती गोळा करीत असतांना दोन वर्षांपासून नागपूर कारागृहातून अभिवचन रजेवर फरार असलेल्या छोरीया ले- आऊट गणेशपुर (ता.वणी) येथील एका बंदयास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकाने अटक केली. ही कारवाई 28 फेब्रुवारी'ला रात्री करण्यात आली आहे.

बंदी नामे दिपक यशवंत पुणेकर रा. छोरीया ले-आउट गणेशपुर (ता. वणी) असे नागपुर मध्यवर्ती कारागृहाकडुन कारोना आकस्मिक अभिवचन रजेवरुन फरार असलेल्या बंदयाचे नाव आहे. 

मागील काही दिवसांपूर्वी नागपुर मध्यवर्ती कारागृहाकडुन कारोना आकस्मिक अभिवचन रजेवरुन फरार असलेल्या बंदयाची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वणी उपविभागात अशा आरोपीतांचा शोध घेत असतांना नागपुर मध्यवर्ती कारागृहातुन कारोना आकस्मिक अभिवचन रजेवरुन फरार असलेला बंदी नामे दिपक पुणेकर रा. छोरीया ले-आउट हा वणी परिसरातील असल्याने त्याचे बाबत माहिती घेतली असता त्याचे विरुध्द पो.स्टे. राजुरा जि. चंद्रपुर येथे भादवी कलम 224 प्रमाणे गुन्हा नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली. तो नागपुर मध्यवर्ती कारागृहातुन कोरोना आकस्मीक अभिवचन रजेवरून फरार असल्याचे नागपुर कारागृहाकडुन प्राप्त माहिती वरुन निदर्शनात आल्याने सदर बंदयाचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मिळुन आला. त्यास पुढील कारवाई कामी पो.स्टे. राजुरा जि. चंद्रपुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई सपोनि अमोल मुडे, पोउपनि योगेश रंधे,  योगेश डगवार, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सतिश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

आज 1 मार्चपासून हेल्मेटची सक्ती; RTO ने काढला आदेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यवतमाळ जिल्ह्यात बेफाम वाहन चालविणाऱ्यांचा धुडगूस सुरू आहे. त्यातून वारंवार अपघात होऊन प्राणहानी होत आहे. या प्रकाराला पायबंध घालण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती आज 1 मार्चपासून लागू केली आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि पाेलिस दल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार गेल्या वर्षभरात 426 वाहन चालकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. नागरिकांच्या विशेषत: युवा वर्गाच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे असे (RTO) सांगण्यात आले.

आज 1 मार्चपासून या नियमाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे वाहन चालकांना आजपासून हेल्मेट परिधान करावे लागणार आहे. अन्यथा दंडात्मक कारवाईस सामाेरे जावे लागणार असले तरी वणी उपविभागीय क्षेत्रात हेल्मेटची सक्ती किती होईल याकडे बघणे गरजेचे..

उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होणार; विद्यार्थ्यांनो असे करा परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

दहावीचे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असते. या परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांचे भविष्य अवलंबून असते. उद्यापासून दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. म्हणजेच इयत्ता दहावीच्या परीक्षा 2 मार्चपासून सुरू होत आहे. उद्या पहिला पेपर मराठी या विषयाचा आहे. हि परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत.

 मात्र विद्यार्थ्यांनी अतिदक्षता म्हणून अद्यापही पेपरचे वेळेपत्रक डाउनलोड केले नसेल तर https://bit.ly/3Y6Inj3 या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक डाउनलोड करू शकता. 

 यंदाची दहावीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण मंडळ अलर्ट मोडवर आहे. कॉपीमुक्त परीक्षा या मोहिमेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्राच्या 50 मीटरच्या परिसरातील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय गैरप्रकार घडू नये म्हणून केंद्रांभोवती पोलिस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे.

विकास कामावर माहिती फलकाचा अभाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात काही विकास कामे सुरू आहेत. पण चालू असलेल्या विकासकामावर कामाबाबतच्या माहिती फलकाचा अभाव आहे.

सरकारी कोणतेही विकास कामे असो त्या कामाच्या स्थळी कामाबाबत माहितीचे फलक असणे जरुरी आहे, पण असे फलक न लावताच विकास कामे सुरु आहे त्यामुळे ती कामे ठरलेल्या दर्जात होत आहे की नाही हे जाणून घेणे कठीण झाले आहेत.

मागील तीन वर्षांपासून तालुक्यातील मार्डी,मच्छिन्द्रा, नांदेपेरा पूर्णतःवास असून मार्डी-मारेगाव या मार्गाचे मजबुतीकरण रुंदीकरणचे काम सुरू आहे पण या कामाची अंमलबजावणी यंत्रणा कोणती आहे, काम करणारी एजन्सी कोणती आहे, सदर कामाची किंमत किती व किती दिवसात दिवसात पूर्ण करण्यात येईल व कामाबाबत तक्रार असल्यास ती कोणाकडे करावी,कामाचे स्वरूप आदी काही आणखी काही अन्य माहिती दर्शविणारे माहिती फलक कामाच्या स्थळी असणे आवश्यक आहे. पण या कामासह अन्यही कामावर माहिती फलक नाहीत.

चालू कामाच्या ठिकाणी परप्रांतीय मनुष्यबळ असते त्यांचेकडून कामाबाबत माहिती मिळत नाही, त्यामुळे अनेकदा निकृष्ठ दर्जाचे होत असलेल्या कामाबाबत तक्रार करणे कठीण झाले आहे,त्यामुळे विकास काम कोणतेही असो त्या कामाच्या शुभारंभाप्रसंगी पाहिले माहिती दर्शवणारे फलक लावल्या जावे.

अंगणवाडी रिक्त पदभरती प्रक्रियेला आला वेग

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात असून एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत सुरु असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची रिक्त पद भरतीचा तिढा सुटला असून आज १ मार्च पासून १५ मार्च पर्यंत इच्छुका कडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अंगणवाडी रिक्त पदभरती प्रक्रियेला वेग आला आहे.

मारेगाव तालुक्यात अंगणवाडी मदतनीसांची एकूण २२ पदे रिक्त आहे. यामध्ये मार्डी अंगणवाडी केंद्र क्रमांक २,गोरज, वेगाव, आकापूर, मांगरूळ,जळका, किन्हाळा, हिवरा, पार्डी,गाडेगाव, हटवांजरी, सगणापूर, नरसाळा अंगणवाडी केंद्र क्रमांक १ तथा केंद्र क्रमांक ३, टाकळी खैरगांव मच्छिद्रा, पंढरकवडा, शिवनाळा, कोथुर्ला,आणि पेंढारी इत्यादी केंद्राचा समावेश आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने मंजुरात देत येत्या ३१ मे २०२३ पूर्वी भरण्या बाबतचा अध्यादेश धडकला असून ही भरती प्रक्रिया शासनाने निर्देशीत केलेल्या नियमानुसार पार पडणार आहे. या पदभरतीमध्ये इच्छुक उमेदवार हा स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे.

अंगणवाडी मदतनीस या पदाच्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवार हा किमान १२ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. वयाची अट १८ ते ३५ वर्ष असून विधवा साठी वयाची अट ही मात्र, ४० वर्षे ठेवण्यात आली आहे. तसेच सेविकांची ५ पदे रिक्त असून यामध्ये मारेगाव अंगणवाडी केंद्र क्रमांक ३ खैरगांव, मेंढणी, लाखापूर, पाथरी या पाच अंगणवाडी केंद्राचा समावेश असल्यामुळे या रिक्त पदासाठी आज १ मार्च पासून १५ मार्च पर्यंत इच्छुक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवाराची अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय मारेगाव येथे सुट्टीची दिवस वगळून स्विकारली जाणार आहे.