श्री. रामनवमी समितीने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : वणी तालुक्यात सुरु असलेले अवैध धंदे तसेच अवैध वाहतुक बंद करण्याबाबत प्रभु श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी च्या वतीने वणी शहरात स्वाक्षरी मोहीम राबवत आज गुरुवारी थेट पोलीस अधीक्षक यवतमाळ यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष रवि बेलूरकर, प्रणव पिंपळे, नितीन बिहारी, मयूर मेहता, बालाजी भेदोडकर, प्रणित महाकारकर, तुषार घाटोळे, नितीन भटगरे, राजेंद्र सिडाम, ॲड. प्रवीण पाठक, सुमित शिखरे, आदींची उपस्थिती होती.

वणी तालुक्यात तसेच वणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे (मटका, जुगार, कोंबडबाजार, झंडीमुंडी, चेंगळ, कोळसा तस्करी, रेती तस्करी, ड्रग्स, सुगंधीत तंबाखु गुटखा, गांजा) या सारखे अवैध धंदे त्याच प्रमाणे घरफोडी चोरी सर्रास सुरु असल्यामुळे वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच शहरात अवैध वाहतुक, बेधुंद टुव्हिलर गाडी अल्पवयीन मुले चालवित असून वणी शहरामध्ये अॅटोचा थैमान मुख्य मार्गाने दिसून येत आहे. यावर वाहतुक शाखेचे नियंत्रण नसल्यामुळे अवैध अॅटोचालकांची अरेरावी प्रत्यक्ष नागरीकांना पहावयास मिळत असल्याचे निवेदनातून कळविण्यात आले.

वणी शहर हे शांतताप्रिय असून जातीय धर्माचा कुठलाही वाद नसून सर्व नागरीक सलोख्याने राहतात परंतू वणी पोलीस प्रशासनाच्या तसेच वाहतुक शाखेच्या पोलीस विभागाचा वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण नसून वणी शहरात अवैध धंद्याला पुर्णतः मोकळीक पोलीस प्रशासनाने दिली असून अनेक अवैध धंद्यांना उत आलेला दिसत आहे. यामुळे वणी तालुक्यात एक भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. पोलीस प्रशासनाचा ज्या प्रमाणे धाक निर्माण असायला पाहीजे तो नाहीसा झालेला दिसत आहे. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींचे डोके वर आल्याचा थेट असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

सर्व बाबीवर विचार करून येथील रामनवमी उत्सव समिती तसेच समाजातील विवीध संघटनांनी व सुज्ञ नागरीकांनी या निवेदनाव्दारे निषेध नोंदविला आहे. या अधिकाऱ्यांवर आपण तत्काळ कारवाई करावी किंवा त्यांची बदली करुन एक कडक प्रशासन निर्माण करणारे पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी आणि वणी तालुक्यातील होणाऱ्या दुर्घटना किंवा दुष्परिणाम टाळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली असून दिलेल्या निवेदनावर तत्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा रामनवमी उत्सव समितीचे सदस्य व सामान्य नागरिक आणि विविध संघटनेच्या वतीने पुढील एक दिवसीय धरणे आंदोलन उभारेल व महाराष्ट्राचे गृहमंत्री यांना निवेदन देवून पुढील आक्रमक आंदोलनाची दिशा ठरविली जातील अशा गर्भीत ईशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावर वरिष्ठ काय कारवाई करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. 

चौकात कुत्र्याने घेतला चावा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून लोकांना फिरताना जीव मुठीत धरुन फिरावे लागत आहे. संबंधित नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

छत्रपति शिवाजी महाराज चौकात मध्यप्रदेश बुऱ्हाणपूर येथून आपले कापूस गाठीच्या कामानिमित्त आलेले प्रवीण पुंडलिक भालेराव हे पायदळ चालत असताना काल रात्री 9 वाजता दरम्यान एका कुत्र्याने अचानक हल्ला करीत दोन्ही पायांना चावा घेतला. ही बाब युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपले गाडीने त्याला शिवसैनिका सोबत तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पाठवून उपचार करवून घेतले.

वणी शहराची काही वर्षापासून लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेल्या बाहेरील लेआऊट मध्ये भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला जात असतात त्यांना रस्त्यावरून जात असताना भटक्या कुत्र्यांचा सामना करावा लागत आहे. काही वेळा ही कुत्री वाहनधारक व सायकल स्वरांचा पाठलाग करून अनेकांना चावलेल्या घटनाही घडलेल्या आहेत.

छत्रपति शिवाजी महाराज चौक या परिसरात अनेक खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, दुकाने असल्याने येथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते. खाद्यपदार्थांच्या हातगाड्या वरील खरकटे व दुकानातील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट न लावता याच परिसरात टाकण्यात येते त्यामुळे भटकी कुत्री या ठिकाणी जास्त प्रमाणात येत असतात.

प्रशासनाचे दुर्लक्ष - अजिंक्य शेंडे

परिसरातील स्वच्छता कचरा वेळेत उठाव न करणे त्यामुळे अन्नपदार्थ शोधण्यासाठी कुत्रे येतात तसेच भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण होत नसल्याने दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढू लागली आहे संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे ही गरज असून पालिकेकडे पाठपुरावा करुन लवकरच भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील राहू. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा लागेल.

-अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख वणी.

मोहदा ग्रामपंचायत च्या वतीने किशोरवयीन मुलींची कार्यशाळा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : किशोरवयीन मुलींना सकारात्मक आधार देऊन याबाबतचे शिक्षण देण्यासंबंधी व स्वच्छतेविषयी उपदेशन मिळणे अत्यंत गरजेचे असते आज दि. 9 जाने. ला याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मोहदा ग्रामपंचायत च्या वतीने किशोरवयीन मुलींची कार्यशाळा आयोजित कार्यक्रमाला मा.श्री. गणेशजी किंद्रे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी हे मार्गदर्शन करणार आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. वर्षा रवींद्र राजूरकर सरपंच ग्रामपंचायत मोहदा, उदघाटक मा. श्री. गज्जलवार गट विकास अधिकारी पं स वणी, तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. कु. अश्विनी रायबोले, पोलीस उपनिरीक्षक, वणी,मा.श्री. माधवजी शिंदे साहेब, ठाणेदार पोलीस स्टेशन, शिरपूर, मा.श्री. सुभाष लोखंडे,गट समन्वयक पं.स.वणी, मा.सौ. सुषमा अरके, अंगणवाडी पर्यवेक्षिका वणी, मा. कु. प्रिया नाकाडे, सामाजिक कार्यकर्त्या वणी, मा.श्री मनोज उरकुडे, ग्राम पंचायत अधिकारी मोहदा, मा.श्री. राहुल मानकर, मुख्याध्यापक नालंदा विद्यालय वेळाबाई, मा.श्री. श्रीराम वाघमारे, मुख्याध्यापक जि.प. शाळा मोहदा तसेच उपसरपंच, सदस्य, अगंणवाडी सेविका, आशा वर्कर, तंटामुक्ती अध्यक्ष यांची उपस्थिती असणार आहेत.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत किशोरवयीन मुलींची कार्यशाळा, कचरा कुंडी वाटप व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन या कार्यशाळेत किशोरवयीन मुलींना विस्तृत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय, मोहदा यांचे तर्फे केले आहे. 

मिमिक्री कलावंत आकाश महाडुळे यांचा नागपुरात सत्कार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी उपविभागात वेगवेगळ्या आवाजासाठी प्रसिध्द असलेले मिमिक्री कलावंत आकाश महाडुळे साखरा (दरा) यांची श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज संघटन नागपुर (विदर्भ) यांनी दखल घेवुन त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. 5 जानेवारी 2025 ला सावित्री बाई फुले जयंती निमित्त नागपुर विदर्भ येथे कोसरे माळी समाज संघटना यांनी माळी समाजातील विदर्भातील प्रत्येक जिल्यातुन सामाजिक, व्यावसायिक, उद्योजक ,शेतकरी, प्रशासकीय क्षेत्रात प्रसिध्दी मिळवणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला व त्याच बरोबर सांस्कृतिक क्षेत्रात आपली नवीन ओळख करत असलेले एकपात्री कलाकार "मी सावित्री बोलते" कु.सखिला मुखरू गुरनुले जि.गडचिरोली व मनोरंजनातून प्रबोधन करत विदर्भातील प्रत्त्येक जिल्ह्यात आणि वणी तालुक्यात आपल्या वेगवेगळ्या आवाजातून प्रसिध्दी मिळवणारे मिमिक्री कलावंत आकाश महाडुळे यांची त्या कार्यक्रमात विशेष आकर्षण म्हणून उपस्थिती होती. त्याच बरोबर कलावंत आकाश महाडुळे यांनी कार्यक्रमाच्या मानधनातून गावातील शाळेत पेन व रजिस्टर वाटप केल्यामुळे कोसरे माळी समाज संघटनेचे अध्यक्ष क्रिष्णा महादुरे यांनी भरभरून कौतुक केले, समाजासमोर मिमिक्री सादर करुण समाजबांधवांचे मने जिंकली आणि कार्यक्रमाच्या शेवटी आकाश महाडुळे यांनी कोसरे माळी समाज संघटना नागपुर (विदर्भ) यांचे आभार मानले.

ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामपंचायत अधिकारी विरोधात योगीराज बल्की यांचे आमरण उपोषण

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : डोल-डोंगरगाव गट ग्रामपंचायतच्या सरपंच व सचिव यांनी कार्यालयीन कामे नियमित करित नसल्याच्या विरोधात लाखापूर येथील उपसरपंचा यांचे पती योगीराज बल्की हे १० जाने. २०२५ पासून गावातच आमरण उपोषणास बसणार आहे. याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्याची माहिती आहे. 
पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येत असलेल्या डोलडोंगरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत अधिकारी व इतर कर्मचारी हे गांव विकास आणि ग्राम पातळीवर असलेल्या विविध समम्याकडे लक्ष देत नसून या दोनही गावातील ग्रामवासी त्यांच्या अंधाधुंद कारभारामुळे त्रस्त आहे. याआधी या गट ग्रामपंचायत यांना ग्राम समम्या तोंडी व लेखी स्वरुपात निवेदन सादर केले पण त्यांना अजुनही जाग आली नाही,असं निवेदनात नमूद आहे. पुढे असेही म्हटलं आहे की, ग्राम पातळीवर असलेल्या अनेक ग्राम हितपयोगी समस्याचे निराकरण करण्यासाठी या झोपी गेलेल्या गट ग्राम पंचायत डोल डोंगरगाव येथील सरपंच ग्रामपंचायत अधिकारी दुर्वे व इतर कर्मचारी यांना त्यांच्या कर्तव्यची जाग आणून ग्राम समस्या सोडवण्यास पुढाकार घेऊन आम्हाला न्याय द्यावा याकरिता लाखापूर येथील नागरिक तथा गुरुदेव सेवाधिकारी योगीराज बल्की यांनी लाखापूर गावातच हनुमान मंदिरात आमरण उपोषण करण्याचे हत्यार उपसणार आहे. याबाबत त्यांनी आमदार संजय देरकर यांना देखील निवेदन दिले, उद्या शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून ते आमरण उपोषणास बसणार असल्याचे बल्की यांनी सांगीतले आहे.