वणी विधानसभा क्षेत्रात सर्वच पक्ष लागले कामाला, अंतर्गत गटबाजीचे काय?

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी वणी विधानसभा क्षेत्रात भाजपपासून तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष मोठ्या जोमाने कामाला लागले आहेत. परंतु, या सर्वच पक्षांना गटबाजीने ग्रासले आहे. ही गटबाजी साऱ्याच पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

राज्यात महायुतीचे शासन असले तरी स्थानिक पातळीवर मात्र, तीनही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने काम करताना दिसत आहे. भाजप चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर सर्वाधिक फोकस करीत आहे. कारण गेल्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे भाजपचे स्वप्न चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाने भंग केले. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या स्वरूपात पूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 2024 च्या निवडणुकीत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणायचाच, असा चंग भाजपने बांधला आहे. त्यामुळे भाजप या मतदारसंघासाठी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. तब्बल तीनवेळा सलग विजय प्राप्त करणाऱ्या तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री भाजपच्या हंसराज अहिर यांचा 2019 मध्ये काँग्रेसच्या सुरेश धानोरकरांनी पराभव केला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. हा पराभव पुसून टाकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. हंसराज अहिर हे पुन्हा सक्रिय आहे झाले आहेत.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे, तर दुसरीकडे अहिर आणि मुनगंटीवार या दोघांनाही वगळून ओबीसीचा मुद्दा पाहता डॉ. अशोक जीवतोडे यांना भाजप निवडणुकीच्या मैदानात उतरविणार असल्याच्या चर्चेलाही उधाण आले आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीसाठीही चढाओढ

 सुरेश धानोरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. विजय वडेट्टीवार, शिवानी वडेट्टीवार यांच्या नावांची चर्चा आहे. वरोराच्या आमदार असलेल्या स्व. सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनीही लोकसभेसाठी तयारी सुरू केली आहे. सहानुभूतीचा फायदा प्रतिभा धानोरकर यांना पर्यायाने काँग्रेसला होऊ शकतो, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर त्या भाजपसाठी तगडे आव्हान ठरू शकतात.

धानोरकरांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या केंद्रीय यादीत त्यांचे नाव नसतानाही ऐनवेळी त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री भाजपचे हंसराज अहिर यांचा पराभव करून ते निवडून आले. महाराष्ट्रात काँग्रेसने लोकसभेची एकमेव चंद्रपूर ही जागा जिंकल्यामुळे संपूर्ण देशात हा मतदारसंघ चर्चेत आला. भाजपच्या अहिर यांना आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाने तब्बल 57 हजारांची आघाडी देऊनही बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा विधानसभा क्षेत्रात ते माघारले. पक्षांतर्गत विरोधकांचाही त्यांना चांगलाच फटका बसला.