दिव्यांग बांधवांसाठी सेवा केंद्र सुरु करणार - आ. किशोर जोरगेवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : दिव्यांग बांधवांना दैनदिन जीवनात येत असलेल्या अडचणींची मला कल्पना आहे. त्यांचे जीवनमान उंचवावे या दिशेनेही माझे प्रयत्न सुरु आहे. त्यांना येणा-या अडचणी सोडविण्याला मी प्राधान्य देत असून दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता यावा या करीता येत्या काळात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिव्यांग सेवा केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

दिव्यांग दिना निमित्य यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात दिव्यांग बांधवांचा व त्यांचा सांभाळ करणा-या त्यांच्या कुटुंबाचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यंग चांदा बिग्रेडच्या दिव्यांग विभागाच्या प्रमूख कल्पना शिंदे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, दिव्यांग कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष निलेश पाझारे, जेष्ठ दिव्यांग तरुण तिवारी, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, मुन्ना खोब्रागडे आदि मान्यवरांची मचांवर उपस्थिती होती.
 दिव्यांग बांधवांसाठी शक्य ते उपक्रम यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राबविण्यात येत आहे.

 या उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना सायकल, व्हिल चेअर वाटपही केल्या गेले आहे. तसेच त्यांना आर्थिक सक्षम करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारातून आर्थिक प्रगती करता यावी या करिता आपण बस स्थानक तसेच मुख्य चौकाच्या ठिकाणी मागेल त्याला हातठेला हा उपक्रम राबविणार आहोत. याकरिता दिव्यांग बांधवांनी जागा निश्चीत करावी असेही ते यावेळी म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी शासनाच्या विविध योजना कार्यन्वीत आहे. मात्र सदरहु योजनेच्या माहिती अभावी त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यांची ही अडचण लक्षात घेता यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात आपण दिव्यांग बांधवांसाठी सेवा केंद्र सुरु करणार आहोत. या सेवा केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना येणा-या अडचणी सोडविल्या जातील तसेच विविध शासकीय योजनांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाईल पात्र दिव्यांग बांधवांना सदरहु योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीही हे केंद्र काम करेल असेही ते यावेळी म्हणाले.
 या कार्यक्रमात भाग्यश्री कोलते, लक्ष्मी कुमरे, अंड्स्कर, कैलाश ब्राम्हणे, निलेश पाझारे, नितीन खोब्रागडे, आलिया शेख, मुन्ना खोब्रागडे, शिवशंकर कोकते, वनमाला ठाकरे, अविनाश कोरेकर, कार्तीक खडसे, शितल सातपूते आदि दिव्यांग बांधवांचा शाल, श्रीफळ, पुच्छगुच्छ व सन्मानचिन्ह देउन आमदार जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कल्पना शिंदे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर दर्शना चाफले यांनी अभार मानले.

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता रविंद्र उपरे, सचिन फुलझेले, सतिश मुल्लेवार, अर्पीत चैधरी, उत्तम साव, पंकज मिश्रा, मंगेश ढोले, रंजिता बिस्वास, किरण करमनकर आदींनी परिश्रम घेतले.

कोतवाल संघटनेच्या मागण्या मंजूर न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा कोतवाल संघटनेचा ईशारा


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : महसूल विभागाचा कणा असलेला कोतवाल हा घटक गेल्या 60 वर्षांपासून चतुर्थ श्रेणीसाठी सतत झगडत आहे. कोतवाल हा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करणारा, विभागातील स्थानिक पातळीवरील महसूल गोळा करणे, गौण खणिजास आळा घालुन महसूल बसविणे, निवडणूक कामकाज,नैसर्गिक आपत्ती, पीक पाहून दुष्काळात नुकसान भरपाई पांचानामाचे सर्व्हे करणे,स्थानिक पातळीवर सुरक्षा व सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता पोलिस पाटील व पोलिस प्रशासनाला मदत करणे. अशा अनेक कामात महत्वाची भूमिका बजावणारा कोतवाल हा घटक गेल्या 60 वर्षापासून झगडत असलेल्या ह्या घटकाला आजतागायत न्याय मिळालेला नाही.

झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारने कोतवाल बांधवांच्या मागण्या जर येत्या 12 तारखेपर्यंत मान्य ना केल्यास 13 तारखेपासून मुंबई येथे राज्यातील 12637 कोतवाला़नी बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुंबई येथे दिलेल्या निवेदनास महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जी. यवतमाळ पूर्णपणे पाठिंब्यासहीत आंदोलनात सहभागी होण्याचे ठरविले आहे.
     
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धावराव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालाचा विषय निकाली काढावा अन्यथा होणाऱ्या नुकसानीस राज्य शासन स्वतः जबाबदार असेल, त्यामूळे तातडीने बैठक लाऊन गेल्या 50 - 60 वर्षापासून च्यां मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी रेटून धरली आहे.
   
यावेळी शशिकांत निमसटकर जिल्ला अध्यक्ष ,सुरेश येरमे तालुका अध्यक्ष,अतुल बोबडे तालुका सचिव,विनोद मडावी,अमित सातपुते,अशोक पेंदोर,गणेश उराडे,बळवंत कोवे,व लहु भोंगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अभिनय क्षेत्रात परिश्रम अनिवार्य - सलीम शेख


सह्याद्री न्यूज | शंकर घुगरे 

वणी : "शिक्षण घेऊन चांगली नोकरी करणे ही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते त्यात काही गैर नाही मात्र ते प्रत्येकाला संभव होत नाही. त्यामुळे केवळ नोकरी म्हणजेच करिअर ही कल्पना बाजूला करून आपल्यातील गुणांच्या आधारे अभिनय क्षेत्रात आत्मविश्वासाने पदार्पण करून तुम्ही करिअर करू शकता. येथे योग्य परीक्षा करून घेतल्यास तुम्हाला यश नक्की प्राप्त होते." असे मत अघोर या चित्रपटाचे दिग्दर्शक तथा नाट्यकर्मी सलीम शेख यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सिनर्जिया उपक्रमाअंतर्गत राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित कला क्षेत्रातील करियर या विषयावर ते आभासी पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा वणीतील ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सोनटक्के उपस्थित होते.
१९९७ पासून नाट्य क्षेत्रात कार्यरत शेख यांनी विविध ३० नाटकांचे ५०० यशस्वी प्रयोग सादर केले आहेत. या अनुभवाच्या आधारे या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने प्रवेश करावा आणि कोणती काळजी घ्यावी याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ विकास जुनगरी यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी प्रा.गणेश माघाडे यांनी सांभाळली.
कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. गुलशन कुथे आणि जयंत त्रिवेदी यांनी सांभाळली.

स्वराज्य शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा व पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस मध्ये प्रवेश

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : स्वराज युवा शेतकरी संघटनेचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये काल खा.बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. या जाहीर पक्ष प्रवेशाने शहरातील राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मारेगाव नगरपंचायतची सार्वत्रिक निवडणूक येत्या २१ डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा धुराळा रंगणार आहे. निवडणुकीचे बिगुल वाजला असतांना माजी शिवसेना तालुका प्रमुख तथा स्वराज्य युवा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर, माजी पंचायत समिती सदस्या सुनीता मेश्राम, माजी नगराध्यक्ष इंदूताई किन्हेकर, विजय मेश्राम, विशाल किन्हेकर, माजी नगरसेवक उमा देवगडे यांच्यासह शहर आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
पक्ष प्रवेशाने काँग्रेस ला शहरात अधिकच बळ मिळाल्याने आगामी काळात राजकीय समिकरण बदलण्याची संभाव्य शक्यता बळावली आहे. परिणामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वर्चस्व निर्माण करणाऱ्या गजानन किन्हेकर यांच्या पक्ष प्रवेशाने काँग्रेसची स्थिती आणखीच स्ट्रॉंग झाली आहे. 

कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमास मंचावर खा.बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार, बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील ठाकरे, जिप सदस्या अरुणा खंडाळकर, आशिष खुलसंगे, आकाश बडकी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,सूत्रसंचालन चौधरी सर तर, शंकर मडावी यांनी आभार मानले.

आदिवासी समाजासाठी पाच सामाजिक सभागृह उभारणार - आ. किशोर जोरगेवार


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : गोंड राजाने राज्य केलेल्या चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. मात्र या जिल्ह्याचा खरा मालक असलेला आदिवासी बांधव आजही आपल्या मुलभूत हक्कासांठी संघर्ष करणे ही चिंतेसह चिंतनाची बाब आहे. आता हि परिस्थिती बदलविण्याची गरज आहे. वेळोवेळी समाजाचे प्रबोधन होणे गरजेचे असून, समाज प्रबोधनासह इतर कार्यक्रम घेणे त्यांना सोईचे व्हावे या करिता आपण चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात त्यांच्या हक्काचे पाच सामाजिक सभागृह उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्याण संस्थेच्या वतीने आज शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी चांदागडचे श्रीमंत गोंडराजे विरेंद्रशाह आश्राम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, संतोषसिंह रावत, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष मनोज आश्राम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा प्रदेशाध्यक्ष गजानन जुमनाके, जनसेवा गोडवाना पार्टीचे प्रदेशाध्यक्ष धिरज शेडमाके, गोंडीयन सामाजिक सहाय्यता कल्यान संस्थाचे अध्यक्ष लोकेश मडावी, आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधूकर उईके, क्षयरोग व कृष्ठरोग तज्ञ, जनरल सर्जन डॉ. श्रीनिवास सुरपाम, आफ्रोट संघटनेचे प्रबंधक भारतीय खाद्य निगम तथा संस्थापक सचिव नंदकिशोर कोडापे, अॅड. प्रियाशी टेकाम आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

चंद्रपूर हा आदिवासी संस्कृती जोपासणारा जिल्हा आहे. चंद्रपूरात आदिवासी समाजाच्या वास्तू आजही गोंडकालीन राजवटीची साक्ष देत उभ्या आहेत. मात्र बदलत्या काळात या वास्तूंकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामूळे याचे जतन करने ही काळाची गरज असून समाजातील पुढाऱ्यांनी यात पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी त्यांनी या बोलून दाखविले.

गोंडराजांनी चंद्रपूर जिल्ह्यावर जवळपास 500 वर्ष राज्य केले. त्यांच्या राजवटीत त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान न्याय दिला. समाजिक एक्क्यासाठी विविध धार्मीक स्थळे समाजापयोगी योजना शाळा व इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्यात त्यामूळे या सर्व गोष्टींसह आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रालय चंद्रपूरात साकार व्हावे या करीता मी प्रयत्न करणार असल्याचेही ते पुढे म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बार्टी या संस्थेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन व्हावे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे गोंडी साहित्य अध्यासन केंद्र तयार व्हावे यासाठीही संबधीत विभागाशी पाठपूरावा करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले .
आदिवासी समाजासाठी शासनानेही विविध योजना लागू केल्या आहे. या योजना समाजातील शेवटच्या गरजू पर्यत पोहचविण्याची गरज आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीनेही येत्या काळात आदिवासी समाजाच्या योजना समाजापर्यंत पोहचाव्यात या करिता मोहिम सुरु केल्या जाणार आहे. यात समाजानेही सहकार्य करावे असे आवाहन यावेळी आ. जोरगेवार यांनी केले. तसेच आदिवासी समाजातील विद्यार्थी हा आता शिक्षण क्षेत्रातही यशस्वी झेप घेत आहे. मात्र अपू-या सोई सुविधांमूळे उच्च शिक्षणात त्याला अडचणी येत असल्याची कल्पना मला आहे. या करिता आदिवासी समाजासाठी आपण 50 लक्ष रुपयातून सूसज्ज अभ्यासिका तयार करणार असल्याची घोषणाही त्यांनी या अधिवेशनात त्यांनी केली. अधिवेशनात आ. जोरगेवार यांचा आदिवासी समाजाचे मानचिन्ह असलेले मोरपंख व पिवळा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.