आद्य क्रीडा पत्रकार हरपला : सुधीर मुनगंटीवार यांची वि.वी. करमरकर यांना श्रद्धांजली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : “वि.वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेतील आद्य क्रीडा पत्रकार आणि एक चांगला क्रीडा समीक्षक हरपला आहे,” अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वि.वि. करमरकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

टीव्ही नसलेल्या काळात त्यांची क्रीडा वार्तापत्रे गावोगावी लोकप्रिय होती, ती अजूनही लक्षात आहेत, असे सांगून श्री.मुनगंटीवार म्हणाले की, मराठी पत्रकारितेत क्रीडा क्षेत्राला महत्त्व मिळवून देण्यात वि.वि. करमरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. ज्या काळात मराठी पत्रकारितेत क्रीडा क्षेत्र दुर्लक्षित होते, तेव्हा वि.वि. करमरकर यांची महाराष्ट्र टाइम्सच्या शेवटच्या पानावर प्रकाशित होणारी क्रीडा वार्तापत्रे इतकी लोकप्रिय झाली की अन्य मराठी वर्तमानपत्रांनी क्रीडा विषयक पान सुरू केले. वि.वि. करमरकरांचे वैशिष्ट्य हे की ते क्रिकेटपुरते थांबले नाहीत तर इतर सर्व खेळांनाही त्यांनी वृत्तपत्रात तितकेच महत्त्व प्राप्त करून दिले, असे श्री. मुनगंटीवार म्हणाले.

वि.वि. करमरकरांची आकाशवाणीवरील क्रीडा समालोचनही तितकेच लोकप्रिय झाले होते, असे सांगून मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले की, क्रीडा पत्रकारितेला मराठी वृत्तपत्र सृष्टीत करमरकरांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. स्वतः समाजवादी असले तरी क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या पत्रकारितेपासून त्यांचे राजकीय विचार वेगळे राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज वि.वि. करमरकरांच्या मृत्यूने आपण एक समर्पित क्रीडा समालोचक गमावला आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबीय व चाहत्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशी प्रार्थनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

विदर्भात भारतीय परंपरेनुसार होणार सी-२० सदस्यांचे स्वागत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

नागपूर : जी-20 परिषदेअंतर्गत सिव्हील सोसायटी अर्थात सी-20 च्या प्रारंभिक परिषदेचे आयोजन शहरात 20 ते 22 मार्च 2023 दरम्यान करण्यात आले आहे. यानिमित्त बैठकीला येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांचे स्वागत भारतीय परंपरेनुसार करण्याचे नियोजन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

सी-20 परिषदेच्या पाहुण्यांचे विमानतळावरील स्वागताबाबत नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज घेतला. विमानतळ येथील सभागृहात आयोजित आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठाण, मिहान विमानतळ संचालक आबीद रूही, सहव्यवस्थापक अमित कासटवार, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) जगदीश कातकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर प्रामुख्याने उपस्थित होते.

असे होणार पाहुण्यांचे स्वागत

सी-20 परिषदेत सहभाग नोंदविण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समिती स्थापन केली आहे. ही समिती पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करेल. विमानतळावर पाहुण्यांसाठी विशेष स्वागत कक्ष उभारण्यात येणार आहे. स्वागत कक्षात भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांना फेटा बांधण्यात येईल तसेच महिलांना नऊवारी साडी नेसवून मेहंदी लावण्यात येईल. पाहुण्यांना टिळा लावून ओवळण्यात येईल व सेवाग्राम येथील सूतमाला घालून त्यांचे स्वागत करण्यात येईल. यावेळी स्वागत शहनाईचे वादन देखील करण्यात येणार आहे. पाहुण्यांना विमानतळ ते वाहनापर्यंत विद्यार्थ्यांची टिम नृत्य करत घेऊन जाईल. तसेच नियोजित राहण्याच्या ठिकाणी पोहचल्यावर हॉटेलच्या गेटपासून आतपर्यंत विद्यार्थ्यांची लेझीम टीम त्यांना वाजतगाजत घेऊन जाणार आहे.

संपर्क अधिकारी नेमणार

येणाऱ्या पाहुण्यांना कोणतीही अडचण जावू नये यासाठी विमानतळावर विशेष मदत केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. पाहुण्यांसाठी प्रत्येक देशनिहाय संपर्क अधिकारी नेमण्यात येणार असून भाषेची अडचण होऊ नये म्हणून विद्यापीठाचे विद्यार्थी त्यांचेसोबत राहून दुभाषकाचे काम करतील.

याशिवाय विमानतळावर त्यांचे सामान वहनासाळी विशेष व्यवस्था राहील. आकस्मिक सेवेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम, रुग्णवाहिका, अग्नीरोधक यंत्रणा तसेच अतिरिक्त वाहतूक सेवा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

बैठकीत प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या समित्या तयार करून त्यांचेकडे जबाबदारी सोपविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी दिले.

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस होणार अवकाळी पाऊस - हवामान विभागाचा अंदाज जारी

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 8 मार्चपर्यंत काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. असा अंदाज वर्तविण्यात आला असतांना आज पुण्यात सायंकाळी शिवाजीनगर भागासह इतरत्र, पावसाची संततधार सर पडल्यामुळे, होळीच्या तयारीवर बऱ्याच ठिकाणी, उत्साहावर विरजण पडलं.

राज्यात काल 5 मार्च अहमदनगर, नाशिक, पालघर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात तर काही ठिकाणी गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅडस्; ‘जन औषधी सुगम’ ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत.

आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७४३ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. यावर्षी दिनांक डिसेंबर २०२३ पर्यंत या केंद्रांची संख्या १० हजारपर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जनऔषधी जेनेरिक औषधांच्या किमती खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा ५० ते ९० टक्के कमी आहेत. त्यामुळे, ही योजना दररोज औषधे घेत असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याची ठरत आहे.चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आतापर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांद्वारे ११०० कोटी रुपयांची विक्री झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुमारे ६६०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. मागील आठ वर्षांत जनऔषधी केंद्रांची संख्या जवळपास १०० पटीने वाढली आहे आणि त्याचप्रमाणे जनऔषधी औषधांच्या विक्रीतही १०० पटींनी वाढ झाली आहे आणि अंदाजे २० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. (त्यानुसार मागील ८ वर्षात सुमारे २० हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.)

महिलांच्या आरोग्य सुरक्षेची दखल घेऊन, भारत सरकारने जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड सर्व जन औषधी केंद्रांमध्ये माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत. जन औषधी केंद्रांवर जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड्स रु. १/- प्रति पॅड या दरामध्ये उपलब्ध आहेत. जन औषधी केंद्र चालकांना शासनाकडून रु. ५.०० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. महिला उद्योजक, दिव्यांग व्यक्ती, निवृत्त सैनिक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना तसेच ईशान्येकडील राज्यांच्या डोंगराळ भागातील अर्जदारांना रु.२.०० लाखांची आर्थिक मदत दिली जाते.

“जन औषधी सुगम" नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन आता Google Play Store आणि Apple Store वर उपलब्ध आहे. त्याशिवाय या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता तुम्हाला आवश्यक असलेल्या औषधांची माहिती कधीही - कुठेही मिळू शकणार आहे. औषधाची किंमत, उपलब्धता आणि तुमच्या जवळच्या जन औषधी केंद्राची माहिती इत्यादीबाबत या ॲपद्वारे माहिती मिळेल.

विभागीय संपर्क अधिकारी (अन्न व औषध प्रशासन)


शेतकऱ्यांच्या मुलाला प्रधानमंत्री करा, शेतकऱ्यांच - बहुजनांच सरकार आणायचं आहे - प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचे प्रतिपादन


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : देशातील सद्याच्या राजकीय परिस्थिती बघता लोकशाही जिवंत राहील की नाही याबाबत साशंकता आहे. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत गंभीर आणि धोकादायक संकट आहे. आजच्या परिस्थितीबाबत विश्लेषण करत असताना शेतकऱ्यांचे उदाहरण देऊन तुमची प्रचंड मोठी विहीर आहे. शेतामध्ये प्रचंड पाणी आहे, तुमची इलेक्ट्रिकची लाईन विहिरीपर्यंत गेली असेल, तुम्ही मोटार सुद्धा फिट केली, असेल पण पंपाचं कनेक्शन केलं नसेल तर तुमची विहीर, पंप, पाणी बिनकामाचे आहे आणि त्यामुळे तुमचं शेत सुकल्याशिवाय राहणार नाही तसेच चळवळीच सुद्धा झालं आहे. आम्ही चळवळीच्या माध्यमातून आंदोलन खूप करतो ,ओबीसीच असं करू, तसं करू;पण मतदान करताना आमची बुद्धी मात्र विरोधकांनाच मतदान करते. तर मग तुमच्या या चळवळीला कवडीचीही किंमत राहत नाही असे मी समजतो. आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार , शेतकऱ्याच सरकार, बहुजनांच सरकार असलं पाहिजे. त्यासाठी प्रधानमंत्रीपदी शेतकऱ्यांचा मुलगा असला पाहिजे. असे प्रतिपादन प्रा. ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष-लोकजागर अभियान,नागपूर हे "जातनिहाय जनगणना आणि OBC(VJ, NT, SBC) आंदोलनाची भूमिका" याविषयावर बोलताना केले. OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात दि. ०४ मार्चला त्यांनी मार्गदर्शन करताना वरील मत व्यक्त केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले व जाहीर सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. केंद्राची किंवा राज्याची एकही योजना जी सर्वसामान्य लोकांसाठी बेरोजगारांसाठी,कर्मचाऱ्यांसाठी, भगीनींसाठी असेल ? अशी कुठलीही योजना नाही. असे प्रतिपादन उदघाटक खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.सत्कारमूर्ती महाराष्ट्राचे भूषण डॉ.भालचंद्र चोपणे साहेब आणि विधानपरिषदेकरिता नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले सर, धिरज लिंगाडे, अभिजीत वंजारी यांचा जाहीर सत्कार मान्यवरांच्या हस्ते व OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार अभिजीत वंजारी यांनी वणी विषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ.भालचंद्र चोपणे साहेब यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. डॉ.भालचंद्र चोपणे साहेब, आमदार सुधाकर अडबाले,आमदार धिरज लिंगाडे यांनी सत्काराबाबत आयोजकांचे आभार मानले. आम्ही जुन्या पेन्शनचे पुरस्कर्ते आहोत. जुनीच पेन्शन लागू करण्यासाठी सरकारकडे प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन केले. जाहीर सत्कार सोहळाचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप प्रमुख-विदर्भ राज्य आंदोलन समिती यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. स्वागताध्यक्ष संजय खाडे अध्यक्ष-रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेड,वणी यांनी उपस्थितांचे स्वागत करून OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या कार्याला सदिच्छा दिल्या. विचारपीठावर सत्कारमूर्ती डॉ. भालचंद्र चोपणे साहेब, आमदार सुधाकर अडबाले सर,आमदार धिरज लिंगाडे,आमदार अभिजीत वंजारी तसेच आमदार प्रतिभाताई धानोरकर, वरोरा-भद्रावती, मा. तात्यासाहेब मत्ते,सदस्य-विदर्भ राज्य आंदोलन समिती,जातनिहाय जनगणना कृती समितीचे अध्यक्ष-प्रदिप बोनगिरवार आणि OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील समाज संघटनाचे प्रतिनिधी इत्यादी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून मोहन हरडे सर यांनी जातनिहाय जनगणना व जुनी पेन्शन ही का आवश्यक आहे हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप बोरकुटे सर व रघुनाथ कांडारकर सर यांनी तर सत्कारमूर्तीचा परिचय रवी चांदणे व नितीन मोवाडे तर चोपणे साहेबांचे सन्मानपत्र वाचन सोनाली जेनेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. राम मुडे यांनी मानले. या जाहीर सत्कार समारंभात मा वामनराव चटप साहेबानी वेगळा विदर्भ राज्य का महत्वाचा आहे? यावर विधान करून 31 डिसेंबर 2023 पर्यत वेगळा विदर्भ राज्य केल्याशिवाय शांत बसणार नाही असे ठामपणे सांगितले.या जाहीर सत्कार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात वणीकरांनी उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.