एकोना विस्तारीत प्रकल्पग्रस्तांना त्वरीत मोबदला व नोकरी द्यावी - हंसराज अहीर


सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे 
चंद्रपूर, (३ जुलै) : वेकोलि माजरी क्षेत्रातील एकोना  एक्स्टेंशनकरिता अधिग्रहीत केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांना अजुनपर्यंत जमिनीचा मोबदला व नोकरी देण्यात आलेली नाही. जमिनीमध्ये सिंचनाची सुविधा असतांना या जमिनींना सिंचीत चा दर देण्यात आलेला नाही.
एकोना एक्स्टेंशन फार मोठा प्रकल्प असल्याने या प्रकल्पास गती देण्याची जबाबदारी वेकोलि व्यवस्थापनाची असतांना स्थानिक अधिकारी विशेषता संबंधीत अधिकारी या प्रकल्पास विलंब करीत असल्याबद्दल खेद व्यक्त करीत हंसराज अहीर यांनी प्रकल्पग्रस्तांचा मोबदला किंबहुना नोकरी संदर्भात कसल्याही प्रकारे छळ होणार नाही याची काळजी घेण्याची सुचना क्षेत्रीय महाप्रबंधक गुप्ता यांना केली.

दि. १ जुलै २०२१ रोजी क्षेत्रीय महाप्रबंधक यांचेशी प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी बैठकीमध्ये माजरी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधकांनी मोबदला व नोकरी बाबत विलंब झाल्याचे मान्य केले. येत्या १५ दिवसात संबंधीत प्रकल्पग्रस्तांचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे मागवून कार्यवाही केली जाईल. त्यानंतर येत्या दोन महिण्यात वेकोलि मुख्यालयास प्रस्ताव पाठवून मान्यतेची प्रक्रीया पूर्ण केली जाईल, तद्नंतर मेडीकलची कार्यवाही करू असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याशी चर्चा करतांना मान्य केले. सिंचीत जमिनीचा दर उपलब्ध करण्याकरीता उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सिंचीत जमिनीचा मोबदला देवू असे आश्वासनही अहीर यांना यावेळी क्षेत्रीय महाप्रबंधकांनी दिले. 
स्थानिक युवकांवर अन्याय करणाऱ्या ओ.बी. कंत्राटदारांना तंबी द्या
 
माजरी क्षेत्रातील ओवरबर्डन (ओ.बी) चे काम करणारे संबंधीत ठेकेदार स्थानिक युवकांना कामावर घेत नसल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने या तक्रारींची त्वरीत दखल घेवून माहिती घ्यावी व सगळ्या ठेकेदारांना राज्य शासनाच्या जी.आर चे पालन करून ८० टक्के स्थानिकांना या कामावर सामावून घेण्याकरीता वेकोलि प्रबंधनाने त्वरीत नोटीस काढुन आदेश द्यावेत अशी सुचनाही क्षेत्रीय महाप्रबंधकांना या चर्चेदरम्यान केली. यावेळी वरीष्ठ अधिकारी कार्मिक प्रबंधक नायर, जोशी, धनंजय पिंपळशेंडे, छोटु पहापळे, एम.पी. राव, अंकुश आगलावे, राकेश तालावार, राहुल वनसिंगे, शुभम गेघाटे यांचेसह २०० हुन अधिक एकोना प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.

राज्यात मान्सून कधी परतणार ? हवामान विभागाचा नवा अंदाज, जाणून घ्या सविस्तर



                        (संग्रहीत फोटो) 

सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (२ जुलै) : राज्यात मान्सूनने गेल्या काही दिवसात, ढगांच्या गडगडाटासह होणाऱ्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला. पण येत्या आठवड्यात परत पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. 

तर राज्यात ८ ते ९ जुलै नंतर परत पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तवण्यात आली आहे.

पहा 30 जून पर्यंतचा पाऊस

होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार - राज्यात मान्सून सक्रिय झाल्यापासून सातारा, कोल्हापूर, मुंबई, जालना आणि परभणीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून, सर्वात कमी पाऊस अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये झाला आहे.
याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, सांगली,पालघर, औरंगाबाद, बीड, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर मध्ये नियमित सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

 तर, नाशिक, अहमदनगर, बुलडाणा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, गडचिरोली आणि गोंदियामध्ये सुद्धा समाधानकारक पाऊस झाला आहे. असे हवामान विभागाने सांगितले


पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
पुणे, (२ जुलै) : चित्रपट व नाटकाच्या क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणारा तसेच सामान्य रंगकर्मी यांचे काम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने या वर्गाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्य शासनाने सर्वच गरीब, गरजू समाजघटकांना मोफत अन्नधान्य, मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करत असताना, सामाजिक संस्थांकडूनही अशा गरजूंसाठी मदतीचा हात पुढे येणे आवश्यक आहे. 'आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे' संस्थेने पुढे केलेला हा मदतीचा हात अत्यंत महत्वाचा आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. राज्य शासनही पडद्यामागील कलावंताना मदत करण्याबाबत सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे पत्रकार भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आनंदी वास्तू संस्थेचे अध्यक्ष आनंद पिंपळकर, संवादचे सुनील महाजन, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निमिता मोघे, डॉ.अश्विनी शेंडे उपस्थित होते.

नाटक-चित्रपटांच्या झगमगाटी दुनियेत, पडद्यामागे राहून, कलाक्षेत्राची सेवा करणाऱ्या रंगकर्मींना, कोरोना संकटकाळात, विमा संरक्षणाचा आधार दिल्याबद्दल ‘आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे' संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याकडे बघितले जाते. साहित्य, नाटक, चित्रपट, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात पुण्याने नेहमीच आदर्श निर्माण केला आहे. कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम करत असताना ‘आनंदी वास्तू’ व ‘संवाद-पुणे' संस्थेनं, गरजू रंगकर्मींसाठी मदतीचा हात पुढे करुन, एका आगळ्यावेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मराठी माणूस नाटकवेडा आहे. नाट्यकलेला पहिल्यापासून राजाश्रय आणि लोकाश्रय मिळत आला आहे. नाटक व चित्रपटांनाही शासनाची कायम मदतीचीच भूमिका राहीली आहे. चित्रपट व नाटकाच्या क्षेत्रात पडद्यामागे राहून काम करणारा, सामान्य रंगकर्मी यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने या वर्गाला अडचणींचा सामना करावा लागतो. कलाक्षेत्राला मदत करण्याचीच राज्य शासनाची भूमिका राहिली आहे. यापुढेही राहील, असा विश्वास देत कोरोनामुळे चित्रपटांच्या, नाटकांच्या प्रदर्शनांवर काही निर्बंध आहेत. मध्यंतरी आपण निर्बंध कमी केले त्यानंतर अचानक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजनची कमी जाणवायला लागली. या परिस्थितीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नाईलाजाने काही निर्बंध लावले आहेत. लोकांचा जीव वाचला पाहिजे. लोकांचा जीव वाचवण्याला आपलं पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे जसा धोका कमी होईल, तसे निर्बंध हळू हळू कमी केले जातील, असे त्यांनी सांगितले.

 संवादचे सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. तर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालिका निमिता मोघे यांनी आभार मानले. यावेळी पडद्यामागील कलावंत-तंत्रज्ञ यांना अपघाती विमा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच निवडक कलावंताचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, कलावंत, पडदयामागील कलावंत-तंत्रज्ञ उपस्थित होते.

२००५ पुर्वी नियूक्त शालेय कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करा


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (२ जुलै) : आज दि.२ जुलै रोजी वणी मारेगांव तालुक्यातील २००५ पुर्वी नियूक्त पण शंभर टक्के अनुदान २००५ नंतर आलेले शालेय कर्मचारी जूनी पेन्शन योजनेपासून वंचित आहेत. याकरिता या कर्मचाऱ्यांनी दहा वर्षापासून लढा सुरू केला आहे, परंतु अजूनही शासनाने या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू केली नाही. करीता आज माननीय आमदार श्री. संजय रेड्डी बोदकूरवार यांना जूनी पेन्शन योजना कोअर कमिटी वणी मारेगांवच्या शालेय कर्मचारी वर्गानी निवेदनातून मागणी केली. तसेच माननीय तहसीलदार साहेब वणी यांना सुध्दा निवेदन देण्यात आले आहेत. यावेळी शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मारेगाव पोलिसाकडून वनोजा देवी येथे अवैध दारू विकणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या


सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (२ जुलै) : मारेगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या वनोजादेवी येथे अवैधरित्या देशी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती च्या आधारे मारेगाव पोलिसांनी पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार भालचंद्र मांडवकर व पोलिस पोलीस शिपाई रजनीकांत पाटील यांच्या ‌पथकाने दिनांक २ जुलै रोजी वनोजा देवी येथील अवैध देशी दारू विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले.

नांदेपेरा येथील शिरीष पवन अवताडे या नामक आरोपी कडून १६ बाटल्या ज्याची किंमत ८३२ रुपयाची दारू जप्त केली. शिरीष अवताडे यांच्या विरुद्ध दारू बंदी मुंबई कायद्यानुसार (६५) ई गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धडक कारवाई ने मार्डी परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणलेले. मात्र, महीला वर्गातून आनंद व्यक्त केला जात असून, अशाच कारवाई ची मोहीम सर्वच गावात झाली तर नक्कीच मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील चालणारे अवैध धंदे बंद होण्यास उशीर लागणार नाही.
शिवाय कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व महीला सुरक्षासाठी आता प्रत्येक गावातील अवैध धंदे बंद झाले पाहिजे असे महीला वर्गातून मागणी होत आहे.