कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
वणी : दि. २१ सप्टेंबर २०२२ च्या महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या पत्रानुसार ० ते २० पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा मानस सरकारने व्यक्त केलेला आहे. ही शिक्षण हक्क कायद्याची उघडपणे होणारी पायमल्ली असून दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर लादलेली शिक्षणबंदी आहे. या आत्मघाती निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रात सर्वप्रथम मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या नेतृत्वात सर्व शिक्षक संघटनांच्या सहकार्याने वणी येथे एकदिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती र. नं.४४८, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, अखिल महाराष्ट्र प्राथ. शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद शिक्षक संघ क्र. ४४९९, यवतमाळ जिल्हा परिषद प्राथ. शिक्षक संघ र. नं. २३५, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य प्राथ.शिक्षक संघ क्र.६६६९, उच्चश्रेणी मुख्याध्यापक शिक्षक संघटना, सेवानिवृत्त शिक्षक पेन्शन संघटना अशा अनेक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी जिजाऊ सावित्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. दरम्यान, या शाळा बंद करण्यात येऊ नयेत, शाळा बंद केल्यास होणारे दुष्परिणाम, विशेषतः मुलींचे थांबणारे शिक्षण,शाळाबाह्य विद्यार्थी, बालमजुरी, बालविवाह आणि ग्रामीण तरुण निरक्षरांचे वाढणारे प्रमाण या समस्या निर्माण होतील, असे परखड मत आपल्या मनोगतातून संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, अॅड..अमोल टोंगे, दत्ता डोहे, शिक्षक संघटनांचे अध्यक्ष राजेश बोकडे, शरद इंगळे, शैलेश राऊत, मधुकर कोडापे, देवेंद्र बच्चेवार, माया पेंदोर, रवि चांदणे, अभय भुजाडे यांनी व्यक्त केले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर यांनी वणी ही क्रांतीची भूमी असून १९७७ साली झालेल्या ५४ दिवसांच्या संपाची ठिणगी याच वणीतून पडल्याचे सांगितले. त्याचबरोबर पालकांना सोबत घेऊन प्रत्येक तालुक्यात असे आंदोलन करण्याचे नियोजन असल्याचेही ते यावेळी म्हणाले. मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते यांना उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत निवेदने देण्यात आली. तहसीलदार निखिल धूळधर साहेब यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. तर वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश खामनकर तर आभार प्रदर्शन नितीन मोवाडे यांनी केले. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी मारोती जिवतोडे, विनोद बोबडे, लक्ष्मण काकडे, ऋषीकांत पेचे, भाऊसाहेब आसुटकर, अभय पानघाटे, अमोल लोखंडे, संजय गोडे, संजय साखरकर, विलास टोंगे, शंकर निब्रड, सुनील क्षीरसागर, धनराज गोसावी, सुभाष गेडाम, राहुल तागडे, पारस पाटील, आशा कोवे, हिमा जुनगरी, सीमा मोहितकर, सीमा पोटदुखे, जयश्री मानकर, रेखा बोबडे, छाया वांढरे, कृष्णाजी ढुमने, नेताजी गोरे अशा अनेकांचे सहकार्य लाभले.