मार्ग वळविल्याप्रकरणी प्रशासनाच्या वतीने मौका पाहणी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : वणी-घोन्सा शिबला राज्य शासनाचा राज्य क्रमांक 314 हा राज्य मार्ग वेकोली प्रशासनाकडून हा चालू रस्ता  खोदल्यामूळे या रस्त्यावरून वाहतूकदारांची गैरसोय होत असून, हा रस्ता तात्काळ दूरूस्त करून पूर्ववत करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषद सदस्या मंगलाताई पावडे व इंदिरा सूत गिरणीचे संचालक दिनकर पावडे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ, सार्वजनिक बांधकाम विभाग वणी यांना दिले होते.
प्रशासनाने निवेदनाची दखल घेत (ता. 6 ऑगस्ट) रोजी खोदून वळविलेला रस्ता वणी-घोन्सा राज्य मार्ग रस्त्याची दूरूस्ती करीता पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम पांढरकवडा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.अरचूंळे, उपअभियंता श्री.ओचावार, शाखा अभियंता श्री.खडसे, वेकोली (WCL) चे श्री गौतम बरसूटकर, इंदिरा सूत गिरणीचे संचालक दिनकर पावडे घटनास्थळी पाहणी करून रस्ता दूरूस्त करून पूर्ववत मार्ग सूरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

थोडा जरी पाणी आला की रोज हीच भानगड


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : मौजा येडशी भागात कोसळधार पाणी पडल्याने येथील रपटा (पुल) हा पाण्याखाली जावून जे-जा करणाऱ्या शाळकरी मुलांना व सभोवतालच्या शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.

थोडा जरी पाणी आला की, येडशी ते मुकुटबन संपर्क तुटतो? या रपटा (पुल) चे काहीतरी करा यासाठी वेळोवेळी कागदोपत्री व्यवहार करून सुद्धा संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत आहे. येडशी ते मुकुटबन हा प्रवास 6 कि.मी अंतराचा असून कित्येक प्रवाशी ऑटो च्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र,या पुलावरून पाणी वाहू लागलं की, वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. अर्जंट कामे थांबून जातात. 


गेली वीस ते पंचवीस वर्षा पूर्वी हा रपटा (पुल) 3/4 फुटाचा बांधण्यात आला. मात्र उंचीला टिल्लू असल्यामुळे नागरिकांना येडशी वरून मुकुटबन व अन्य गावी जाण्यास खूप मोठी कसरत करावी लागते. तसेच आजूबाजूच्या परिसरात येडशी येथील शेतकऱ्यांची शेतीबाडी आहे. शेतीचा हंगाम सुरु कामे सुरू असल्याने मुकुटबनहून मजुरांना येडशी येथे यावं जावं लागतं. मात्र पाऊस आला की, ह्या टिल्लू पुल लगेचच भरून वाहतो. त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करून जावे लागते.


या सतत होणाऱ्या पावसाने आजही या मार्गावर कित्येक नागरिक ताटकडत उभे आहे. मोटारसायकल पासून ते थ्री व्हीलर, चारचाकी पर्यंत वाहन अडकून पडतात. त्यामुळे येडशी वरून मुकुटबन व्हाया मुकुटबन वरून येडशी जायचं  कसे? हा नागरिकांना प्रश्न पडतो. पुलाची उंची कमी असल्यामुळे पाण्याचा अंदाजा लावता येत नाही. अशातच एखादा पेशंट जर बिमार पडला तर सुखरूप घेवून जाता येत नाही. पाण्यामुळे पुलावरून वाहन जात नाही त्यामुळे येडशी वाशियांचा सतत संपर्क तुटतो. या गंभीर बाबीकडे या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी आमदार व बांधकाम विभागाने जातीने लक्ष देऊन हा उंच बांधण्यात यावा, अशी मागणी येडशी  ग्रामस्थ करीत आहे.



आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द – केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी

सह्याद्री चौफेर | न्यूज 

नागपूर : आदिवासी समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी रस्ते, वीज, पाणी, कनेक्टिव्हीटी या चार बाबींत स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. शासनाकडून दुर्गम आदिवासी भागात रस्ते व पुलांची निर्मिती होत आहे. यापुढेही आदिवासी समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले.

जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आदिवासी विकास विभागाव्दारे वनामती येथे आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सव व गुणगौरव सोहळ्याचे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मरस्कोल्हे, आदिवासी विकास अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, सहायक अपर आयुक्त दशरथ कुळमेथे, सहआयुक्त बबिता गिरी, जितेंद्र चौधरी यांच्यासह आदिवासी समाजातील मान्यवर व पुरस्कारार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी आदिवासी बांधवांनी पांरपारिक पध्दतीने तयार केलेल्या गोंडी चित्रकला-हस्तकला, बांबूकाम, काष्टशिल्पे, वनौषधी, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सची केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी पाहणी केली.
देशातील 120 आकांक्षित जिल्ह्यांचे दरडोई उत्पन्न व सकल घरेलू उत्पाद निर्देशांक कमी आहे. यातील बहुसंख्य जिल्हे हे आदिवासीबहुल असून विभागातील गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांचा सर्वांगिण विकास साधावयाचा असेल तर त्याठिकाणी ग्रामोद्योग व कुटीर उद्योगातून रोजगाराची साधने उपलब्ध झाली पाहिजेत. यासाठी त्याठिकाणी उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालापासून वस्तू निर्मितीवर भर दिला पाहिजे. विविध गामोद्योग वस्तू व इथेनॉलसारख्या इंधन निर्मितीतून तेथील आदिवासी बांधव रोजगारक्षम व्हावा. केंद्र व राज्य शासनाचा आदिवासी विकास विभाग ग्रामोद्योग, कुटीर व शेतीवर आधारित उद्योगांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन देतात. या योजनांचा आदिवासी बांधवांनी लाभ घेत आपले गाव, क्षेत्र रोजगारक्षम केले पाहिजे, असे श्री. गडकरी यांनी सांगितले. आदिवासी भागात गोंडी चित्रकला-हस्तकला, मोहफुलांपासून प्रथिनेयुक्त बिस्कीट निर्मिती, वस्त्रोद्योग, बांबूपासून तयार केलेले फर्निचर, नक्षीकाम केलेल्या वस्तू आदीचे काम होते. त्याठिकाणी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षकांनी आदिवासींना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांच्यातर्फे निर्मित वस्तूंना उच्च दर्जा मिळण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विपननाची (ब्रॅन्डींग व मार्केटींग) सुविधाही पुरविण्यात यावी. या भागातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून सीएनजी व इथेनॉल निर्मिती होते. ही इंधननिर्मिती गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांनी केल्यास तेथील इंधनाची गरज स्वयंपूर्ण होईल. यासाठी प्रशासनाने व आदिवासींनी संयुक्तरित्या प्रयत्न करावेत, असे आवाहनही श्री. गडकरी यांनी केले.

नागपूर विभागात वर्धा जिल्हा वगळता इतर पाच जिल्ह्यांत थॅलेसेमिया व सिकलसेल आजाराचे बहुसंख्य रुग्ण आढळून येतात. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना व केंद्रीय आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्याठिकाणी उपाययोजनांसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शासनाच्या विविध आरोग्य, शैक्षणिक, औद्योगिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक आदिवासी दिना‍निमित्त दि. 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान आदिवासी विकास विभागाव्दारे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात आदिवासी स्वातंत्र्य वीरांच्या कुटुंबांचा गौरव, गौरवास्पद कामगिरी केलेल्यांचा व्यक्ति, विद्यार्थ्यांचा गौरव, आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा, आदिवासी संस्कृतीवरील लघुपट, सांस्कृतिक महोत्सव व विविध चर्चासत्र, स्टार्टअपकरिता मार्गदर्शन, नवोदित लेखकांकरीता कार्यशाळा, आदिवासी महिला सबळीकरणाची दिशा व त्यांचे आरोग्य, पेसा वनहक्क कायदा परिसंवाद, शेतीची स्वयंपूर्णता, विदर्भाचा ऐतिहासिक आढावा, आदिवासींचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आदी संदर्भात मार्गदर्शन व यावर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अपर आयुक्त श्री. ठाकरे यांनी प्रास्ताविकातून दिली.

आदिवासी स्वातंत्र्यवीर कुटुंबीयांचे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील गौरवास्पद कागगिरी केलेल्या व्यक्ती व विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

जागतिक आदिवासी दिन साजरा करायला स्वतः समाज कल्याण अधिकारी आदिवासी पोडावर

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी *जानकाई* *पोड* या *मारेगाव तालुक्यातील* दुर्गम कोलाम पोडावर अतिशय उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला .येथे स्वतः समाज कल्याण अधिकारी डॉ.सचिन मडावी उपस्थित होते.              

संपूर्ण गाव लहान मोठे व्यक्ती,महिला,पुरुष प्रत्येक व्यक्ती यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य करत होते.यावेळी स्वतः समाज कल्याण अधिकारी यांनी आपल्या समाज बांधावासोबत नृत्याचा ठेका धरला .संपूर्ण जगात आदिवासी दिन साजरा केला जातो. त्यावेळी अतिशय दुर्गम अशा गावात एवढ्या मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो हेच वैशिष्ट आहे 
           
यावेळी त्यांच्यासोबत श्री. राहुल आत्राम अध्यक्ष शामा दादा कोलाम संघटना,श्री. पैकुजी आत्राम शिक्षक, श्री.आनंदराव मसराम, श्री. संजय आत्राम, चेतन तोडसाम, विक्की आत्राम तसेच गावातील सर्व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंनिस ने आम्हाला खूप दिले, आता आम्ही अंनिस ला देणार- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा वर्धापन दिन लातूर मध्ये विविध उपक्रम राबवून केला साजरा

सह्याद्री चौफेर | न्यूज 

 लातूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 33 वा वर्धापन दिन आज (ता 9 ऑगस्ट) रोजी लातूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी सुनिताताई अरळीकर, व विद्या हतोलकर, या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, तर सायंकाळी 4 वाजता राजर्षी शाहू महाविद्यालयात सर्व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करून "मला महाराष्ट्र अनिस ने काय दिले" हे आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे उपाध्यक्ष अजित निंबाळकर हे उपस्थित होते, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, राज्य कार्यवाह उत्तरेश्वर बिराजदार, जिल्हा प्रधान सचिव सुधीर भोसले हे उपस्थित होते.
 
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अभिवादन गीत घेऊन करण्यात आली, तर प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर यांनी केले,सुधीर भोसले यांनी यावेळी कांही चमत्कार करून त्या मागील वैज्ञानिक कारण याची माहिती दिली, तर उत्तरेश्वर बिराजदार यांनी महाराष्ट्र अनिस ची 33 वर्षातील वाटचाल याविषयी माहिती आणि कार्याचा परिचय करून देत भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य व विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.यावेळी रणजित आचार्य, प्रा दशरथ भिसे, सचिन औरंगे, अजित निंबाळकर, सुधीर भोसले, अनिल दरेकर यांनी मला अंनिस ने काय दिले याविषयी अतिशय मनभेदक असे विचार व्यक्त केले, तसेच आता आम्ही अंनिस ला काय देणार हा निर्धारही व्यक्त केला यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून सर्वांचे अभिनंदन केले.

सदरील कार्यक्रमास राज्य कार्यवाह दिलीप अरळीकर, इम्रान सय्यद, बालाजी सुगावे,सुनिताताई अरळीकर, विद्या हतोलकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दशरथ भिसे यांनी केले तर आभार सचिन औरंगे यांनी मानले.